घटस्फोट होण्याचं प्रमाण आजकाल खूप जास्त वाढलं आहे. कोविड काळात पती- पत्नी दोघेही २४ तास घरातच एकमेकांसोबत होते. त्यामुळे त्या काळात तर एकमेकांचे दोष, उणीवा अधिक स्पष्ट दिसू लागल्या, जाणवू लागल्या. त्यामुळे त्या काळात तर घटस्फोट होण्याचे प्रमाण लक्षणीय वाढले. आजकाल प्रत्येक जण आपल्या पसंतीनेच जोडीदार निवडतो, मग तरीही घटस्फोट का होतो, हे खरंच एक कोडं आहे.. म्हणूनच तर आपल्या पसंतीचा जोडीदार असला तरी आपण हे नातं व्यवस्थित निभावू शकू का, त्यासाठी आपल्याला काय तयारी करावी लागेल, हे जाणून घेण्यासाठी तरी प्री- वेडिंग कौन्सिलिंग करून घ्यायलाच हवं.. (relationship tips)
अरेंज मॅरेज (arrange marriage) करताना आपण आपल्या होणाऱ्या भावी जोडीदाराला फार फार तर २ ते ३ महिने आधी ओळखतो. कारण लग्न जमलं की ते लवकरात लवकर उरकून टाकायचं, फार लांबवायचं नाही, हे घरातल्या मोठ्या मंडळींनी पक्क ठरवलेलं असतं. पण एवढ्या कमी वेळेत एकमेकांना आपण पुर्णपणे ओळखू शकत नाही. नवी- नवी ओळख असल्याने अनेक गोष्टी, प्रश्न मनात असतात. पण सांगण्याची किंवा विचारण्याची हिंमत होत नाही. ही हिंमत देण्याचं काम प्री- वेडिंग कौन्सलर उत्तम पद्धतीने करू शकतो.
अरेंज मॅरेज करत असाल, तरच कौन्सलिंग करवून घेतलं पाहिजे, असं मुळीच नाही. कधी कधी लव्ह मॅरेजमध्येही (love marriage) या गोष्टींची गरज पडते. कधीकधी आपला जोडीदार आपल्याला खूपच गृहित धरतो किंवा मग आपल्याला त्याचा स्वभाव बरोबर माहिती असल्याने त्याला कशाचा राग येईल किंवा काय आवडणार नाही, हे चांगलं ठाऊक असतं. त्याच्या रागाची चिंता केल्यामुळे मग अनेक गोष्टी लपवून ठेवल्या जातात किंवा भीतीपोटी बोलल्या जात नाहीत, ज्या लग्नाआधी बोलणं खूप गरजेचं असतं. असं होऊ नये, म्हणून देखील प्री- वेडिंग कौन्सलिंगची गरज असतेच.
यासाठी आहे प्री- वेडिंग कौन्सलिंगची गरज
- कौन्सलरच्या मदतीने मनातले प्रश्न न संकोचता होणाऱ्या जोडीदाराला विचारता येतात तसेच आपल्या अपेक्षा त्याला योग्य शब्दांत आणि कोणतीही आडकाठी न ठेवता सांगता येतात.
- कौन्सलरला चांगला अनुभव असतो. त्यामुळे लग्नाआधी कोणकोणत्या गोष्टी विचारण्याची गरज आहे, हे आपल्या लक्षात येत नाही, पण त्याच्याशी चर्चा केल्यानंतर समजून येते.
- जोडीदाराकडून आपण खूप अपेक्षा ठेवतो आहोत का हे समजते.
- कोणत्या कारणाने जोडीदारासोबतचा संवाद कमी झाला असेल, थांबला असेल तर तो पुन्हा सुरु करता येतो.
- कौन्सलिंगच्या माध्यमातून जोडीदाराला आणखी उत्तम पद्धतीने समजून घेण्यास मदत मिळते.