वर्षा बाशू
‘त्या’ दोघी, त्यांनी आपला लैंगिक कल लपवला नाही. परस्परांवर प्रेम आहे तर ते जगजाही मान्य केलं, एकमेकींसोबत राहण्याचा निर्णय घेतला आणि कमिटमेंट रिंग सेरेमनी, म्हणजे एक प्रकारचा साखरपूडाच करत परस्परांना अंगठ्या घातल्या. आपल्या सोबतीवर आणि एकत्र प्रवासावर शिक्कामोर्तब केलं. दोन मुलींचा साखरपूडा असं म्हणत काहींना या बातमींनी धक्के बसले असले तरी त्या दोघींनी मात्र आपल्या प्रेमाला जाहीर मान्यता दिली. त्या सोहळ्याला एलजीबीटी (लेस्बियन, गे, ट्रान्सजेंडर, (LGBTQ)) गटाचे काही मोजके सदस्य उपस्थित होते. नागपुरातला हा सोहळा झाला, प्रेमाचा आणि प्रेमाचा निर्णय स्वीकारण्याचाही!
गेल्या काही काळापासून एलजीबीटी समुदायाचे अस्तित्व मोकळ्या मनाने स्वीकारण्याबाबत समाजाचा कल वाढताना दिसतो आहे. नागपुरातील एक ट्रान्सजेंडर, मायरा गुप्ता ही भारतातील पहिली ट्रान्स नर्स म्हणून ओळखली जाते आहे. दिल्लीच्या मेट्रोमध्ये अनेक ट्रान्सजेंडर्स यशस्वीरित्या काम करत आहेत. आपला लैंगिक कल स्वीकारत आहेत, त्याविषयी समाजात असलेले गैरसमज, टॅबू पुसण्याचाही प्रयत्न करत आहेत.
नागपुरात दोन मैत्रिणींनी केलेला हा साखरपूडा म्हणूनही आगळा आहे. या दोघी तरुणी उच्चविद्याविभूषित आहेत. दोघीही नामांकित संस्थांमध्ये उच्चपदावर काम करतात.. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमीही उच्चशिक्षित व प्रगत आहे.
यातील एक तरुणी आहे डॉ. सुरभी मित्रा व दुसरीचे नाव आहे पारोमिता मुखर्जी. सुरभी सायकियाट्रिस्ट असून नागपुरात एका मेडिकल कॉलेजमध्ये विभागप्रमुख आहेत तर पारोमिता कोलकात्यामध्ये एका आंतरराष्ट्रीय कंपनीत उच्चपदावर काम करतात.
..अशी झाली प्रेमाची सुरुवात!
त्यांची भेट एक वर्षाआधी झाली. कोलकात्याला एका कॉन्फरन्समध्ये दोघी प्रथमच भेटल्या. त्यावेळी त्यांच्या आवडीनिवडी जुळल्या.. गप्पा रंगल्या व मैत्र जुळले. इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सॲपवरच्या गप्पांत हे मैत्र घट्ट झाले. मात्र त्यांच्यातील प्रेमाची प्रचिती तेव्हा आली, जेव्हा सुरभीचा फोन सात दिवसांसाठी बंद झाला होता. सात दिवस तिच्याविना राहिल्यानंतर पारोमिताला आपण सुरभीवर प्रेम करीत असल्याचे जाणवले. फोन सुरू झाल्यावर, तू ठीक आहेस ना.. हे ज्या जिव्हाळ्याने पारोमिताने विचारले तेव्हा सुरभीलाही तिच्या प्रेमाची जाणीव झाली. पुढे मी तुला प्रपोज केलं तर तू नकार देशील का.. असं पारोमिताने विचारल्यावर, मी असं का करेन? असे प्रश्नार्थक उत्तर देऊन सुरभीने तिला होकार दिला होता.
घरच्यांचा अल्पसा विरोध नंतर स्वीकार
एकमेकींसोबत राहण्याचे जेव्हा ठरले तेव्हा त्यावर शिक्कामोर्तब करावे असे त्यांना वाटले. आपली इच्छा घरी बोलून दाखवल्यानंतर, सुरभीच्या आईने, तुम्ही एकमेकींसोबत जरूर रहा, पण हे नातं जगजाहीर कशाला करायचं, असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर, सुरभीने व्यापक भूमिका घेत, या कृतीमुळे आजवर पडद्याआड राहिलेल्या असंख्य लेस्बियन तरुणींना बळ मिळेल व त्या आपल्या लैंगिकतेचा स्वीकार करून पुढे येऊ शकतील असा आशावाद व्यक्त केला. सुरभीच्या या सामाजिक भूमिकेचे मग तिच्या पालकांनी स्वागत व स्वीकार केला.
लेस्बियन असण्याबाबत काही वर्षांपूर्वी सुरभीच्या कुटुंबियांना जेव्हा प्रथम कळले तेव्हा त्यांना थोडा धक्का बसला होता. तिने प्रथम आपल्या वडिलांना सांगितले. सुरभीचे आईवडील दोघेही डॉक्टर आहेत. वडिलांना वाटले की ही एक फेज आहे.. निघून जाईल.. नंतर काही काळानंतर त्यांनाही लक्षात आलं की सुरभी खरं सांगत आहे. त्यांनी मग अभ्यास केला.. काही तज्ज्ञांसोबत चर्चा केली. आधुनिक विचारांचा वारसा घेतलेल्या या कुटुंबियांनी आपल्या मुलीला पूर्णपणे समजावून घेत, तिला केवळ स्वीकारलेच नाही तर तिला उच्चशिक्षण देऊन स्वयंपूर्णही बनवले. तिचा लैंगिक कलही स्वीकारला. आणि आता तिच्या सोबतीनं राहण्याच्या निर्णयाचाही स्वीकार केला.
तीच गोष्ट पारेमिताची.
पारोमिता जेव्हा अकरावीत होती तेव्हा तिला स्वत:ला प्रथम कळलं की आपला कल वेगळा आहे. तिने ही गोष्ट आपली बहीण व वडिलांना सांगितली. त्यांनीही तिला समजावून घेत तिचा स्वीकार केला होता.
पुढे लग्न करण्याचा अर्थातच या दोघींचा विचार आहे. आपले वैवाहिक जीवन समानतेच्या सूत्रावरच आधारीत असेल असं त्या सांगतात.
दोघींचीही डेस्टिनेशन वेडिंगची इच्छा आहे. हे लग्न गोव्यात किंवा अन्यत्र करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
भविष्यात मूल दत्तक घेण्याचाही त्यांचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
एलजीबीटीमधील ‘एल’ समोर येत आहे ही आनंदाची बाब : आनंद चंद्राणी, फाऊंडर प्रेसिडेंट, सारथी ट्रस्ट, नागपूर.
आजपर्यंत तृतीयपंथी, गे व्यक्तींचीच चर्चा होताना आपण पाहिले आहे. लेस्बियन समुदाय हा कधीच समोर आलेला नव्हता. या सोहळ्याच्या निमित्ताने लेस्बियन समुदायाला समाजाभिमुख होण्याची एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. समाजात अनेक लेस्बियन तरुणी आहेत. त्यांनाही या सोहळ्यातून प्रेरणा मिळू शकेल. सारथी ट्रस्टच्या माध्यमातून जे काम केले जात आहे, त्यात हा सोहळा एक मैलाचा दगड मानला जावा असाच आहे.