प्रेम आंधळं असतं आणि प्रेमात असलेल्या माणसांच्या वाटेत वयाची बंधनं येत नाहीत असं नेहमीच म्हंटलं जातं. हे त्याचंच उदाहरण. थायलंडमधली ही घटना. एका १९ वर्षीय तरुणाने चक्क ५६ वर्षीय महिलेसोबत साखरपूडा केला. त्यांच्या वयात ३७ वर्षे अंतर आहे. आणि त्यातही चर्चा ही की एका तरुणानं इतक्या वयस्कर स्त्रीसोबत साखरपूडा केला. ( वयस्कर पुरुषांशी तरुण मुलींनी लग्न करणं तसं समाजमान्यच म्हणायचं जगभर.)
१९ वर्षांचा हा तरुण, वुथिचाई चैंटराज त्याचं नाव. ५६ वर्षांच्या जनला नामुआंगरक यांच्या शेजारी राहत होता. जनला यांचा घटस्फोट झाला होता. ती आपल्या घरी एकटीच राहत होती. त्यामुळे घरातील इतर कामं करण्यासाठी ती नेहमी वुथिचाईला घरी बोलवायची. घरामध्ये काम करत असतानाच त्यांची मैत्री इतकी घट्ट झाली की ते काही दिवसानंतर प्रेमात पडले. बाहेर फिरायला जायचे, एकत्र रेस्टोरेंट्समध्ये जेवायला जायचे. त्यांनी पार्कमध्ये अनेकदा एकमेकांचे खुलेआम चुंबन घेतले आहे. ‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो’ असा काहीसा प्रकार त्यांच्यामध्ये दिसून येतो. आता त्यांच्या रिलेशनशिपला दोन वर्ष पूर्ण झाले आहेत. त्या दोघांनी नुकताच साखरपुडा केला आणि आपण लवकरच लग्न करणार असल्याची घोषणा केली.
त्यांच्या रिलेशनशिपविषयी वुथिचाई चैंटराज सांगतो, ‘दोन वर्ष झाले मी जनलाला ओळखत आहे. तिच्या आधीच्या लग्नाला २० वर्ष झाली आहेत. तिला ३ मुले देखील आहेत. ती खूप इमानदार आणि चांगली आहे. मला ती खूप आवडते. मला तिचं पुढील आयुष्य खूप आरामदायक बनवायचं आहे.’
जनला म्हणते, ‘जेव्हा मी माझ्या मुलांना आमच्या रिलेशनशिपसंदर्भात सांगितले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. परंतु, आता आम्ही जास्त कोणाकडे लक्ष देत नाही. आम्हा दोघांना एकेमेकांसह वेळ घालवायला आवडतो.’’