Join us  

छळकुटी बायको नको म्हणून पिंपळ पौर्णिमा! औरंगाबादला काही पुरुषांनी का घातलं पिंपळाला साकडं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2022 8:34 PM

जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून महिला वटपौर्णिमा साजरी करतात, तर औरंगाबादला मात्र या छळकुट्या बायकोपासून मुक्ती दे रे बाबा म्हणून अनेक पत्नीपिडित पुरुष पिंपळाला साकडं घालत पिंपळपौर्णिमा साजरी करतात. बघा ही पिंपळपौर्णिमा नेमकी असते तरी कशी...

ठळक मुद्दे काही ठिकाणी आता पुरुष सबलीकरण करण्याची गरज आहे, असे या पत्नीपिडितांचे म्हणणे आहे. म्हणूनच त्यांच्या मागण्यांचीही दखल घेतली जावी आणि पुरुषांवरही होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली जावी, या उद्देशाने हा आश्रम सुरु करण्यात आला आहे. 

छळणाऱ्या बायकोपासून मुक्ती मिळावी म्हणून औरंगाबाद येथे काही समदुखी नवरोबांनी एकत्र येऊन वाळूज परिसरात पत्नीपिडित आश्रम उभारला आहे. या आश्रमातच दरवर्षी वटपौर्णिमेच्या पुर्वसंध्येला पिंपळपौर्णिमा साजरी केली जाते. २०१२ या वर्षी या आश्रमाची सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी पिंपळपुजा केली जाते. या पुरुषांचे म्हणणे असे आहे की इतर महिलांप्रमाणे पत्नी पीडितांच्या बायका वटपौर्णिमा करतात आणि नवऱ्याला जिवंतपणी मरण यातना देतात. एकीकडे भांडायचे, नवऱ्याला छळायचे. मग ती पूजा नेमकी कुणासाठी व कशासाठी करायची, हा या परुषांचा सवाल आहे. पण पिंपळाचीच पुजा का याविषयी त्यांचे म्हणणे आहे की वटपोर्णिमा साजरी केल्याने सात जन्म हाच नवरा मिळतो, असं म्हणतात. मग तसंच पिंपळ हा मुंजा मानला जातो. म्हणून हे पुरुष पिंपळ पूजन करतात "हे मुंजा आम्हाला अश्या भांडखोर बायका देऊन मरण यातना देण्यापेक्षा कायम स्वरूपी मुंजा (ब्रह्मचारी) ठेव, अश्या भांडखोर बायका आम्हाला सात जन्म तर काय पण सात सेकंद देखील नको", असं मुंजाकडे साकडं घालतात. 

 

पुर्वी स्त्रिया अबला होत्या. त्यांच्याकडे कोणतेही हक्क, अधिकार नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर अन्याय व्हायचे. पण आता मात्र महिला सबला झाल्या आहेत. त्यांच्यासाठी अनेक कायदे बनवले गेले, पण ते कायदे बनवून महिलांना सबला बनवताना पुरुष मात्र अबला होणार नाहीत, याची कोणतीही दखल घेतली गेली नाही. काही स्त्रियांनी पुरुषांना केव्हाच गुलाम बनवले आहे. आज प्रत्येक कायदा हा स्त्रियांच्या बाजूने असून काही ठिकाणी याचा गैरफायदा घेतला जातो. पुरुषांना छळण्यासाठी कायद्याचा उपयोग केला जात आहे. त्यामुळे काही ठिकाणी आता पुरुष सबलीकरण करण्याची गरज आहे, असे या पत्नीपिडितांचे म्हणणे आहे. म्हणूनच त्यांच्या मागण्यांचीही दखल घेतली जावी आणि पुरुषांवरही होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली जावी, या उद्देशाने हा आश्रम सुरु करण्यात आला आहे. 

 

बायकोकडून होणारा नवऱ्याचा छळ पाहून अनेक युवकांचा विवाहावरचा विश्वास उडत आहे. याचा परिणाम विवाहसंस्थेवर होत असून लग्न करणे म्हणजे सर्वात मोठा गुन्हा केल्याप्रमाणे झाले आहे. आमचे हे गाऱ्हाणे आम्ही शासनापुढे वारंवार मांडतो आहे. परंतु शासन आणि समाज पुरुषांवरही अन्याय होतो, हे स्विकारायला तयार नाहीत. पुरुषांच्या बाजूनेही कायदे करावेत, पुरुषांना देखील सन्मानपूर्वक वागणूक मिळावी, पुरुषांच्या  अधिकारांवर गदा येऊ नये ,पुरुषांसाठी पुरुष आयोग स्थापन करावा, एकतर्फी कायदे संपवून लिंग भेद न करता कायदे तयार करावे, अशा या पत्नीपिडितांच्या मागण्या आहेत, असे आश्रमाचे संस्थापक अध्यक्ष भारत फुलारे, भाऊसाहेब साळुंके ,पांडुरंग गांडुळे, सोमनाथ मणाळ, चरणसिंग गुसिंगे, भिक्कन चंदन, संजय भांड यांनी सांगितले.

 

टॅग्स :रिलेशनशिपसोशल व्हायरलमहिला