Join us  

मुलं नाही, नवऱ्यामुळे वाढतो बायकांच्या डोक्याचा ताप! अभ्यासाचा दावा, बायका चिडचिड्या होतात कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2024 7:08 PM

Men stress women out more than kids says new study : मूल आणि घर सांभाळणे यापेक्षा नवऱ्याने दिलेला त्रास बायकांना जगणं असह्य करतो, संशोधन सांगतं

नवरा बायकोचं नातं म्हणजे भांडणाशिवाय मजा नाही असं म्हटलं जातं. भांड्याला भांडं लागणारच पण ते तेवढ्यापुरतं असेल तर त्यात मजा असते. मात्र नवरा किंवा बायको यांची एकमेकांना सतत कटकट होत असेल तर मात्र ते नातं टॉक्सिक व्हायला लागतं आणि दोघांवरही त्याचा नकळत ताण यायला लागतो. त्यात एकदा मूल झाले की मात्र सगळं लक्ष त्या बाळाकडे दिलं जातं. बाळ झाल्यावर नवरा-बायकोच्या नात्यातील आनंदाच्या, ताणाच्या गोष्टी मागे पडतील असं मानलं जातं. पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळीच असते. महिलांवर बाळाची जबाबदारी येते आणि नकळत त्यांच्या ताणात वाढ होत जाते (Men stress women out more than kids says new study). 

मुलांचा आहार, आजारपणं, झोप, अभ्यास अशा एक ना अनेक बाबतील महिलांना मुलांकडे लक्ष द्यावं लागतं. त्यांना घरातली कामं, नोकरी हे सगळं असतंच. पण मुलांना वाढवण्यापेक्षा नवऱ्याची पुरेशी साथ नसल्याने महिलांना जास्त ताण येतो. याबाबत नुकतंच एक संशोधन करण्यात आले असून पती हे स्त्रियांसाठी तणावाचे एक महत्त्वाचे कारण असतात असं त्यामध्ये म्हटलं आहे. आई असलेल्या ७ हजार हून जास्त महिलांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये महिलांच्या तणावाची पातळी ही ८० टक्क्यांहून अधिक असल्याचे दिसून आले. तर ४६ टक्के स्त्रियांना मुलांपेक्षा पतीमुळे जास्त ताण होत असल्याचे सर्वेक्षणातील निष्कर्षात समोर आले आहे.

(Image : Google)

या ताणतणावांमध्ये पालकत्व आणि घरगुती कामे यामध्ये जोडीदाराकडून मदत मिळत नसल्याने महिलांना हा ताण येत असल्याचे म्हटले होते. अशाप्रकारच्या तणावामुळे महिलांना आरोग्याच्या दीर्घकालिन समस्या निर्माण होतात. असे होऊ नये यासाठी मुक्त संवाद आणि कामांची समान विभागणी व्हायला हवी असंही या संशोधनाच्या निष्कर्षामध्ये म्हटलं होतं. दोघांनीही पालकत्व आणि घरातील रोजची कामे यांमध्ये समान वाटा उचलला तर महिलांना त्याचा ताण येणार नाही. यामुळे नवरा-बायको आणि पालक-मुले यांचे नातेसंबंध चांगले राहण्यास मदत होईल असे म्हटले होते.

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप