Lokmat Sakhi >Relationship > मुलांचं ऑनलाइन शिक्षण, त्याने आईबाबांच्ं वाढलं भांडण! घरात तू तू मै मै, यावर उपाय काय..

मुलांचं ऑनलाइन शिक्षण, त्याने आईबाबांच्ं वाढलं भांडण! घरात तू तू मै मै, यावर उपाय काय..

सध्या मुलांचं ऑनलाइन शिक्षण सुरु आहे. पण या शिक्षणातून पालक मुलं, नवरा बायको यांच्यात वाद , संघर्ष आणि अविश्वास निर्माण झाल्याचं चित्र आजूबाजूला दिसतंय. प्रश्न राहातोय बाजुला आणि वाद मोठे होताहेत. हे वाद सोडवण्याचा मार्ग त्या त्या कुटुंबाच्या हातातच आहे. ते कसे आणि कोणते?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2021 07:16 PM2021-08-03T19:16:03+5:302021-08-03T19:24:31+5:30

सध्या मुलांचं ऑनलाइन शिक्षण सुरु आहे. पण या शिक्षणातून पालक मुलं, नवरा बायको यांच्यात वाद , संघर्ष आणि अविश्वास निर्माण झाल्याचं चित्र आजूबाजूला दिसतंय. प्रश्न राहातोय बाजुला आणि वाद मोठे होताहेत. हे वाद सोडवण्याचा मार्ग त्या त्या कुटुंबाच्या हातातच आहे. ते कसे आणि कोणते?

Online education of children, it increased the conflicts between parents! what is the solution? | मुलांचं ऑनलाइन शिक्षण, त्याने आईबाबांच्ं वाढलं भांडण! घरात तू तू मै मै, यावर उपाय काय..

मुलांचं ऑनलाइन शिक्षण, त्याने आईबाबांच्ं वाढलं भांडण! घरात तू तू मै मै, यावर उपाय काय..

Highlightsशाळेतलं वातावरण असं असतं की ते मुलांकडून ते अभ्यास करुन घेतं. असा अभ्यास घरी करुन घेता येत नसल्यानं एक प्रकारचा ताण घरात, नात्यात निर्माण झाला आहे. घरात एकमेकांमुळे ताण निर्माण होत असेल तर स्पष्टपणे बोलून काय करावं, काय करता येईल असा मार्ग काढावा लागेल.पालक मुलांकडे लक्ष देतात म्हणजे त्यांच्यावर खूप जास्त ओरडतात. त्याचाच मुलांना त्रास होतो.

-डॉ.श्रुती पानसे 

मुलांची ऑनलाइन शाळा सुरु आहे. मुलं ऑनलाइन शिकत आहेत. ही वरवर सुरळीत चाललेली घटना दिसत असली तरी आतल्या आत खूप ताण आहे. मुलांना आणि त्यांच्यापेक्षा पालकांना हा ताण जास्त आहे. त्यामुळे बिनसायला लागलंय. आणि हे बिनसणं कुठे धुसफुस स्वरुपात आहे तर कुठे खूप आक्रमक स्वरुपात आहे.
हे का होतंय? कारण सध्या पालकांवर आर्थिक ताण खूप आहे. त्यांच्यातून निर्माण झालेले कौटुंबिक ताणही खूप आहेत. एकीकडे आर्थिक ताण, कौटुंबिक ताण आणि मुलांच्या अभ्यासाचा प्रश्न अशा सर्व ताणांची सरमिसळ म्हणजे आता पालक तोंड देत असलेली परिस्थिती आहे.

छायाचित्र:- गुगल 

मुलांचं शिकणं बदलंय..

मुलं आता ज्या परिस्थितीत अभ्यास करत आहेत, शिकत आहेत हीच मुळी विचित्र आहे. मुलं शाळेत जेव्हा शिक्षकांच्या सोबत असतात तेव्हा नाही म्हटलं तरी एक अंतर असतं मधे. मुलांना याची जाणीव असते की आपण शाळेत आलोय, इथे वेगळं वातावरण आहे, इथले नियम पाळले नाही तर आपल्याला शिक्षा होते किंवा आपले मित्र मैत्रिणी आपल्याला चिडवतात, हसतात. अभ्यास नाही झाला, होमवर्क नाही झाला तर शिक्षा होण्याची भीती असते. हा जो शाळेतला भाग आहे तो घरी पालकांसोबत कसा होणार? कारण शाळेचं वातावरण वेगळंच असतं आणि घरचं वेगळं. कितीही ठरवलं तरी शाळेचं वातावरण घरात निर्माण नाही करु शकत. शालेय वातावरण घरात तयार होवू शकत नाही. आणि मुख्य मुद्दा तिथेच आहे. मुलं शाळेतही टिवल्या बावल्या करायची, अभ्यासाला टाळाटाळ करायची, पण शाळेतलं वातावरण असं असतं की ते मुलांकडून ते अभ्यास करुन घेतं. असा अभ्यास घरी करुन घेता येत नसल्यानं एक प्रकारचा ताण घरात, नात्यात निर्माण झाला आहे.

नात्यातल संघर्ष तो का?

आर्थिक ताण हा कुटुंबावर असतो, तो काही एका व्यक्तीवर नसतो. पण सध्या घरात अती ताण असलेली व्यक्ती म्हणजे आई आहे. ऑंनलाइन शिक्षणाच्या वातावरणात आईनं मुलांजवळ बसून अभ्यास करुन घ्यावा अशी एक अपेक्षा निर्माण झाली आहे. हे जर जमलं नाही तर अनेक मुलं नीट अभ्यास करत नाहीये हे वास्तव आहे. घरातलं काम, बाहेरची कामं, ऑफिस व्यवसायाची कामं आणि मुलांच्या ऑनलाइन अभ्यासाकडे लक्ष असा सगळा ताण आई वर्गावर आला आहे. आई बाबांना आपआपले ताण हाताळण्यात अपयश येत आहे, मुलांकडून अशा परिस्थितीत कसा अभ्यास करुन घ्यावा हे कळत नसल्यानं तो एक गोंधळ आहे. आणि त्यातून संघर्ष निर्माण झाला आहे. हा वरवर मुलांचा ऑनलाइन अभ्यास आणि मुलं आणि पालकांमधला संघर्ष असा एकरेषीय नसून या संघर्षाला विविध ताणांचे किनार आहेत.

छायाचित्र:- गुगल 

एकमेकांबरोबर बसा -मोकळं बोला

हा संघर्ष सोडवायचा असेल तर असह्य झालेल्या ताणाला संवादातून मार्ग उपलब्ध करुन देणे हाच उपाय आहे. सर्वांनी एकत्र बसून शांतपणे बोलणं हा उत्तम मार्ग आहे. घरात एकमेकांमुळे ताण निर्माण होत असेल तर स्पष्टपणे बोलून काय करावं, काय करता येईल असा मार्ग काढावा लागेल. हा प्रश्न वरवर सरसकट वाटत असला तरी तो त्या त्या कुटुंबाचा प्रश्न आहे. त्यामुळे तो कुटुंबानं एकत्र बसून सोडवायचा आहे. आपल्याकडील कुटुंबव्यवस्था अशी आहे की आपल्यावर कसला ताण येतोय हे आपण आपल्या जवळच्या माणसाकडेही मोकळेपणानं सांगू शकत नाही. कारण आपल्याकडे माणसांना गृहीत धरलं जातं. अमूक हे हा करेल, तमूक ती करुन घेईल, हे हिचंच काम आहे, हे ती करेलच. या टाइपचे गृहीतकं असतात.पण हे गृहीतकं सदा सर्वकाळ वास्तवात उतरतीलच असं नाही. सध्या कोरोना काळानं निर्माण झालेली परिस्थिती अशीच आहे. जे कोणी एकमेकांकडून अमूक तमूक होणं गृहीत धरतंय ते होत नाहीये. त्यामुळे सर्वात मोठी गरज आहे की मुलं, आई-बाबा, घरात आजी आजोबा, काका-काकू असतील तर त्या सर्वांनी एकत्र बसून चर्चा करणं, संवाद साधणं गरजेचं आहे.
घरं छोटी असतात. मुलांना अभ्यासाला वेगळी जागा किंवा खोली मिळेलच असं नाही. अशा वेळेस घरातल्या सदस्यांच्या बोलण्याचा आवाज, टीव्हीचा आवाज यामुळे मुलं ऑनलाइन अभ्यासात लक्ष केंद्रित करु शकत नाही. आणि मोठ्यांना फक्त त्यांचं लक्ष विचलित होणंच दिसतं. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे एकमेकांशी बोलून प्रश्नांवर उपाय शोधले पाहिजेत. आणि जोपर्यंत उपाय निघत नाही तोपर्यंत मीटिंग संपवायचीच नाही. बैठक मोडायची नाही. कारण ताण निर्माण करणारे प्रश्न सुटले नाही तर त्याचे इतर गंभीर परिणाम होतात. आणि कुटुंबातील ताण सोडवण्याचा मार्ग म्हणजे सगळ्यांनी एकत्र बसून बोलणं, उपाय शोधणं हे गरजेचं असतं. हे आता आपल्याला आपल्या घरात घडवून आणावं लागेल. आपल्याकडील कुटुंबात एकत्र बसून बोलून, चर्चा करुन संवादाने प्रश्न सोडवण्याची पध्दत आणि सवय नाहीये. ते एकदा केलं तर बरेच प्रश्न सुटतील, संघर्ष निवळतील.

छायाचित्र:- गुगल 

अविश्वासावर उपाय काय?

घरात मुलं ऑनलाइन अभ्यास करताना आणखी एक संघर्ष निर्माण झाला आहे. मुलं आणि पालक यांच्यात निर्माण झालेला अविश्वास. ऑनलाइन अभ्यासाच्या निमित्तानं मुलं ऑनलाइन जगात इतर नको असलेल्या गोष्टी गुपचुपपणे करु लागले आहेत . आणि पालकांना हे समजल्यावर त्यांच्यात मुलांबद्दल राग, अविश्वास अशा भावना निर्माण होत आहेत. त्यातून पालक बाळगत असलेली सावधगिरी किंवा लक्ष मुलांना पहारा वाटतो आहे, आपण स्वतंत्र नाहीये अशी भावना मुलांमधे निर्माण होऊन मुलं पालकांवर चिडचिड करत आहेत. पालक आणि मुलं दोघंही एकमेकांवर खूश नाहीये. ही विचित्र परिस्थिती हातळण्याचे मार्गही घरातच आहेत. यासाठी पालकांनी मुलांना विश्वासात घेऊन जे तू करतोय/ करतेय त्यात काय धोका आहे हे समजून सांगावं, ऑनलाइन जगात वावरताना काय काळजी घ्यायची आहे हे सध्या मुलांना सांगणं गरजेचं आहे. तू हे बघू नको, अमूक शोधू नको असं म्हणून नाही चालणार. कारण नको म्हटलं तर मुलं मुद्दाम जाऊन ते बघणार आणि शोधणारच. म्हणून मुलांना आधी हे सांगावं की काय घातक आहे आणि का? हे सांगूनही मुलं सीमारेषा ओलांडत असतील तर त्यांना हे स्पष्ट सांगावं की तुला हे सोडवत नाहीये, आम्ही सतत तुझ्यासोबत राहू शकत नाहीये तर किमान इथे वावरताना तू काय काळजी घ्यावी हे मुलांना पालकांनी सांगायला हवं.

आणि दुसरा पर्याय म्हणजे हा काही एकट्या दुकट्या मुलांचा आणि त्यांच्या पालकांचा प्रश्न नाही. असे प्रश्न इतर मुलं आणि पालकांनाही येत आहेत. तेव्हा दुसरा पर्याय म्हणजे सर्व पालकांनी एकत्र येणं आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी एकमेकांना सपोर्ट करणं, तसा सपोर्ट ग्रूप तयार झाला तर त्याचा फायदा नक्कीच होतो. कारण आपलं मूल आपलं ऐकत नाही पण मित्र मैत्रिणीच्या पालकांनी सांगितलं तर ते ऐकतं हे सर्वसाधारणपणे होतं. त्यामुळे सर्व पालकांनी मिळून सर्व मुलांना एकत्र सांगितलं तर त्यांच्या लक्षात येईल की आपले आई बाबा आणि इतर मुलांचे आई बाबाही हे सांगत आहेत हे बघून मुलांवर थोडा दबाव निर्माण होवून त्यांच्या ऑनलाइन बेजबाबदार वावरण्यावर नियंत्रण येईल.

छायाचित्र:- गुगल 

मिळून काम करा आनंद शोधा!

आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे मुलं ऑनलाइन शिकत आहेत त्यानिमित्ताने ते ऑनलाइन जास्त राहू लागली आहे. मुलांचं हे अवाजवी ऑनलाइन राहाणं पालकांना खटकतंय. पण मोठयांनी हे समजून घ्यावं की मुलं तर आता ऑनलाइनच्या आहारी गेलीयेत पण मोठी माणसं खूप आधीपासून आहारी गेलीयेत आणि आता कोरोना काळात मोठी माणसंही दोन घटक आनंद आणि मनोरंजन शोधायला येता जाता मोबाइल किंवा माध्यमांचाच आधार घेत आहेत. मुलं हेही बघत आहेतच. मग तुम्ही बघू शकता मग आम्ही नाही असं भांडण उभं राहातंय. या भांडणावर उपाय म्हणजे मुलं आणि पालक मिळून काहीतरी मन रमवणारी अँक्टिव्हिटी करणं. यातून मुलं आणि पालक यांच्यातलं नातं घट्ट होतं. पालक आणि मुलांनी एकत्र मिळून काही केलं तर मुलांना त्यांच्या त्यांच्या म्हणून करता येईल अशा अँक्टिव्हिटी देणं योग्य होईल. यामुळे काय होईल की मुलांचा मेंदू जो बंद झाल्यासारखा झाला आहे तसं होणार नाही. पालक अभ्यास कर अभ्यास कर म्हणत मुलांच्या मागे लागतात पण अभ्यास करण्याचा मार्ग सांगत नाहीत.अशा उपक्रमातून ते मार्ग पुढे येतील.

लक्ष आणि पहारा यात फरक असतो !

पालकांनी मुलांकडे लक्ष द्यावं. त्यांच्यावर पहारा ठेवू नये. आणि लक्षही असं ठेवावं की मुलांच्या ते लक्षात येणार नाही. म्हणजे पालकांनी मुलांवर लक्ष दुप्पट द्यायचं पण त्यांना ते दाखवायचं नाही. आपल्याकडचे पालक मुलांकडे लक्ष देतात म्हणजे त्यांच्यावर खूप जास्त ओरडतात. त्याचाच मुलांना त्रास होतो. म्हणून लक्ष देताना ओरडणं टाळून त्याच्याऐवजी सतत बोलणं, समजून घेणं हाच मार्ग नात्यात निर्माण होणार्‍या संघर्षावर उपाय शोधण्यास यशस्वी होईल.

( डॉ. श्रुती पानसे या मेंदू आणि शिक्षण या विषयातील संशोधिका आहेत.)

ishruti2@gmail.com

शब्दांकन:- माधुरी पेठकर

Web Title: Online education of children, it increased the conflicts between parents! what is the solution?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.