असं म्हटलं जातं की संबंध बनवणं खूप सोपं,पण ते टिकवणं कठीण. हे अगदी 100% बरोबर आहे. नातेसंबंध टिकवण्यासाठी तुम्हाला एखाद्या व्यक्तीला वेळ द्यावा लागतो तसंच प्रयत्नही करावे लागतात. कधीकधी तुमची चूक नसूनही तुम्हाला नमते घ्यावे लागेल. नात्याचा ताजेपणा दीर्घकाळ टिकवून ठेवण्याची गुरुकिल्ली म्हणजे नातेसंबंधात कधीही कंटाळा येऊ देऊ नये. लोक सहसा नात्यामध्ये अशा काही चुका करतात, ज्यामुळे पार्टनरला रिलेशनशिपमध्ये राहण्याचा कंटाळा येतो. जर एकमेकांशी बोलताना, समजून घेत असताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर दीर्घकाळ संबंध चांगले राहू शकतात.
काळजी घ्या नियंत्रण ठेवू नका
काही लोक आपल्या पार्टनरची व्यवस्थित काळजी घेतात आणि काहींना नियंत्रण ठेवायचं असतं. दोघांमध्ये खूप फरक आहे. म्हणूनच तुम्ही तुमच्या जोडीदाराची काळजी घेतली पाहिजे पण त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू नये. नियंत्रणाचा अर्थ असा आहे की आपण त्यांचे निर्णय आणि सवयी आपल्या स्वत: त्या मनानुसार बदलू इच्छित आहात. हे बहुधा संशयामुळे होते. म्हणूनच, काळजी आणि नियंत्रण यातील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून दीर्घकाळ पार्टनरला तुमच्या नात्याचं ओझं वाटू नये.
प्रेम व्यक्त करता यायला हवं
प्रेमात असणं आणि हक्क दाखवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. नातं टिकवण्यासाठी प्रेम असणं गरजेचं असतं, पण नात्यातला ताजेपणा कायम राखण्यासाठी प्रेम व्यक्त करणंही आवश्यक असतं. असे काही लोक आहेत जे जोडीदारावर खूप प्रेम करतात पण त्यांना प्रेम कसे व्यक्त करावे हे माहित नसते. प्रेम व्यक्त करण्याचे मार्ग खूप सोपे आहेत, जसे की जोडीदाराला मिठी मारणे, एकत्र चालताना हात पकडणे, कधीतरी भेटवस्तू देणे, कामात मदत करणे, आवडत्या गोष्टी करण्यासाठी प्रोत्साहन देणे.
जास्त अपेक्षा ठेवू नका
विनाकारण आपल्या पार्टनरवर अपेक्षा ठेवू नका, जर तुम्ही कोणासह नातेसंबंधात असाल तर तुम्ही त्याच्या/तिच्या इच्छा, अनिच्छा आणि भावनांचा आदर केला पाहिजे. जोडीदाराकडून बर्याच आणि अनावश्यक अपेक्षा बाळगल्यास ते चुकीचे ठरेल. जोडीदाराशी बोलताना आदेश दिल्याप्रमाणे बोलू नये. विनंती केल्याप्रमाणे बोलावं जेणेकरून भावना दुखावल्या जाणार नाहीत.
बोलताना विचार करा
जगातील कोणताही मनुष्य परिपूर्ण नाही. प्रत्येकामध्ये कमतरता आहे. म्हणूनच, जेव्हा जेव्हा तुमच्या नात्यात किरकोळ वाद किंवा भांडणाची परिस्थिती येते, तेव्हा एकत्र बसून शांततेने त्याचे निराकरण करा, आणि जोडीदाराला रागाच्या भरात चुकीच्या किंवा अवास्तव गोष्टी बोलू नका. रागात उच्चारलेले शब्द तुमच्या नात्यात दुरावा निर्माण करू शकतात.
पार्टनरच्या वैयक्तीत भावनांचा सन्मान करा
प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्या त्यांना स्वतःशिवाय इतर कोणालाही सांगायच्या नसतात. याला 'पर्सनल स्पेस' म्हणता येईल. म्हणून एकंदरीत आपल्या जोडीदाराच्या 'पर्सनल स्पेसची' काळजी घ्या आणि त्यामध्ये अनावश्यक हस्तक्षेप करू नका, अन्यथा या नात्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.