नात्यात एकमेकांना वेळ देणे, एकमेकांशी संवाद साधणे खूप महत्त्वाचे आहे. मात्र, या धावपळीच्या जीवनात असं घडताना दिसून येत नाही. आपल्या जोडीदारासाठी अनेकांना वेळ देता येत नाही. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला ती गोष्ट खटकते. नात्यात वेळ देणे खूप महत्त्वाचे आहे. पार्टनर जर वेळ देत नसेल. तर, बहुतांश वेळा नात्यात वाद निर्माण होतात. दोघांमधील भांडण हळूहळू वाढत जातात आणि हे प्रकरण ब्रेकअपपर्यंत पोहोचते. अनेक वेळा तुम्ही तुमच्या पार्टनरला डिस्टर्ब करू इच्छित नाही. अशा परिस्थितीत जोडीदाराला त्रास देण्याऐवजी आणि भांडण करण्याऐवजी या टिप्सना फॉलो करा. जोडीदारासह वेळही घालवता येईल आणि वाद ही होणार नाही.
जोडीदारासह बोलण्याचा प्रयत्न करा
कोणतीही समस्या बोलून सोडवता येते. पार्टनर ऑफिसच्या कामात खूप व्यस्त असतो. त्यांच्यावर कामाचा अधिक व्याप देखील असू शकतो. त्यामुळे त्यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांच्यासह बोलण्याचा प्रयत्न करा. त्यांचे म्हणणे ऐकून घ्या. जोडीदाराच्या कामाच्या संबंधित गोष्टी विचारा. यामुळे पार्टनर तुम्हाला कामामुळे वेळ देत नाही किंवा इतर काही गोष्ट आहे का, हे स्पष्ट होईल.
आनंदी रहा
चांगले नातेसंबंधासाठी, आपण आधी स्वतः आनंदी असणे आवश्यक आहे. जोडीदार वेळ देत नसेल तर दुःखी होऊ नका तर आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. दुःखी होऊन स्वतःला त्रास देऊ नका. जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा आपल्या पार्टनरला देखील चांगलं वाटतं. जोडीदार देखील तुम्ही खूश आहात हे बघून आनंदी राहतो.
घरी डेट प्लॅन करा
कामाच्या व्यापामुळे त्यांना तुमच्यासाठी वेळ देता येत नसेल. त्यामुळे नाराज न होता घरीच आपल्या पार्टनरसाठी विशेष तयारी करा. कुठेही बाहेर जाण्यापेक्षा घरातच डेट प्लॅन करा. आवडीचे जेवण बनवा, एकत्र जेवण करा, चित्रपट बघा अथवा इतर काही. अशाप्रकारे तुम्ही घरीच आपल्या पार्टनरसाठी डेट प्लॅन करू शकता.
सरप्राईज गिफ्ट द्या
नातेसंबंध आनंदी ठेवण्यासाठी एक आवडीची वस्तू पार्टनरला द्या. तुम्ही तुमच्या पार्टनरला वेळोवेळी सरप्राईज देऊन क्षण खास बनवू शकता. तुमच्या जोडीदाराला भेटवस्तू देऊन तुम्ही तुमच्या नात्यासाठी व्यस्त दिनक्रमातून थोडा वेळ नक्कीच काढू शकता.