मुलीचं लग्न झालं की सर्वच बदलतं. जबाबदाऱ्या, कर्तव्य पूर्ण करता मुलींचं स्वतःकडे आणि त्यांच्या करिअरकडे कधी दुर्लक्ष होतं हे त्यांनाही कळत नाही. प्रेम, पार्टनर हे सगळं महत्वाचं असतंच पण मॅरिड लाईफचा परिणाम म्हणून स्वत:ला वेळ न देणं, करीअरबाबत विचार न करणं हे काही योग्य नाही. संसारात दोघांनाही काही प्रमाणात तडजोड करावी लागते. कधीकधी आपल्या माणसांसाठी तडजोड फक्त बायकांकडूनच होताना दिसते.
लग्नानंतर सुरूवातीच्या दिवसात मुलीनं कसं वागावं, काय करावं, काय करू नये हे आधीच ठरलेलं असतं. सगळ्यांशी जुळवून घ्यावं लागेल असं सांगितलं जातं. घरातील मोठ्या व्यक्तींचा आदर ठेवत नवीन लग्न झालेल्या मुली काहीही न बोलता मन मारून जगताना अनेकदा दिसतात. म्हणून लग्न झाल्यानंतर मुलींनी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात जेणेकरून मोकळेपणानं राहता येईल, लग्नानंतर जाणवत असलेल्या बदलांचा ताण येणार नाही.
1) आपल्या मित्र मैत्रिणींसह संपर्कात राहा
लग्नानंतर तुमचा सर्वाधिक वेळ हा पार्टनरसोबत जात असला तरी आपल्या मित्र मैत्रिणींना मात्र विसरू नका. लग्नाआधी तुम्ही मित्र मैत्रिणींना जसा वेळ देत होतात, तसा लग्नानंतरही द्या. कारण जेव्हाही पार्टनरसह किंवा घरच्यांसह भांडणं होतात त्यावेळी खूप एकटं वाटतं. जर तुम्ही मित्र मैत्रिणींशी संपर्क ठेवला नसेल तर तुम्ही त्यांच्याशी आपली समस्या किंवा चांगले, वाईट अनुभव शेअर करू शकणार नाही. म्हणून नेहमी मित्र मैत्रिणींशी बोलणं, भेटणं सुरू ठेवा.
2) माहेरच्या कुटुंबाला वेळ द्या
आपल्या प्रायोरिटीच्या यादीत सगळ्यात आधी ही गोष्ट असावी. लग्नानंतरही मुलीनं आपल्या आई- बाबांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करायला हवा. कारण तुमचे पालक प्रत्येक निर्णयात पाठिंबा देत असून त्यांना सगळ्यात जास्त काळजी असते. म्हणून लग्न झाल्यानंतर आपल्या कुटुंबियांसह चांगला वेळ घालवण्यासाठी छोटंस गेट टू गेदर, ट्रिपला जाणं, गावी जाणं असे प्लॅन्स तुम्ही बनवू शकता.
3) सगळी काम स्वतःच करू नका
एकत्र कुटुंब पद्धतीत आपण नेहमी पाहतो की नवीन लग्न झालेल्या मुलीलाच घरातील सगळीच कामं करावी लागतात. याऊलट मुलं फारशी काम करताना दिसून येत नाही. सगळी कामं स्वतःवर ओढावून घेण्यापेक्षा ही पद्धत बदलण्याचा प्रयत्न करा. घरात जर खूप पसारा पडला असेल तर राहूदे, दुसरी व्यक्ती येऊन आपलं काम करायला सुरूवात करेल, पण घरचं काम फक्त आपणचं करायला हवं असा समज नको. जर तुम्हाला खूप आवड असेल घरातलं काम करण्याची तर आवडीनं करू शकता पण मनाविरुद्ध करू नका.
4) नोकरी सोडू नका
लग्न झाल्यानंतर अनेकदा मुलींना नोकरी सोडण्यासाठी फोर्स केला जातो. नवीन ठिकाण, सासरच्या लोकांना समजून घेण्यासाठी, वेळ देण्यासाठी थोडावेळ नोकरीपासून गॅप घेण्यास सांगितलं जातं. पण सध्याच्या परिस्थिती एकदा नोकरी सोडल्यानंतर परत चांगली नोकरी मिळवणं कठीण होतंय. लग्नानंतर तुम्ही घरी राहत असाल तर लोक तुम्हाला गृहिणीच्या रूपात पाहायला सुरूवात करतात. याशिवाय आर्थिकदृष्या इतरांवर अवलंबून राहावं लागतं. म्हणून लग्न झाल्यानंतर नोकरी सोडण्याची मोठी चूक करू नका.
5) पार्टनरला समजून घेण्याचा प्रयत्न
लग्न, धावपळ या सगळ्यात मुली आपल्या पार्टनरसह क्वालिटी टाईम स्पेंड करायला विसरतात. पार्टरनरची आवड, निवड, इच्छा, आकांक्षा याबाबत माहित करून घ्या. यामुळे नातं अधिक घट्ट होण्यास मदत होईल. लग्नात २ कुटुंब एकमेकांसह जोडली जात असतात. तुम्ही ज्या लोकांसह राहता त्यांना जवळून ओळखणंसुद्धा तितकंच महत्वाचं असतं. कोणतीही गोष्ट न आवडल्यास अबोला धरण्यापेक्षा बोलून प्रश्न सोडवा कारण जर तुम्ही नेहमीच गप्प बसलात तर गुंता अधिकच वाढत जाऊ शकतो.
6) पतीला नावानं हाक मारा
आपल्या पतीला नावानं हाक मारणं अजूनही अनेकांना जमत नाही. काहीजण लग्नाआधी नावानं हाक मारतात पण लग्नानंतर मात्र आहो.. असं म्हटलं जातं. अनेकांकडे घरच्यासमोर मान देऊन बोललं जातं आणि फक्त पती समोर असल्यावर नावानं हाक मारली जाते. सध्याच्या बदललेल्या स्थितीचा स्वीकार करत मुलीनं पतीला नावानं हाक मारण्याची सवय लावून घ्यायला हवी.