नातं जपलं, जोपासलं की ते घट्ट होतं . हा खरंतर कोणत्याही नात्यासाठीचा सर्व साधारण नियम. नवरा बायकोच्या नात्यातही तो महत्त्वाचा. एकदा लग्न झालं की नवरा बायकोचं नातं निर्माण होतं. पण या नात्यातली सकारात्मकता, संवेदनशीलता, प्रेम हे टिकवायचं असेल तर हे नातं निगुतीनं जपावं लागतं. कितीही प्रयत्न केला तरी नात्यात खटके उडतात, विसंवाद निर्माण होतात, भांडणं होतात. नवरा बायकोचं नातं घट्ट होण्यासाठी हे गरजेचंही असतं म्हणा. प्रश्न भांडण होण्याचा नाही प्रश्न आहे तो भांडण किती ताणता हा आहे. भांडणं होवूनही नवरा बायकोच्या नात्यातला गोडवा टिकवायचा असेल तर भांडणात आणि नात्यात काही नियम पाळण्याला पर्याय नाही.
नात्यासाठी नियम..
1 . भांडण वाढवायला नको
सध्या तरुण जोडप्यांमधे विसंवादामुळे घटस्फोटाचं प्रमाण वाढलं या स्वरुपाच्या बातम्या वरचेवर वाचायला मिळतात. झालं भांडण की तोडा नातं असं अनेक तरुण जोडप्यांच्या बाबत होत असल्याचं विवाह समुपदेशक अनुभवातून सांगतात. त्यांच्या मते भांडणं होणं, एखाद्या विषयावर दोघांचे मतभेद होणं हे स्वाभाविक आहे. रुसवा फुगवा, अबोला हे देखील नात्यात होतंच. पण नात्यातल्या या अस्वस्थ अवस्थेचा कालावधी वाढला की नात्यातला दुरावा वाढतो. कोरडेपणा येतो. हे टाळायचं असेल तर वाद झाल्यानंतर तो लवकरात लवकर मिटवावा. पुन्हा काही झालंच नाही अशा प्रकारे वागायला लागावं. वादाचे मुद्दे सतत चर्चिले गेले तर भांडण मिटत नाही. वाद झाले तर होवू द्यावेत पण ते लांबवण्याला मर्यादा घालावी.
छायाचित्र: गुगल
2. नात्यात मैत्री असावी
नवरा बायकोचं नातं म्हणजे अपेक्षा, अपेक्षापूर्ती, आग्रह, तडजोड एवढंच असतं का. हे असूनही नवरा बायकोच्या नात्यात जर मैत्री निर्माण झाली तर नात्यातली आणि जीवानातली आव्हानं सहज पार होतात. मित्र-मैत्रिणींमधे भांडणं होतात पण ती लवकर मिटतात. एकमेकांच्या चुकांना, दोषांना सतत मैत्रीत बोट दाखवलं जात नाही. एकमेकांच्या काही गोष्टींकडे दुर्लक्ष करुन मैत्री टिकवण्याला महत्त्व दिलं जातं. म्हणूनच नवरा बायको हे एकमेकांचे मित्र असावेत. त्यांच्यातलं नातं मैत्रीसारखं असेल तर ‘बात का बतंगड’ होत नाही. एकमेकांच्या दोषांकडे दुर्लक्ष करणं, एकमेकांना उणिवांसकट स्वीकारणं शक्य होतं आणि नातं मजबूत होतं.
3. लवकर सॉरी म्हणा
नवरा बायकोत भांडणं झालं की ते दीर्घकाळ चालतं कारण कोणीच माघार घ्यायला, पुढाकार घेवून माफी मागायला तयार नसतं. कारण दोघांचाही अभिमान मधे येतो. नात्यात अभिमान आला की एकमेकांबद्दलची मनं कडवट होतात. नात्यातलं प्रेम कमी होतं. म्हणून भांडण झाल्यावर लगेच एकमेकांना सॉरी म्हटलं तर भांडण आणि दुरावा दोन्ही वाढत नाही. मतभेद झाले तरी मनभेद होत नाही. एकमेकांना समजून घेण्याला वाव मिळतो.
छायाचित्र: गुगल
4. जोडीदारच्या म्हणण्याकडे लक्ष द्या
नवरा बायको दोघांपैकी कोणीही एक आपल्या जोडीदाराच्या मताकडे, म्हणण्याकडे दुर्लक्ष करत असेल, त्याला काही किंमत देत नसेल तर तिला/ त्याला स्वत:चा अपमान झाल्यासारखा वाटतो. नेहेमी जोडीदार काय सांगतोय/सांगतेय ,विचारतोय/ विचारतेय याकडे लक्ष द्यायला हवं. त्यावर काहीतरी बोलायला हवं, व्यक्त व्हायला हवं. यामुळे एकमेकात वाद झाले तरी संवादही राहतो आणि नात्यात एकमेकांचा आदरही राहतो.