कंडोम म्हटलं की पुरुषांसाठी वापरण्यात येणारा गर्भनिरोधक इतकेच आपल्याला माहित असते. पण बायका वापरु शकतात असाही कंडोम बाजारात मिळतो हे अनेकींना माहितच नसते. आपल्याकडे सेक्स या विषयाबाबत अजूनही दबक्या आवाजातच चर्चा होत असल्याने अशा गोष्टींबाबत मोकळेपणाने बोलणे, चर्चा करणे जही काहीसे वेगळे मानले जाते. पण काळ बदलला आणि तरुण पिढीच्या सेक्स संदर्भातील संकल्पनाही बदलत असताना शारीरिक संबंध या विषयाबाबत मोकळेपणाने चर्चा व्हायला हवी. विशेषत: तरुणी, महिला यांना याबाबत पुरेशी माहिती असायला हवी (Know What is female condom and how to use it).
कारण आजही भारतात नको असताना झालेल्या मुलांची संख्या सुशिक्षित कुटुंबातही खूप जास्त आहे. तेव्हा एखाद्या महिलेला मूल नको असेल, लैंगिक संबंधातून होणारे संसर्ग टाळायचे असतील तर महिला आपली काळजी घेऊ शकते. फिमेल कंडोम हा त्यासाठीचा एक उत्तम पर्याय असून त्याबाबत प्रत्येकीने आवर्जून माहिती घ्यायला हवी. हा कंडोम योग्य पद्धतीने वापरल्यास पुरेपूर संरक्षण मिळते. फिमेल कंडोम वापरण्यासंदर्भात महिला आपल्या स्त्रीरोगतज्ज्ञांचीही मदत घेऊ शकतात .
फिमेल कंडोम का वापरायचं?
पुरुष कंडोम वापरत असताना महिलांनी कंडोम का वापरायचा असा प्रश्न आपल्याला साहजिकच पडू शकतो. तर कंडोम हा केवळ गर्भधारणा टाळण्यासाठी नसून त्याचे इतरही काही फायदे असतात. एचआयव्हीसारखे लैंगिक संसर्गातून पसरणारे आजार टाळण्यासाठी या कंडोमचा चांगला उपयोग होतो. एचआयव्ही शिवायही बरेच संसर्ग असतात जे महिलांच्या आरोग्यासाठी घातक असतात, कंडोम वापरल्याने त्यापासूनही सुटका होऊ शकते.
वापर कसा करायचा?
फिमेल कंडोम हे पुरुषांच्या कंडोमपेक्षा आकाराने मोठं असतं. मासिक पाळीसाठी टॅम्पॉन वापरताना आपण योनीमध्ये ज्याप्रमाणे टॅम्पॉन घालतो त्याचप्रमाणे योग्य ती पोझिशन घेऊन योनीत टॅम्पॉन घालायचा. त्याची बाहेरची रींग नीट बाहेर राहील याची काळजी घ्यायची. जेणेकरुन तो काढताना जास्त अवघड पडत नाही. हे कंडोम बाहेर काढताना विशेष काळजी घ्यावी लागते जेणेकरुन वीर्य बाहेर येणार नाही. तर बाहेरची रींग हाताने घट्ट धरुन ठेवायची आणि फिरवायची. यामुळे कंडोम आतून मोकळा होण्यास मदत होईल आणि तो सहज बाहेर निघू शकेल.
फिमेल कंडोम कितपत सुरक्षित?
नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिमध्ये पब्लिश झालेल्या एका रिसर्चनुसार फिमेल कंडोम इफेक्टिव्ह ठरते. रिसर्चमध्ये ६ हजार ९११ महिलांच्या डेटावर अभ्यास करण्यात आला. यानुसार फिमेल कंडोम्स हे ९५ टक्के इफेक्टिव्ह असतात. तर पुरूषांचे कंडोम ९८ टक्के इफेक्टिव्ह असतात.एकाचवेळी दोन्ही कंडोम्सचा वापर केल्यास गोनोरिया, क्लॅमिडिया, एचआयव्ही यांसारख्या गंभीर आजारांचा धोका टळतो. युरिनरी ट्रॅक इन्फेक्शनचा धोकाही टळतो.