Join us  

प्रेम सिध्द करण्यासाठी ते ‘दोघे’ विष प्याले ! -माझ्यासाठी जीव दे म्हणणारं, हे कोणतं प्रेम?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 1:47 PM

प्रेमाची परीक्षा पाहणं, एकमेकांना ती द्यायला लावणं आणि आपण कसं प्रेम सिद्ध केलं हे जगजाहीर समाज माध्यमात सांगणं हे कुठलं भलतंच नातं. त्यापायी अलीकडेच एका जोडप्यावर आपला जीव गमावण्याची पाळी आहे. हे असलं कसलं प्रेम, जे परीक्षाच पाहतं.. 

ठळक मुद्देअसल्या वेडेपणाला आता समाजमाध्यमांचीही सॉलिड फोडणी आहे. त्यावर लाइक्स मिळविण्यासाठीही लोक अशा गोष्टी करतात.

 गौरी पटवर्धन

“माझं तिच्यावर इतकं प्रेम आहे की मी तिच्यासाठी काहीही करू शकतो...” “त्याच्यासाठी मी काहीही करू शकते... जीवसुद्धा देऊ शकते!”“तुझं माझ्यावर खरंच प्रेम असेल तर तू अमुक करशील का?”“तू तमुक केलंस तरच मी समजेन की तुझं माझ्यावर खरं प्रेम आहे.”“प्रेमाच्या गप्पा तर कोणीही मारतं... पण, जे एकमेकांसाठी जीव देऊ शकतात तेच खरं प्रेम!”अशा प्रेमाच्या वाट्टेल त्या व्याख्या तरुण मुलांमध्ये कायमच फेमस असतात. त्यात जिथे मुलांची क्रिएटिव्हिटी कमी पडते तिथे सिनेमे त्यांना वाट्टेल तेवढं मटेरिअल पुरवत असतात. त्या सिनेमातले कलाकार धोक्याच्या सीनमध्ये डमी वापरतात. ग्लिसरीनचे अश्रू ढाळतात. मेकअप दादा त्यांच्या चेहेऱ्यावर खोटं रक्त लावून देतात. हे सगळं करण्याचे ते भरपूर पैसे घेतात. आणि काही वेळा तर ऑन स्क्रीन ज्याच्यासाठी / जिच्यासाठी त्यांनी जीव दिलेला असतो त्या व्यक्तीशी ते प्रत्यक्ष आयुष्यात बोलतसुद्धा नाहीत इतके त्यांच्यातले संबंध वाईट आणि ताणलेले असतात. तरुण मुलं सिनेमा बघतात त्या वेळी कलाकार, दिग्दर्शक, डमी, ॲक्शन सीनवाले असे सगळे जण ते प्रोजेक्ट केव्हाच संपवून आपल्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये बिझी होऊन गेलेले असतात. आणि मागे फक्त उरलेला असतो एक प्रश्न “मेरे प्यार के खातिर तुम क्या कर सकते हो?”

बरं यामागे केवळ सिनेमे दोषी असतात असं नाही. पण, त्यांचा विशेषतः तरुण माणसांवर प्रभाव फार असतो म्हणून सिनेमे आणि वेबसीरिजचं नाव सगळ्यात आधी घ्यावं लागतं.पण, त्याव्यतिरिक्त केवळ तरुण वयातच असतो तसा माठ बेदरकारपणा आणि बेदरकरपणालाच शौर्य समजण्याचा माठपणा हे हार्मोनल गडी असतातच. त्यातूनच मग एकमेकांचं नाव रक्तानं लिहिणं, हातावर ब्लेडनं कोरणं आणि त्यालाच प्रेम समजणं असा एक सॉलिड गोंधळ १५ ते २५ या वयात दिसतो. काहींच्या बाबतीत ते थोडं आधी सुरू होऊन उशिरापर्यंत रेंगाळूही शकतं. पण, ही जी प्रेमाची व्याख्या आपण करतोय ती खरंच प्रेमाची व्याख्या आहे का, याचा विचार मंडळी करताना दिसत नाहीत.बरं हे सगळं केवळ कॉलेजमधील तरुण प्रेमात पडलेली शिंगरे करत असतील तर गद्धे पंचविशी म्हणून सोडूनही देता आलं असतं. मात्र आताशा सोशल मीडियाच्या काळात ‘पीडीए’ वाढला, अर्थात पब्लिक डीस्प्ले ऑफ अटेंशन. त्यात ते दोघे सतत कनेक्टेड. अगदी लग्नाच्या नात्यातही परस्परांवरचं प्रेम सतत परस्परांना आणि इतरांना दाखवत राहण्याची एक सतत होड, असंही चित्रही अवतीभोवती वाढतं आहे. ते जोवर त्या दोघांच्या नात्यापलीकडे इतरांना अपायकारक ठरत नाही, तोवर त्याची काही चर्चा नसते. मात्र नुकत्याच घडलेल्या एका घटनेनं मात्र हे ‘प्यार के लिए कुछ भी, प्रेम सिद्ध करणं’ हे किती टोकाला जाऊ शकतं हे जगजाहीर समोर ठेवलं. अलीकडची बातमी अशी की, एका लग्न झालेल्या जोडप्यानं ट्रूथ ऑर डेअरच्या खेळात उंदीर मारायचं विष घातलेलं कोल्ड ड्रिंक प्यायलं. त्यात त्या महिलेचा अंत झाला आणि तिचा नवरा आयसीयूमध्ये ॲडमिट. पण, इथे हा खेळ संपत नाही. या प्रकारात संपूर्णपणे निर्दोष असलेल्या एका तिसऱ्या व्यक्तीसाठी हा खेळ आत्ता कुठे सुरू झालाय. त्या दोघांच्या एक वर्षाच्या मुलीसाठी!त्या दोघांना एक वर्षाची मुलगी आहे. त्या दोघांनी ‘आपलं एकमेकांवर किती प्रेम आहे आणि ते सिद्ध करण्यासाठी आपण काहीही करू शकतो’ याच्या नादात तिची आई आयुष्यभरासाठी हिरावून घेतली आहे. ही मुलगी मोठी झाल्यावर या प्रकाराकडे ‘प्रेम’ म्हणून बघेल? बघू शकेल का?इथे हे एक वर्षाचं लेकरू आहे, बाकी ठिकाणी इतर नातेवाईक असतात. किंवा परस्परांना प्रेम सिद्ध करायला लावत तुझा माझ्यावर भरवसा नाही का म्हणून नात्यात काच आणणारी जोडपी असतात. कोणासमोर तरी आपलं ‘सो कॉल्ड प्रेम’ सिद्ध करण्याच्या नादात माणसं एका फटक्यात अशी बेजबाबदार वागू लागतात.विरोध प्रेमाला नाही. विरोध ते सिद्ध करण्यालाही नाही. तर अशा आयुष्यभराचं नुकसान करणाऱ्या गोष्टींना प्रेमाचं नाव देण्याला विरोध आहे. असल्या विषारी संकल्पनांच्या मागे आंधळेपणाने जाण्याला आहे.

तुझं माझ्यावर प्रेम असेल तर तू फुटलेल्या काचांवर चालून माझ्याकडे येशील, असं जर का एखाद्यानं म्हंटलं, आणि ती मुलगी जर का तशी त्याच्याकडे गेली तर आपण एक वेळ हे मान्य करू की तिचं खरंच त्याच्यावर प्रेम आहे. पण, त्याचं काय? जो माणूस आपल्या प्रेमाच्या माणसांना असा त्रास देतो, वेदना देतो, त्यांचं आयुष्य पणाला लावतो त्याचं प्रेम कुठे आहे? तो तर फक्त ‘ती मुलगी माझ्यासाठी फुटलेल्या काचांवरसुद्धा चालते,’ असं म्हणून स्वतःचा इगो कुरवाळून घेत असतो. कारण त्याचं तिच्यावर प्रेम असतं, तर तिला अशा वेदना होणं त्याला सहनच झालं नसतं. अशा वेळी तिचं जरी त्याच्यावर खरं प्रेम असेल, तरीही तिनं ते करावं का? इतकं प्रेम देणाऱ्या व्यक्तीला बदल्यात प्रेमाच्या ऐवजी अशी कुठलीतरी ओंगळ भावना का मिळावी?असल्या वेडेपणाला आता समाजमाध्यमांचीही सॉलिड फोडणी आहे. त्यावर लाइक्स मिळविण्यासाठीही लोक अशा गोष्टी करतात. त्यातून त्यांच्या मते काहीतरी सिद्धदेखील करतात. फक्त ते प्रेम नसतं हे त्यांच्या लक्षात येत नाही!