नवरा बायकोचं नातं इतकं नाजूक की साध्या संशयानंही ते तुटण्याची शक्यता. या नात्यात तणाव विसंवाद निर्माण होण्याची अनेक कारणं असतात. एकमेकांवरचा अविश्वास, स्वभाव आणि विचारांमधला भेद, जीवनशैलीतला फरक, कौटुंबिक पार्श्वभूमी, मूल न होणं , अहंकार अशी कितीतरी कारणं नवरा बायकोच्या नात्यात अडथळा निर्माण करतात. या अनेक कारणांपैकी एक आणखी महत्त्वाचं कारण म्हणजे दोघांच्या वयातलं अंतर. बायको नवर्यापेक्षा मोठी असली तर काकूबाई म्हणून तिची ओळख होते जी दोघांच्या नात्याला बोचते. तर नवरा बायकोपेक्षा मोठा असेल तर बापाच्या वयाचा म्हणून त्याकडे बघितलं जातं. नवरा बायकोच्या नात्यात वय हे अडथळा आणणारं कारण असलं तरी प्रत्यक्षात अनेक जोडपी या कारणावर मात करत आपलं नातं घट्ट करतात, एकमेकांमधल्या संवादानं इतरांसमोर आदर्श निर्माण करतात. शाहीद कपूर आणि मीरा राजपूत या नवरा बायकोचं नातं असंच एक आदर्श नातं आहे.
छायाचित्र- गुगल
शाहीद आणि मीरा यांच्या वयात असलेल्या 14 वर्षाच्या अंतराची चर्चा आजही होते. पण बाहेर लोक काय म्हणतात याकडे दोघांनीही दुर्लक्ष करुन एकमेकांवर लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामुळेच मीरा म्हणते की, आमच्या दोघांमधे वयातल्या अंतरानं बेबनाव निर्माण होणं केवळ अशक्य आहे. मीराला शाहीद तिच्यापेक्षा 14 वर्षांनी मोठा असल्याचा उलट फायदाच वाटतो.ती म्हणते की वयातल्या या अंतरामुळेच व्यावसायिक दृष्ट्या , वैयक्तिक आयुष्याबाबत शाहीदकडून खूप शिकायला मिळतं. तर शाहीदला वयाच्या या अंतरामुळेच एखाद्या गोष्टीकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन मीराकडून मिळतो. त्यामुळेच शाहीद आणि मीरा यांच्या वयात असलेलं 14 वर्षांचं अंतर हे त्यांच्यासाठी अडथळा न ठरता एकमेकांना नवीन काहीतरी शिकवण्यासाठी पूरक ठरलं आहे.
वेगळी कौटुंबिक पार्श्वभूमी असली की स्त्रीला नवीन आणि वेगळ्या वातावरणातल्या घरात स्वत:ला अँडजेस्ट करणं अवघड जातं. हे एक कारण नवरा बायकोच्या नात्यात दुरावा निर्माण करतं. इतकंच नाही तर या कारणामुळे घरातलेही तिच्यापासून दूर होवू लागतात. एकमेकांच्या मनात कडवटपणा निर्माण होतो. पण ही बाब शाहीद आणि मीराच्या बाबतीत झाली नाही. शाहीदप्रमाणे मीराचं कुटुंब चित्रपट क्षेत्राशी संबंधित नाही. मीरा दिल्लीतली. पण मुंबईतल्या वातावरणाशी ती सहज समरस झाली. मीरा म्हणते की मला माझं लग्न कधीच आव्हान वाटलं नाही. मीराला ना शाहीदच्या कुटुंबाबद्दल काही तक्रार होती ना मुंबईतल्या कलकलाटाबद्दल. सध्या मीराची फॅशन हा चर्चेचा विषय असला तरी मीरानं लग्नानंतर शाहीदच्या म्हणण्यावर पहिल्यांदा रिप्ड जिन्स घातली होती. पण शाहीदच्या सरळ साध्या स्वभावामुळे जीवनातील बदल सहजतेने घेण्याचा दृष्टिकोन आपल्यात निर्माण झाल्याचं मीरा सांगते.
जेव्हा नवरा बायकोपेक्षा वयानं खूप मोठा असेल तर मुलीची काहीतरी पडती बाजू असेल किंवा मुलीला मुलाच्या संपत्तीचा मोह असेल असे तर्क वितर्क लावले जातात. पण शाहीद आणि मीरानं स्वत:च्या नात्याच्या बाबतीत या तर्क वितर्कांना काही जागाच ठेवली नाही. नवरा बायको जर एकमेकांकडे दोघांमधले सर्व फरक बाजूला ठेवून समानतेच्या आणि समजूतदारपणाच्या नजरेतून बघत असतील तर नातं आणि जगणं किती रसाळ आणि आनंदी होतं हे शाहीद आणि मीराकडे बघून लक्षात येतं. दोघांमधल्या समानता, फरक याच्यापलिकडे लग्नाचं नातं असतं , दोघांमधल्या फरकांच्या पलिकडे गेलं तरच नवरा बायको एकमेकांकडून काही घेवू शकतात आणि एकमेकांना काही देवू शकतात. शाहीद आणि मीरानं आपल्या नात्यातून हाच आदर्श इतरांसमोर ठेवला आहे.
छायाचित्र- गुगल
वयातलं अंतर आणि अभ्यास
विज्ञानाच्या आधारावर अटलांटामधील एमोरी विश्वविद्यालयात 3,000 लोकांवर एक अभ्यास केला गेला. हा अभ्यास सांगतो की ज्या जोडप्यांच्या वयात पाच वर्षांचं अंतर असतं त्यांच्यात घटस्फोटाची शक्यता 18 टक्के होते. तर ज्या जोडप्यांच्या वयातलं अंतर एक वर्षाचं अंतर असतं त्यांच्यात घटस्फोटाची शक्यता फक्त तीन टक्केच असते.
तर ज्या जोडप्यात दहा वर्षांचं अंतर असतं त्यांचा घटस्फोट होण्याची शक्यता 39 टक्के एवढी जास्त असते तर ज्यांच्यात वीस वर्षांचं अंतर असतं त्यांच्या बाबतीत घटस्फोटाची शक्यता 95 टक्के असते. एक अभ्यास हे देखील सांगतो की लग्नानंतर ज्यांना मूल होतं त्यांच्याबाबतीत मूल न होणार्या जोडप्याच्या तुलनेत घटस्फोटाची शक्यता 59 टक्क्यांनी कमी असते.
पहिली दोन वर्ष महत्त्वाची
नवरा बायकोच्या नात्यासाठी लग्नानंतरची पहिली दोन वर्षं खूप महत्त्वाची असतात. काही जोडपी या काळात एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतात. एकमेकांना आनंदी ठेवण्यासाठी कष्ट घेतात. अशा जोडप्यांचं पुढंच वैवाहिक आणि कौटुंबिक आयुष्य सुखाचं असतं असं अभ्यासकांना आढळून आलं आहे. तर लग्नानंतर जी जोडपी आपल्या नात्याकडे एक मोठी जबाबदारी म्हणून बघतात, या नात्यामुळे आपल्यावर खूप जबाबदार्या पडल्या असं ज्यांना वाटतं त्यांच्यात नात्याबद्दल, एकमेकांबद्दल नकारात्मक भावना निर्माण होतात. एक अभ्यास सांगतो की लग्न झाल्यानंतर जोडपं पहिली दोन वर्ष एकमेकांसोबत राहिली तर त्यांच्यात घटस्फोटाची शक्यता 43 टक्क्यांपेक्षा कमी होते. तर जी जोडपी लग्नानंतर दहा वर्ष एकमेकांसोबत राहिली आहेत त्यांच्यात घटस्फोट होण्याची शक्यता 94 टक्क्यांनी कमी होते.
छायाचित्र- गुगल
समजूतदारपणा असतो महत्त्वाचा
अभ्यासक म्हणतात नवरा बायकोच्या नात्यात समजूतदारपणाला अतिशय महत्त्व आहे. नवरा बायकोत समजूतदारपणा असेल तर त्यांचं नातं नेहेमीच छान असतं, हे अभ्यासातून दिसून आलं आहे. समजूतदारपणा असेल तर मग दोघांमधे प्रेम निर्माण होतं. आणि ज्या नात्यात प्रेम मजबूत असतं, तिथे वयाचं अंतर सारखी कारण फारच फुटकळ आणि दुर्लक्ष करण्यासारखी होतात.
नवरा बायकोच्या नात्याचा अभ्यासक आणि त्यांचे अभ्यास काय सांगतात हे समजून घेऊन शाहीद आणि मीराच्या नात्याकडे पाहिल्यास बॉलिवूडमधलं हे जोडपं सर्वसामान्यांनाही खूप काही शिकवून जातं. नवरा चित्रपटात व्यस्त असला तरी घराची जबाबदारी आपली आहे हे ओळखून ही जबाबदारी मीरानं समजूतदारपणे स्वत:कडे घेतली. आपला दिसण्यातला, राहाण्यातला साधेपणा नवरा बॉलिवूडमधला प्रसिध्द अभिनेता असला तरी मीरानं सोडला नाही. आणि शाहीदलाही मीराच्या या साध्या सोज्वळ दिसण्याची कधी अडचण वाटली नाही. नात्यात अडथळे, अडचणी येतातच, पण अशा प्रसंगी आम्हीच एकमेकांची ताकद बनून उभे राहातो असं जेव्हा शाहीद आणि मीरा सांगतात तेव्हा नवरा बायकोच्या नात्याकडे बघण्याचा सरळ, साधा पण महत्त्वाचा दृष्टिकोन भावल्याशिवाय राहात नाही.