सायली जोशी-पटवर्धन
भावा बहिणीचे नाते जितके खास असते तितकेच घट्ट नाते बहिणींचे असते. एकमेकींसाठीचा भक्कम आधार, प्रसंगी आई बनून मायेनं एकमेकींना जपणं, रुसवे-फुगवे आणि तरीही नात्यात असलेली निखळ मैत्री असं काहीतरी अजब रसायन असतं या बहिणींच्या नात्याचं. वयातलं अंतर कमी असेल तर मग तर काही विचारायलाच नको. सतत एकमेकींच्या सोबत काहीतरी खुसफूस करणाऱ्या आणि आई-बाबांची नजर चुकवून काही ना काही बेत करणाऱ्या या बहिणी एकमेकींच्या जबाबदाऱ्या कधी घ्यायला लागतात हे त्यांचं त्यांनाही कळत नाही. शाळेत एकमेकींचा हात धरुन सोबत जाणाऱ्या या चिमुकल्या मोठेपणीही कठिण प्रसंगी आपल्या बहिणीची सावली बनून उभ्या राहतात तेव्हाच या नात्याचं खरं मोल लक्षात येतं. ताईचा धाक आणि तिचीच प्रेमाची साथ सगळंच हवंहवंसं वाटतं. उत्तम अभिनेत्री असलेल्या मृण्यमी देशपांडे आणत्र गौतमी देशपांडे ही अशीच एक देखण्या बहिणींची प्रेमळ जोडी. राखीपौर्णिमेनिमित्त मृण्मयीशी ‘लोकमत सखी’ने खास गप्पा मारल्या (Rakhi purnima Special Mrunmayee and Gautami Deshpande Sisters Relationship)..
मृण्मयीशी मनमोकळ्या गप्पा..
१. राखी पौर्णिमेला राखी बांधायला भाऊ नाही असं कधी वाईट लहानपणी वाटलं होतं का?
भावाची कमी अशी कधी वाटलीच नाही याचं महत्त्वाचं कारण म्हणजे चुलत आणि आते भावंड आहेत आणि ती सख्यासारखीच किंवा त्याहून जास्त जवळची आहेत कायमच. त्यामुळे सख्खा भाऊ नाही असं कधीच वाटलं नाही. माझ्या आणि गौतमीच्या नात्यात म्हणाल तर भावाचं काम कायम मी केलेलं आहे.
२. भावाबहिणीसारखा बहिणींचा बॉण्ड, नातं, दोस्ती कसं वेगळं असतं?
भावाबहिणींपेक्षा बहिणींचा बॉंड खूपच वेगळा असतो. कारण या नात्यात कोणताच आडपडदा नसतो, बहिणीशी आपण मनातलं सगळंच शेअर करु शकतो. जीव दोन असतात पण मन एकच असतं असं आपण म्हणू शकतो. दोस्तीच्या लेव्हलवर तर बहिणी असतातच कारण आमच्यात एकही सिक्रेट नाही आमचं सगळं एकमेकींना माहिती आहे. एकमेकींचा आधार आणि सोबत तर खूप जास्त आहे कारण गौतमी आहे आणि ती अमुक गोष्ट सांभाळेल अशी मला खात्री असते म्हणून मी वाट्टेल ते करु शकते आणि तिचंही माझ्याबद्दल हेच मत आहे.
३. मोठं होत जाताना या बदलत्या नात्याकडे, नात्यातलं प्रेम, पझेसिव्हनेस, हक्क आणि शेअरिंग या सगळ्याकडे कसं पाहता?
आम्ही जशा मोठ्या होत गेलो तसं आमच्या नात्यातलं प्रेम, पझेसिव्हनेस, हक्क, शेअरींग या गोष्टी टप्प्याटप्प्याने वाढतच गेल्या. लग्नानंतर पझेसिव्हनेस वाढतो हे नक्की. आता आमच्यात जेवढी भांडणं होतात ती ताई तू मला वेळ देत नाही यावरुन गौतमी माझ्यावर फुगलेली असते. पण स्वप्निलच्या रुपाने तिला आणखी एक भाऊ मिळाला याचाही तिला आनंद असतो. जगात माझ्या आयुष्याबद्दल गौतमीला जितकं माहितीये तितकं कोणालाच माहिती नाहीये हेही तितकंच खरंय.
४. राखीपौर्णिमा कशी सेलिब्रेट करता?
गौतमी मला राखीपौर्णिमेला राखी बांधते. आम्ही या सणाची कायमच उत्सुकतेने वाट पाहतो. सगळीच भावंडं या निमित्ताने एकत्र येतात आणि गॉसिपपासून सेलिब्रेशनपर्यंत सगळंच या निमित्ताने होत असतं.
५. मोठी बहिण म्हणून तू गौतमीसाठी कधी, कशी प्रोटेक्टीव्ह राहीलीयेस का?
मोठी बहिण म्हणून मी गौतमीसाठी कायमच प्रोटेक्टीव्ह राहिलेली आहे. माझ्या त्या स्वभावामुळे तिच्यापर्यंत थेट कोणीच पोहोचलेले नाहीये. कारण त्याच्या मध्ये मी असते. लोकं अनेकदा तिच्याशी घाबरुन वागतात किंवा वागताना माझी बहिण म्हणून शंभरवेळा विचार करतात हेही तितकंच खरं आहे. गौतमीला कधी कोणी काही बोललं की तिने काही बोलण्याच्या आधी त्या व्यक्तीला माझीच १०० वाक्य ऐकावी लागतात. तिच्यासाठी मी कायमच तलवार घेऊन उभी असते असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. प्रत्येकच मोठं भावंडं लहान भावंडासाठी ज्याप्रमाणे प्रोटेक्टीव्ह असतं त्याचप्रमाणे आम्हीही या गोष्टीला अपवाद नाहीच.