लग्नाचं नातं हे प्रेम, समर्पण आणि एकमेकांना समजून घेण्याच्या नात्यावर आधारलेले असते. अनेकदा या नात्यात संघर्ष होतो तर कधी मतभेद वाढतात (Relationship Tips). हे मतभेत कधी इतके टोकाला जातात की नातं विस्कळीत होते. वैवाहिक नात्यात एकमेकांचे न पटणं ही नैसर्गिक गोष्ट असली तरी दोघांनीही योग्य पाऊलं उचलणं गरजेचं असतं. अशा स्थितीत काय करावं, काय करू नये याचा विचार करायला हवा. (When your thinking does not match with your partner what to do For keep things better)
१) संवादाचा अभाव ओळखा
भांडणं किंवा अबोला वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे संवादाचा अभाव. अनेकदा पती-पत्नी मनातील भावना, विचार एकमेकांशी शेअर करत नाहीत. त्यामुळे गैरसमज वाढतात. शांत चित्तानं कोणताही पूर्वग्रह न ठेवता संवादाला प्राधान्य द्या. बोलताना दोष देण्याऐवजी आपल्या भावना स्पष्ट मांडायला शिका.
२) मतभेदांमध्ये मध्य शोधा
सर्व गोष्टींवर सहमती होईलच असं नाही. पती-पत्नी दोघांचेही अनुभव, मुल्ये वेगळे असू शकतात. त्यामुळे मतभेद होणं स्वाभाविक आहे. योग्य कोण यावर वाद घालण्यापेक्षा समाधान कसं मिळवता येईल यावर लक्ष द्या. तडजोड ही सुखी नात्याची गुरूकिल्ली आहे.
३) एकमेकांचे ऐकायला शिका
अनेकदा वाद होण्याचं कारण म्हणजे ऐकण्याची तयारी अजिबात नसते. आपण आपली बाजू मांडण्यात गुंततो आणि इतराचं मत विचारात घेणंही विसरतो. चांगल्या नात्यासाठी एकमेकांचे ऐकून घेणं फार महत्वाचं आहे. समोरच्याचे समजून घेऊन नंतर आपली बाजू मांडा.
४) छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा
कधी कधी छोट्या गोष्टींवरून मोठे वाद होतात. एखादी गोष्ट मनाला लावून घेणं मग ती मोठी करणं टाळा. एखाद्या गोष्टीवर वाद घालण्याआधी स्वत:ला विचारा की गोष्ट आपल्या नात्यापेक्षा मोठी आहे का.
५) तिसऱ्या व्यक्तीची मदत घ्या
कधी कधी मतभेद इतके वाढतात की ते सोडवणं कठीण होतं. अशावेळी विश्वासू मित्र, नातेवाईक, व्यावसाईक समुपदेशकाकडून मदत घेणं उपयुक्त ठरतं. हे दोघांच्या समस्या शांतपणे ऐकून घेऊन योग्य मार्गदर्शन करू शकतात.