अभिनेत्री नीना गुप्ता ओळखल्या जातात त्या त्यांच्या अभिनयाबद्दल , त्यांच्या मोकळ्या विचारांबद्दल आणि बिनधास्त जगण्याबद्दल. एखाद्या चित्रपटात त्या मुख्य व्यक्तिरेखेच्या भूमिकेत असू देत किंवा एखाद्या गाण्यातील त्यांचा गेस्ट अपिरिअन्स. नीना गुप्ता त्यांच्या हावभावांसह प्रेक्षकांच्या लक्षात राहातातच. नीना गुप्ता एखाद्या सामाजिक मुद्यावर बोलू देत किंवा पालकत्त्वाबाबत; त्यांच्या बोलण्याची, मतांची, विचारांची दखल घेतली जातेच. त्यावर नंतर चर्चा होतातच. सध्या लग्नसंबंधाबाबत त्यांनी व्यक्त केलेल्या मताबद्दलची चर्चा होते आहे. एका खाजगी कार्यक्रमात त्यांनी लग्नसंबंधाविषयी व्यक्त केलेलं मत लग्नसंबंधांचा कसा विचार करायला हवा याकडे लक्ष वेधतं.
Image: Google
नीना गुप्ता म्हणतात, ‘भलेही माझ्या लग्नाला तेरा वर्षं झालेली असतील; पण म्हणून विवाह संबंधांवर कोणतं मत व्यक्त करण्याइतके किंवा लग्नसंबंधातल्या एखाद्या समस्येवर कोणाला सल्ला देण्याइतपत आपण तज्ज्ञ नाही, हे त्या स्पष्ट सांगतात. नीना यांच्या मते लग्न संबंधांकडे, त्यातील प्रश्नांकडे बघण्याचा असा सर्वसामान्य दृष्टिकोन नसतो. प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या इच्छा, अपेक्षा यानुसार, वैयक्तिक दृष्टिकोनातून आपल्या लग्नसंबंधाकडे बघत असतो. आपलं नातं यशस्वी की प्रश्नांनी, समस्यांनी भंजाळलेलं हे ज्याचं त्यानं ठरवायचं असतं. दुसर्यानं त्यावर शिक्का मारुन किंवा त्यावर सल्ला देऊन काहीही होत नसतं .
नीना गुप्ता यांना सुखी सहजीवन, आनंदी लग्नसंबंध यावर बोलण्याचा आग्रह धरला असता त्यांनी त्यावर मांडलेली ही स्पष्ट मतं आहेत. नीन गुप्ता म्हणतात की, मी सुखी वैवाहिक जीवनाबद्दल काय विचार मांडू. प्रत्यक्षात माझ्या आजूबाजूला मी असे ‘ हॅप्पी’ सदृष्य लग्नसंबंधं बघितलेलेच नाहीयेत. लग्नसंबंधं हे नेहेमी अनेक तडजोडींनी व्यापलेलेच मी बघितलेले आहेत एवढ्या तडजोडीच्या वातावरणातल्या आनंदी सहजीवनाबाबत माझ्याकडे तरी काहीच उत्तर नाही. असं नीना गुप्ता मोकळेपणानं पण ठामपणे सांगतात.
Image: Google
आनंदी सहजीवन या प्रश्नावर विचार व्यक्त करताना नीना गुप्ता यांनी आपल्या आठवणीतल्या अशा अनेक लोकांच्या दुखी वैवाहिक जीवनाबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. आपलं वैवाहिक जीवन असमाधानी, दुखी असूनही ते त्या नात्यात का अडकून राहातात? या प्रश्नाचा ज्याने त्याने विचार करायला हवा असं नीना गुप्ता म्हणतात. नीना गुप्ता म्हणतात की लग्न मोडणं ही साधी बाब नाही, तो एक मोठा धक्का आहे. इतक्या दिवस दोघेही स्वत:च्या पूर्ण अस्तित्त्वासह, आपआपल्या कुटुंबासह लग्न बंधाच्या रेशीम धाग्यानं बांधलेले असतात. ही रेशीम गाठ जशी सुटायला लागते, कमजोर व्हायला लागते त्याचा त्रास सगळ्यांनाच सोसावा लागतो. पण लोक काय म्हणतील, लोकांना उगाच चर्चेचं कारण नको म्हणत पटत नसतानाही एकत्र राहाण्यात काय अर्थ आहे? पटत नसलेल्या नात्याचं हे प्रदर्शन का , कोणासाठी? असा प्रश्न नीना गुप्ता उपस्थित करतात.
Image: Google
नीना गुप्ता म्हणतात की, लग्नाच्या नात्याकडे पाहाण्याचा अनुभव हा ज्याचा त्याचा वैयक्तिक असतो असं मी म्हणते कारण त्यामागे माझ्या एका मैत्रिणीचा अनुभव आहे. त्या म्हणतात की, मैत्रिणीचा नवरा हा नुसता बायकांच्या मागे फिरणारा आहे असं मला जेव्हा कळलं तेव्हा मी तिला सल्ला दिला की तू अश नवर्याला आधीच सोडून द्यायला हवं होतं. तेव्हा ती मला म्हणाली की, ‘आता जर, मी त्याला सोडून दिलं तर मला खूप गोष्टी गमवाव्य लागतील. आमच्यात जेव्हा कोणतंच नातं नव्हतं तेव्हा मी त्याला खूप मदत केली होती, त्याचा आधार बनून उभी राहिली होती, मग आता मी त्याला का सोडून देऊ? हे तिनं दिलेलं उत्तर मला अर्थपूर्ण वाटलं. तिच्या उत्तरात व्यावहारिक दृष्टिकोन दडलेला होता. लग्नाच्या नात्याकडे बघण्यात वैयक्तिक दृष्टिकोनाला महत्त्व आहे आणि म्हणूनच मी लग्नाच्या नात्याकडे इतरांनी कसं पाहायला हवं, लग्नाच्या नात्यात अमूक एक समस्या निर्माण झाली तर काय करायला हवं याबाबत काहीही उत्तर देऊ शकत नाही. माझ्याकडे ते उत्तर नाही!
नीना गुप्ता यांनी ठामपणे सांगितलेल्या या उत्तरात कदाचित वाचणार्यांना त्यांच्या लग्नसंबंधातील सुख, दुखं, वाद , तडजोडी याकडे बघण्याची नजर नक्कीच मिळाली असेल असं वाटतं.