नात्यातला लव्ह बॉम्ब हे वाचायला जरी नवीन वाटत असेल, तरी ते आपण अनेकदा अनुभवलेलं असतं किंवा कुणाचं तरी तसं वर्तन पाहिलेलं असते. आता सोप्या शब्दांत सांगायचं म्हणजे बॉम्ब ही संकल्पना आपण तेव्हा वापरतो, जेव्हा कोणत्याही गोष्टीचा अतिरेक होतो. नात्यातला लव्ह बॉम्ब म्हणजे दुसरं- तिसरं काही नसून प्रेमाचा अतिरेक आहे. अर्थात आता प्रेम करण्याच्या प्रत्येकाच्य पद्धती वेगवेगळ्या असतात. पण आपण आपल्या सभोवती कधीतरी अतिरेकी प्रेमही पाहिलेलं असतं. हेच अतिरेकी प्रेम म्हणजे लव्ह बॉम्ब ब्लास्ट.
प्रेम करण्याची किंवा ते व्यक्त करण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते. काही जणं असे असतात, ते खूप भरभरून प्रेम करतात. तर काही जणांचं प्रेम अबोल असतं. भरभरून प्रेम करणारे काही जण लव्ह बॉम्बर या प्रकारात मोडतात. बऱ्याचदा प्रेमात पडल्यावर काही जणांच्या बाबतीत ‘too much too soon’ असा अनुभव येण्याची शक्यता असते. हेच वर्तन धोकादायक असतं. ज्या व्यक्ती अशा भरभरून प्रेम करणाऱ्या असतात, त्या प्रेमाच्या बाबतीत बऱ्याचदा डॉमिनेटींग होतात. आपण जे करतो, तेच बरोबर आणि तेच खरं अशी या व्यक्तींची प्रवृत्ती असते. आपल्या जोडीदाराला कंट्रोल करण्याची एवढी जबरदस्त शक्ती या लोकांमध्ये असते की ते नकळतपणे जोडीदाराला कसं पटवतात किंवा त्याचं मन आपल्याला हव्या त्या गोष्टी करण्यासाठी कसं वळवतात, हे त्या समोरच्या व्यक्तीलाही समजत नाही. सुरुवातीला हे प्रेम हवहवंस वाटत असलं, तरी नंतर या प्रेमाचा त्रास होतो. म्हणूनच आपल्या आजूबाजूचे लोक लव्ह बॉम्बर आहेत की नाही, हे ओळखण्याच्या या काही गोष्टी.
१. खूपच घाई करणे
लव्ह बॉम्बर प्रकारात मोडणाऱ्या व्यक्तींना प्रत्येक गोष्टीतच खूपच घाई करण्याची सवय असते. अशा व्यक्तींशी ओळख होताच आणि तुम्ही त्यांना आवडू लागताच, त्या तुमचा नंबर घेण्यासाठी, तुम्हाला फोन करण्यासाठी अधीर होतात. किंवा तुम्हाला भेटण्याचे वेगवेगळे बहाणे शोधू लागतात. त्यामुळे अशी जर ॲबनॉर्मल वाटावी किंवा तुम्हाला ऑकवर्ड होईल, अशी घाई जर समोरच्या व्यक्तीकडून होत असेल, तर शंका घेण्यास हरकत नाही.
२. स्पर्श करण्याचीही घाई
आजकाल प्रेमाची कबूली दिल्यावर किंवा त्या आधीही अनेक जोडपी डेटवर जातात. जर नुकतीच प्रेमाची कबूली दिली असेल आणि तुम्ही डेटवर गेल्यावर जोडीदार स्पर्श करण्याची किंवा तुम्हाला नको आहेत, त्या गोष्टी करण्याची घाई करत असेल, डेटवर गेल्यावर खूप जास्त महागडे गिफ्ट त्याने तुम्हाला दिले असेल किंवा तुमच्या अपेक्षेपेक्षा खूपच वेगळं, थोडं वावगं वाटावं असं त्याचं वर्तन असेल तर सावधान.
३. त्यांच्या वागण्याचा अंदाज घ्या
तुम्ही नुकतीच ज्याला प्रेमाची कबूली दिली आहे किंवा ज्याला लवकरच प्रेमाची कबूली देणार आहात, त्या तुमच्या पार्टनरचं वागणं कसं आहे, याचा बारकाईने अंदाज घ्या. तो तुमच्याशी वागताना कसं वागतो आणि इतरांशी कसं वागतो, हे देखील तपासा. तुमच्याशी तो अतिशय प्रेमळ, रोमॅण्टीक वागत असेल, सॉफ्ट बोलत असेल आणि त्याच वेळी जर दुसऱ्या कोणत्या व्यक्तीशी खूपच रुड किंवा असभ्य वर्तन करत असेल, तर तो नक्कीच लव्ह बॉम्बर प्रकारात मोडणारा असू शकतो.
अशा व्यक्तींसोबत राहणं धोकादायक का आहे?
लव्ह बॉम्बर प्रकारात मोडणाऱ्या व्यक्तींसोबत राहणं धोकादायक यासाठी असतं कारण त्या व्यक्ती समोरच्याला कंट्रोल करण्याचा खूप जास्त प्रयत्न करत असतात. अशा व्यक्ती खूप जास्त डॉमिनेटींग असतात आणि समोरच्याला आपल्या मनानुसार कसं वागायला लावायचं, हे त्यांना बरोबर ठाऊक असतं. त्यामुळे एक वेळ अशी येते की अशा व्यक्तींच्या पार्टनरला स्वत:च्या मनाने वागण्याचा किंवा काही करण्याचा उत्साहच राहत नाही. त्यामुळे मग एखाद्या क्षणी त्यांच्या भावनांचा स्फोट होऊ शकतो आणि नातं धोक्यातही येऊ शकतं.