आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीवर प्रेम करणं एकवेळ सोपं असतं पण त्याच्यासोबत आयुष्य काढायचं म्हणजे अनेकांसाठी तारेवरची कसरत असते. २ व्यक्ती कधीच एकसारख्या नसतात. त्यामुळे प्रत्येकाची मतं, विचार, सवयी, आवडीनिवडी बरेचदा वेगळं असतं. आपल्या जोडीदाराने आपल्याला हवं तसं वागावं असा आपल्यापैकी अनेकांचा अट्टाहास असतो. पण सगळं आपल्याला हवं तसं झालं तर त्यात मजा कसली. नातं म्हटलं की त्यात जसे प्रेम, आकर्षण, आदर, माया असते तसंच राग, भांडण, तक्रारी याही ओघानेच येतात. मात्र ही भांडणं किंवा राग तोंडी लावण्यापुरताच बरा असतो. तो प्रमाणापेक्षा जास्त झाला तर नात्यातली मजा हळूहळू कमी व्हायला लागते आणि केवळ व्यवहार उरतो (Relationship Tips 4 Rules for Healthy Relation).
अशावेळी नकळत एकमेकांबद्दलचं आकर्षण, प्रेम नकळत कमी व्हायला लागतं आणि मग नातं दिवसेंदिवस कोरडं व्हायला लागतं. पण असं होऊ नये आणि आपलं नातं कायम ताजतवानं राहावं असं वाटत असेल तर काही गोष्टी आवर्जून करायला हव्यात. कोमल रोहीत या इन्स्टाग्रामवर कायम नात्याविषयीच्या महत्त्वाच्या टिप्स शेअर करत असतात. नुकत्यात त्यांनी अशा ४ गोष्टी सांगितल्या आहेत ज्या केल्यास आपल्या नात्यातील ओलावा टिकून राहण्यास मदत होते. या गोष्टी करायला अतिशय सोप्या असून नातं बहरण्यासाठी त्या फायदेशीर ठरतात. पाहूयात या ४ गोष्टी कोणत्या...
१. नातेवाईक किंवा मित्रमंडळी यांच्यासमोर शक्यतो भांडू नका. त्यामुळे नात्यातल्या अडचणी कमी न होतात उलट वाढत जातात. त्यामुळे कितीही राग आला तरी ही गोष्ट टाळा.
२. महिन्यातून एकादा तरी आपल्या जोडीदारासोबत आवर्जून डेट प्लॅन करा. संसाराच्या धबडग्यात, करीयरच्या नाद्यात नात्यातला ओलावा कमी होण्याची शक्यता असते. अशावेळी एकमेकांना वेळ देण्यासाठी किमान वेळ काढणं गरजेचं असतं.
३. कितीही भांडण झाले तरी रात्री झोपताना ते भांडण मिटवून मगच झोपा.
४. स्क्रीन हा आपल्या दैनंदिन जीवनातील एक अत्यावश्यक घटक झाला आहे. पण दररोज किमान एक तास एकमेकांसोबत स्क्रीनशिवाय घालवण्याचे ठरवा आणि ते फॉलो करा. यामुळे नाते बहरण्यास नक्कीच मदत होईल.