Join us  

सेक्सनंतर अनेक महिलांना नाजूक जागी खूप दुखतं-आग होते? डॉक्टर सांगतात कारणं आणि उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2023 1:50 PM

Reasons and Solutions of Paining after Sex : शारीरिक संबंधांनंतर अनेक महिलांना वेदना होतात, मात्र त्यासाठी उपचार घेतले जात नाहीत. त्रास सहन करणं हा पर्याय नव्हे..

शारीरिक संबंध सुखाचा झाला तरी माझ्या योनीमार्गात प्रचंड दुखतं, वेदना होतात? हे सारं का होते? त्यामुळे ‘ते’ सारे नको वाटते, काय करावे? 

शारीरिक संबंध ठेवणे ही आनंद देणारी बाब असते. जोडीदारांपैकी दोघांच्याही इच्छेने झालेले संबंध आपल्याला आतून सुखावणारे असतात. यामुळे नाते तर बहरतेच पण विविध प्रकारचे हार्मोन्स शरीरात निर्माण झाल्याने मनही आनंदी होते. मात्र काही महिलांना संबंधांनंतर योनी मार्गात वेदना होतात. अशा वेदना होणे सामान्य नसल्याने त्यामागे नेमकी काय कारणे आहेत ते समजून घ्यायला हवे. असं दुखणं अनेक गंभीर आजाराचं कारणही ठरू शकतं. कधीकधी लैंगिक वेदना आणि परिणामी योनीतून होणारा स्त्राव महिलांना अस्वस्थ करतो (Reasons and Solutions of Paining after Sex) .

 याबाबत उघडपणे फारसे बोलले जात नसल्याने अशाप्रकारच्या वेदना आपल्यालाच होतात की इतरांनाही होतात हे अनेकांना माहित नसते. तसेच याबाबत डॉक्टरांशी किंवा ओळखीच्यांशी बोलण्याबाबतही मनात संभ्रम असतो. त्यामुळे ही समस्या वेळीच दूर न होता वाढण्याची शक्यता असते. योनीमार्गात आग होणे, वेदना होणे, पोटत दुखणे, पोट जड झाल्यासारखे वाटणे अशा विविध समस्या महिलांना भेडसावू शकतात यामागे नेमकी काय कारणे असतात आणि त्या समस्या दूर करण्यासाठी काय करायला हवे याविषयी…

याबाबत प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वैजयंती पटवर्धन सांगतात...

शारीरिक संबंधांच्या वेळी अशाप्रकारे दुखणे अतिशय सामान्य आहे. याची प्रामुख्याने कोणती कारणे असतात ते पाहूया...

१. सेक्सच्या सुरुवातीच्या काळात अशाप्रकारच्या वेदना होण्याची शक्यता असते. सुरुवात असल्याने याठिकाणच्या त्वचेला काही प्रमाणात इजाहोऊ शकते आणि त्यामुळे आग होणे, वेदना होणे या समस्या निर्माण होतात. सरावाने हे दुखणे कमी होत जाते. 

२. नियमित संबंध असतानाही खालच्या बाजुला आग होत असेल किंवा दुखत असेल तर जंतुसंसर्ग हे त्यामागील महत्त्वाचे कारण असू शकते. यामध्ये endometriosis, fibroids सारख्या गाठी, योनिमार्गाचा जंतुसंसर्ग, योनिमार्गात गाठी किंवा पडदा सदृश समस्या, ओटीपोटातील गाठी, गर्भनलिका व अन्य भागांवरील सूज अशीही काही कारणे असू शकतात.

३. ओटीपोटात ओढ बसल्यासारखे खोल दुखणे endometriosis किवा Pelvic Inflammatory disease म्हणजे आतील अवयवांना सूज असल्याचे लक्षण असू शकते. तर आग किंवा जळजळ हे जंतुसंसर्गाचे महत्त्वाचे लक्षण असते.

४. विशेषत: मेनोपॉज किंवा त्यानंतरच्या वयात योनिमार्गाचा कोरडेपणा हे त्याठिकाणी दुसण्याचे किंवा आग होण्याचे महत्वाचे कारण असते.होर्मोन्सच्या बदलांमुळे हा त्रास होतो. त्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने क्रिम लावल्यास आराम मिळतो. अर्थात अशाप्रकारचा कोरडेपणा तरुण वयातही असू शकतो. संबंधांबद्दलची भिती, तणाव अशीही कारणे त्यामागे असू शकतात. 

(Image : Google)

५. संबंधांच्या वेळेस महिलेला दुखत असेल तर त्यासाठी पुरुषांच्या इंद्रियामध्ये असणारे दोषही कारणीभूत असू शकतात. काही तांत्रिक कारणांनी महिलांना संबंधांच्यावेळी किंवा नंतर त्रास होतो. 

त्यामुळे समस्येचे नेमके कारण समजून त्यानुसार उपाय करावे लागतात. यात औषधोपचारांपासून ते शस्त्रक्रियेपर्यंतचे बरेच उपचार असतात.समाधानी लैंगिक संबंध येण्यासाठी दोन्ही जोडीदारांचा परस्पर संवाद आणि संमती हे महत्वाचे असते. म्हणूनच अशी लक्षणे जाणवल्यास हे अंगावर न काढणे अतिशय महत्त्वाचे आहे. लैंगिकता आणि आनंददायी लैंगिक संबंध हे स्त्री आणि पुरुष दोघांसाठी खूप गरजेची गोष्ट आहे. त्यामुळे समस्या असल्यास वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.  

टॅग्स :लैंगिक आरोग्यरिलेशनशिपआरोग्य