संजीव कुमार म्हणजे त्यांच्या काळातले बॉलीवूडचे सुपरस्टार. असा सुपरस्टार ज्याच्याकडे अमाप पैसा होता आणि अनेक अभिनेत्री त्यांच्यावर जीव ओवाळून टाकायलाही तयार होत्या. एवढी सगळी सुखं पायाशी लोळण घेत असताना, अनेक सुंदर स्त्रिया त्यांच्या अवतीभोवती घोटाळत असताना आणि त्यांची लग्नाची बायको होण्यास तयार असताना, का नाही होऊ शकलं संजीव कुमार यांचं लग्न? हा खरोखरंच एक गहन प्रश्न. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्री हेमा मालिनी यांनी संजीव कुमार यांना कायम अविवाहित का रहावं लागलं, याचं एक कारण सांगितलं आहे.
हेमा मालिनी आणि संजीव कुमार यांनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं. ज्यावेळी सीता और गीता या चित्रपटाचं शुटिंग सुरू होतं, त्यावेळी संजीव कुमार आणि हेमा मालिनी यांच्यात प्रेमाचा धागा गुुंफला गेला. सुरूवातीला काही काळ अव्यक्त असणारं हे प्रेम नंतर व्यक्त होऊ लागलं. हेमा मालिनी संजीव यांच्या घरीही येणं जाणं करू लागल्या. संजीव यांच्या आईलाही हेमा आवडल्या होत्या. काही काळ असाच गेल्यानंतर स्वत: संजीव आणि त्यांच्या आई हेमाच्या पालकांशी बोलायला आणि लग्नासाठी त्यांचा हात मागायला हेमाच्या घरी गेले. मात्र हेमाने त्यांच्याशी लग्न करायला थेट नकार दिला.
हेमाचा नकार ऐकून संजीव कुमार यांना खूप धक्का बसला. पण तरीही त्यांनी हेमाची वाट पाहायची आणि लग्नासाठी त्यांचं मन वळवायचं ठरवलं. असं म्हणतात की यानंतर तब्बल ३ वेळा संजीव यांनी हेमाला लग्नासाठी विचारलं. पण प्रत्येकवेळी हेमाने त्यांना नकार दिला. ज्याच्याकडे कशाचीच कमतरता नाही, असा सुपरस्टार अभिनेता लग्नासाठी वारंवार मागणी घालत असताना हेमा मालिनी यांनी त्यांना नकार देणं ही खरोखरंच आश्चर्यकारक बाब होती. या घटनेच्या कित्येक वर्षानंतर हेमामालिनी यांनी या घटनेचा उलगडा केला असून संजीव कुमार यांच्याशी लग्न न करण्याचं कारण सांगितलं आहे.
या गोष्टीचा खुलासा करताना हेमा म्हणाल्या की संजीव आणि त्यांचे कुटूंबिय हे थोडे जुन्या विचारांचे होते. त्यांच्या विचारानुसार संजीव यांच्याशी लग्न करून घरी येणाऱ्या सुनेने तिचं करिअर सोडावं आणि घरी थांबून घरच्यांची सेवा करावी, घरातला सगळा कारभार सांभाळावा. लग्नानंतर बायकोने करिअर करण्यास संजीव आणि त्यांच्या कुटूंबाचा कडाडून विरोध होता. आपलं करिअर सोडून घर सांभाळण्यासाठी घरी बसणं, सगळ्यांची सेवा करणारी एक आदर्श सून आणि बायको बनून राहणं हे मला मान्य नव्हतं. त्यामुळे आपण संजीव यांच्याशी लग्न करण्यास नकार दिल्याचे हेमा सांगतात.
पुढे बोलताना हेमा असंही म्हणाल्या की, बायको म्हणून घरात येणाऱ्या मुलीने संसार सांभाळण्यात कसं परफेक्ट असावं, याविषयी संजीव आणि त्यांच्या घरच्यांच्या कल्पना खूप जास्त स्पष्ट होत्या. त्यात त्यांना आणि त्यांच्या घरच्यांना काेणतीही तडजोड करायची नव्हती. कदाचित याच कारणांमुळे आणि अतिपरफेक्ट गृहिणीच्या शोधात ते असल्यामुळे त्यांना कायम अविवाहितच रहावं लागलं. याच घटनेची दुसरी बाजू सांगताना हेमा म्हणाल्या की त्यांना संजीव यांना किंवा त्यांच्या घरच्यांना दोष द्यायचा नाही. कारण तो काळ खूप जुना होता आणि त्या काळात बहुतांश लोकांना आपल्या घरात येणाऱ्या सुनेकडून अशाच प्रकारच्या अपेक्षा असायच्या. त्यामुळे संजीव आणि त्यांच्या घरच्यांच्या अपेक्षा चूक नव्हत्या, फक्त मी त्या अपेक्षांमध्ये फिट बसणारी नव्हते, माझ्यासाठी ते अशक्य होतं, म्हणून मी त्यांच्याशी लग्न करण्यास नकार दिला.
संजीव अविवाहित राहण्याचं हे ही असू शकतं कारण
संजीव यांच्यासोबत काम केलेल्या एका ज्येष्ठ अभिनेत्रीने असं सांगितलं की संजीव यांचंं अनेकींशी अफेअर होतं. त्यांचं नाव अनेक जणींशी जोडलं गेलं. पण कोणतंच नातं लग्नापर्यंत पुढे जाऊ शकलं नाही. कारण संजीव यांचा स्वभाव खूप संशयी होता. त्यांना असं वाटायचं की त्यांच्या पैशांकडे पाहून स्त्रिया त्यांच्याशी प्रेमाचं नाटक करत आहेत. या त्यांच्या स्वभावामुळेही संजीव अविवाहित राहिले असावे, असं त्या अभिनेत्रीचं मत होतं.