Lokmat Sakhi >Relationship > Relationship Tips: 'आमच्यातही भांडणं होतात पण...', सुधा मूर्तींनी सांगितलं त्यांच्या संसाराचं गुपित! 

Relationship Tips: 'आमच्यातही भांडणं होतात पण...', सुधा मूर्तींनी सांगितलं त्यांच्या संसाराचं गुपित! 

Relationship Tips: भांडणं सगळ्या जोडप्यांमध्ये होतात, पण ती किती काळ टिकतात आणि कशी मिटतात हे जाणून घेणं महत्त्वाचं, त्यासाठी हा कानमंत्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2024 16:15 IST2024-12-30T16:12:45+5:302024-12-30T16:15:47+5:30

Relationship Tips: भांडणं सगळ्या जोडप्यांमध्ये होतात, पण ती किती काळ टिकतात आणि कशी मिटतात हे जाणून घेणं महत्त्वाचं, त्यासाठी हा कानमंत्र!

Relationship Tips: 'We also have fights but...', Sudha Murthy revealed the secret of her marriage! | Relationship Tips: 'आमच्यातही भांडणं होतात पण...', सुधा मूर्तींनी सांगितलं त्यांच्या संसाराचं गुपित! 

Relationship Tips: 'आमच्यातही भांडणं होतात पण...', सुधा मूर्तींनी सांगितलं त्यांच्या संसाराचं गुपित! 

'घरोघरी मातीच्या चुली' अर्थात सगळीकडे कमी अधिक फरकाने सारखीच स्थिती असते असे म्हणतात. विशेषतः लग्नानंतर हे अनुभव जास्त येतात. नवरा बायकोचे नाते हळू हळू रुजू लागते, मुरते, परिपक्व होते. मात्र दोघांनी आपापसातले मतभेद संयामाने दूर केले नाही तर नाते दुभंगून जाते. नात्याचा गोडवा टिकवण्यासाठी दोघांनी प्रयत्न केले पाहिजे. याबद्दल स्वानुभव सांगत आहेत प्रसिद्ध लेखिका आणि उद्योजिका सुधा मूर्ती!

यशस्वी उद्योजक नारायण मूर्ती आणि त्यांची पत्नी सुधा मूर्ती या जोडप्याकडे आदर्श दाम्पत्य म्हणून पाहिले जाते. तसे असले तरीदेखील त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सुधा मूर्ती अनेकदा मोकळेपणाने बोलतात आणि त्यांच्या यशस्वी नात्याचे रहस्य सांगतात. अलीकडेच एका कार्यक्रमात त्या आपल्या पतीशी वाद झाल्यावर कोणते नियम पाळतात, याबद्दल सांगत होत्या. त्या म्हणाल्या, 'संसार म्हटल्यावर भांड्याला भांडं लागणारच, वाद होणारच, पण ते किती ताणायचे हे आपल्याला वेळेत कळायला हवे.' 

'या जगात कोणीही परिपूर्ण नाही. प्रत्येकाकडून काही ना काही चुका घडणारच. त्या चुकांसाठी किती काळ अबोला धरायचा, किती मोठी शिक्षा द्यायची याचा सारासार विचार व्हायला हवा. अन्यथा नातं ताणलं जातं आणि ताणता ताणता तुटून जातं. अशावेळी पुढील चार नियम अवश्य पाळा!-

१. नवरा बायकोच्या भांडणात एकाच वेळी दोघांनी संतापायचे नाही. एक जण संतापलेला असेल तेव्हा दुसऱ्याने संयम ठेवून डोकं शांत ठेवायचं. अन्यथा घराची युद्धभूमी व्हायला वेळ लागणार नाही आणि भांडण कधीच मिटणार नाही. एकाने झुकायचे आणि दुसऱ्याने झुकवायचे, याला हुकूमशाही म्हणतात, पण नवरा बायकोच्या नात्यात लोकशाही हवी. एकमेकांचं ऐकून घ्यावं. दुसऱ्याचा राग शांत होईपर्यंत संयम ठेवावा आणि राग शांत झाल्यावर सामोपचाराने मुद्दा पटवून समेट घडवावी. तरच पुढचा दिवस नव्याने सुरू होतो. 

२. भांडण होत नाही असे जोडपेच नाही. असलेच तर ते नवरा बायको नाहीत, हे समजून जा! त्यामुळे दुसऱ्यांच्या नात्याशी स्वतःच्या नात्याची तुलना करू नका. त्यावरून नवे वाद होत राहतील. लोक चारचौघात आपली चांगलीच बाजू दाखवतात, मात्र आपली खरी बाजू फक्त आपल्या जोडीदाराला माहित असते. त्याने ती न बोलता सावरलेली असते. म्हणून आपल्या जोडीदाराचा कायम आदर करा. 

३. तुमची पत्नी नोकरी, व्यवसाय सांभाळून घराला आर्थिक हातभार लावत असेल तर तिच्याकडून उत्तम स्वयंपाकाची अपेक्षा करू नका. तिने पैसेही कमवायचे, घर आवरायचं, मुलांना सांभाळायचं आणि स्वयंपाकही उत्तम करायचा, अशा अपेक्षांचं ओझं तिच्यावर टाकण्यापेक्षा समजूतदारीने तिच्या कामांचा भार हलका करण्याचा प्रयत्न करा. संसार दोघांचा आहे तर तो दोघांनी मिळून तो सावरायला हवा. तुमची पत्नी गृहिणी असली तरी तिच्या प्रयत्नांची, कर्तव्याची जाणीव ठेवा. परस्परांना आदर द्या. कामाची विभागणी करा. तरच नाते सुदृढ होईल. 

४. प्रत्येक पत्नी आपल्या नवऱ्यात आपल्या वडिलांसारखा प्रेमळ पिता शोधत असते आणि प्रत्येक पती आपल्या पत्नीमध्ये आईसारखी सुगरण शोधत असतो. या अपेक्षा चुकीच्या नाहीत. पण ती परिपक्वता येण्यासाठीही पुरेसा कालावधी खर्चावा लागेल. कोणतीही गोष्ट सहज साध्य होत नाही. त्यामुळे अपेक्षांचे ओझे बाळगण्यापेक्षा जोडीदाराला त्याच्या गुण दोषांसकट स्वीकारा, जेणेकरून भविष्यात तुमच्या नात्यातले माधुर्य टिकून राहील आणि संसार सुखाचा होईल. 

Web Title: Relationship Tips: 'We also have fights but...', Sudha Murthy revealed the secret of her marriage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.