शारीरिक संबंधांनंतर रिलॅक्स आणि शांत वाटणे अतिशय स्वाभाविक आहे. सेक्स ही शारीरिक, मानसिक आणि भावनिक नैसर्गिक गरज आहे. त्यात ‘वाईट’ असे काही नाही. मात्र शरीरसंबंधात ‘ऑरगॅझम’ या एका शब्दाची वारंवार चर्चा होते. विशेषत: स्त्रियांच्या संदर्भात. जोडीदाराशी नियमित शारीरिक संबंध करुनही अनेक स्त्रियांना हवा तसा आनंद मिळत नाही, ऑरगॅझम म्हणजे काय हे कळत नाही किंवा ती अनुभूतीच होत नाही. मात्र असे वारंवार झाल्यास जोडीदारावर किंवा स्वत:वर चिडचिड होते. हा विषय अनेकदा आपण जोडीदाराशी आणि इतरही कोणाशी मोकळेपणाने बोलू शकत नसल्याने नाते संबंधांवर परिणाम होऊन मानसिक ताणही वाढतो. हे असे का होते? ऑरगॅझम म्हणजे काय आणि तो क्षण का अनुभवता येत नाही, याबाबत शास्त्रीय माहिती प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉ. सुधीर सोनटक्के देतात..
ऑरगॅझमचा अनुभवच नाही..
डॉ. सोनटक्के सांगतात, भावनोत्कटता किंवा ऑरगॅझम होण्याची नेमकी स्थिती काय असते. कशामुळे हा आनंद मिळवता येतो याबाबत अनेक स्त्रियांना पुरेशी माहिती नसते. पुरुषांमध्ये वीर्य बाहेर आल्यानंतर त्यांना शारीरिक सुख मिळते. पण स्त्रियांना हा आनंद मिळण्यासाठी त्या विशिष्ट क्षणापर्यंत पोहोचावे लागते. तो विशिष्ट क्षण अनुभवताना स्त्रियांचे शरीर वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया देत असते. कधी ओटीपोटाच्या भागात आकुंचन-प्रसरण होणे, कधी चेहऱ्यावर एकाएकी समाधानाचे भाव उमटणे, हृदयाची स्पंदने वाढणे अशा स्वरुपात या प्रतिक्रिया असू शकतात. परंतु या क्षणापर्यंत आपण पोहचू शकत नसू तर त्याची कारणे समजून घेणे आणि त्यावर उपाय करुन आपल्या जोडीदाराला शारीरिक सुख देणे आवश्यक आहे.
कारणं काय?
१. शारीरिक, मानसिक किंवा भावनिकरित्या आपण शारीरिक संबंधांसाठी तयार नसू तर जोडीदाराला भावनोत्कटता अनुभवता येत नाही. त्यामुळे जोडीदारांपैकी दोघांनीही शारीरिक संबंधांसाठी शारीरिक, मानसिक आणि भावनिकरित्या तयार असणे आवश्यक असते.
२. विविध गंभीर आजार हे ऑरगॅझम न होण्याचे एक महत्त्वाचे कारण असू शकते. हृदयरोग, कर्करोग किंवा गर्भाशयाशी निगडित शस्त्रक्रिया यांमुळे भावनोत्कटता अनुभवता येत नाही. त्यामुळे ज्यांना शारीरिक तक्रारी आहेत अशांनी शारीरिक संबंधांबाबत योग्य तो सल्ला घ्यावा.
३. मेडिकलमध्ये जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय सर्रास खरेदी केली जाणारी औषधे. मानसिक आजारावरील औषधे किंवा स्टिरॉईडस आणि इतर काही औषधांचा परिणाम म्हणूनही अनेकांना ऑरगॅझम होत नाही. त्यामुळे जोडीदारांपैकी कोणीही अशाप्रकारचे औषधोपचार घेत असेल तर त्याचा शरीरावर प्रतिकूल परिणाम होतो, अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
४. जोडीदारांपैकी कोणी नियमित व्यसन करत असले तर त्याचा तुमच्या शारीरिक संबंधांवर विपरित परिणाम होतो. व्यसनांमुळे ऑरगॅझम होण्याचे प्रमाण कमी होते आणि आपण जोडीदाराला पुरेसा आनंद देऊ शकत नाही. त्यामुळे दारु किंवा धुम्रपान अशा सवयी असतील तर शारीरिक संबंधांतून आनंद मिळू शकत नाही.
५. मानसिक ताणतणाव हे शारीरिक संबंधांतून आनंद न मिळण्याचे आणखी एक महत्त्वाचे कारण असते. तुम्ही सतत कोणत्या ना कोणत्या चिंतेत, नैराश्यात असाल तर शारीरिक संबंधांतून तुम्हाला म्हणावा तसा आनंद मिळत नाही आणि समोरच्यालाही देता येत नाही. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य हेही शारीरिक संबंधांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते.
६. जोडीदारांमध्ये कोणत्या कारणाने वादविवाद असतील तर शारीरिक संबंध ठेवले तरी त्याचा म्हणावा तसा आनंद मिळू शकत नाही. त्यामुळे केवळ शारीरिक संबंधांतून आनंद मिळणे इतकेच याचे स्वरुप मर्यादित नसते. तर शारीरिक संबंधांतून पूर्ण आनंद मिळवायचा असेल तर दोन व्यक्तींमधील भावनिक संबंधही तितकेच सुदृढ असणे आवश्यक असते.