Join us  

कंसेप्शन मून, काय म्हणता हा शब्दच माहिती नाही? आईबाबा व्हायची तयारी करणारा नवा ट्रेंड !!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 7:33 PM

ज्यांना बाळ हवे आहे, पण गरोदर राहण्यात अडचणी येत आहेत, अशा जोडप्यांना डॉक्टर कंसेप्शन मून प्लॅन करण्याचा सल्ला देत आहेत. कंसेप्शन मून नावाची ही नविनच पण अतिशय भन्नाट भानगड नेमकी आहे तरी काय ? , तुम्ही याबद्दल काही ऐकलेय का...?? 

ठळक मुद्देकंसेप्शनमुनसाठी भारतातली अनेक जोडपी मलेशिया, थायलंड, बाली अशा देशांना जाण्याचा प्लॅन करत असतात.आता कोरोनामुळे बाहेर देशांमध्ये तर जाता येत नाही. त्यामुळे कोकण, गोवा अशा ठिकाणी जाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. हे देखील नाही जमले तर तुमच्या शहराच्या अगदी जवळ असलेल्या पर्यटन स्थळांचा यासाठी विचार करा असेही सुचवितात.

लग्न झालेली जोडपी हनीमुनला जातात, ते तर आपण नेहमीच ऐकतो आणि पाहतो. पण हा कंन्सेप्शन मून नावाचा नवा ट्रेण्ड सध्या सगळीकडेच जोरात सुरू आहेत. आता कोरोना आणि लॉकडाऊनमुळे काही जण नक्कीच घरात अडकून पडले आहेत, ही गोष्ट वेगळी. पण पटकन आई- बाबा व्हायचे आहे ना, मग लॉकडाऊन  संपताच लवकरात लवकर एखाद्या जवळच्या ठिकाणी जाऊन तुमचा कंसेप्शनमून प्लॅन करा, असे डॉक्टर सांगत आहेत. धकाधकीच्या जीवनामुळे आजकाल या गोष्टींची प्रचंड गरज निर्माण झाली असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

 

कंसेप्शन मून म्हणजे आहे तरी काय ?हनीमून सारखेच कंसेप्शन मून असते. म्हणजे यामध्ये पती- पत्नींनी एकत्र फिरायला जाणे आणि त्यांना एकांत मिळणे गरजेचे असते. हनीमून हा एकमेकांना समजून घेण्यासाठी असतो, तर कंसेप्शन मून हा दिवस राहण्यासाठी म्हणजेच प्रेग्नन्ट होण्यासाठी असतो. ज्यांना बाळ हवे असते, पण एकमेकांसोबत घालवायला वेळच मिळत नाही, अशी जोडपी ही ट्रीप प्लॅन करतात. 

 

कंसेप्शन मून कधी प्लॅन करावा ?आपल्या सोयीप्रमाणे सुटीचे दिवस पाहून कंसेप्शन मून प्लॅन करता येत नाही. महिलांच्या मासिक पाळीच्या बाबतीत १०- १०- १० दिवसांची विभागणी केलेली असते. मासिक पाळी येते तो दिवस पहिला दिवस मानला जातो आणि त्याप्रमाणे हे १०- १० दिवसांचे तीन टप्पे ठरवले जातात. यातील मधले १० दिवस म्हणजे मासिक पाळीनंतरचे ११ ते २० दिवस हे बाळ होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे मानले जातात. बाळ होऊ द्यायचे असेल, तर या दिवसांमध्ये पती- पत्नीचा संबंध येणे गरजेचे असते. हेच दिवस कंसेप्शन मूनसाठी निवडावे लागतात. 

 

कंसेप्शन मूनची गरज काय आहे ?हा प्रश्न सहजपणे कुणाच्याही डोक्यात येऊ शकतो. दिवसच जायचे असतील तर ते कुठेही जातात, मग त्यासाठी कंसेप्शन मूनला जाण्याची गरज का, असा प्रतिप्रश्न डॉक्टरांना विचारणारे अनेक जण असतात. पण सध्याच्या धकाधकीच्या जीवनात याची खरोखरच खूप गरज असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सध्या नवरा- बायको दोघेही वर्किंग असतात. कामाचा प्रचंड लोड असतो. घरी येण्या- जाण्याच्या वेळाही ठरलेल्या नसतात. अनेकांना नाईट शिफ्टही करावे लागते. याशिवाय काही जणांचे घर लहान असते. नेमके महत्त्वाच्या दिवसांमध्येच घरी पाहूणे आलेले असतात. अशा अनेक कारणांमुळे ओव्ह्यूलेशन पिरेडमध्ये नवरा- बायकोचे एकत्र येणे होत नाही. त्यामुळे अतिशय इच्छा असूनही दिवस राहत नाहीत. म्हणून या सगळ्या ताणतणावांपासून दूर जाऊन एकमेकांसोबत निवांत वेळ घालविता यावा, म्हणून कंसेप्शन मूनचा पर्याय सूचवला जातो. 

 

 

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिपप्रेग्नंसी