समंथा प्रभूने ‘चाय’ (CHAY) नावाचा टॅटू काढला होता. चैतन्यचा शॉर्ट फाॅर्म. तेव्हा ते प्रेमात होते. लग्न झाले. नंतर मात्र ते वेगळे झाले. नुकताच समंथाने एक फोटो इन्स्टाग्रामवर टाकला त्यात काही टॅटू दिसला नाही. मग अनेकांनी तिला विचारलं की लपवला की रिमूव्ह केला. अर्थात तिने उत्तर दिले नाही. काही दिवसांपूर्वी तिने एक ऑनलाइन सेशन केलं होतं. त्यात एकाने तिला विचारलंही होतं की काही टॅटू आयडिया देशील का? किंवा तुला कोणता टॅटू काढायला आवडेल? त्यावर तिने स्पष्टच सांगितलं होतं की खरंतर टॅटू काढूच नयेत, मी माझ्याच तरुणपणीच्या रुपात भेटले तर स्वत:ला तोच सल्ला देईन की बाईगं टॅटू नको काढूस!’
प्रेमात पडलं की टॅटू काढणं आणि ब्रेकअप झालं की पुसणं हे काही नवीन नाही. टॅटू काढण्यापेक्षा पुसणं हे जास्त वेदनादायी आणि खर्चिक असतं. पण अनेकदा प्रेमाचा बहर असा की काही विचारच केला जात नाही. बाकीच्या फॅशन ट्रेण्डचा थेट तब्येतीशी संबंध नसतो पण टॅटूचा असतो. ऍलर्जी होणे, पिकणे असा त्रास टॅटू काढताना होऊ शकतो. मित्र मैत्रिणी यांनी काढला म्हणून, पहिला क्रश, पहिलं अफेयर, पहिलं प्रेम, अमूक तारीख म्हणत टॅटू भावनेच्या भरात काढले जातात. त्यासाठी वेगवेगळ्या रंगांसाठी वेगवेगळी रसायनं, केमिकल्स वापरून शाई बनवली जाते व तिचा वापर होतो. काळा, लाल,पिवळा, निळा,हिरवा अशा सगळ्या रंगांचा वापर केला जातो. शाईत जे केमिकल असतं त्यानं रॅशही येऊ शकते. खाज येते, इन्फेक्शन होते. त्यातून टॅटूही बिघडू शकतो. वाईट दिसतो.
टॅटू काढणारच असाल तर?
१. खरंच विचार करा की हा टॅटू पुसायची वेळ येऊ शकते का? मला पुढे पश्चाताप होईल का?
२. की असा टॅटू काढू की आयुष्यात काहीही झालं तरी तो बदलावा लागणारच नाही.
३. टॅटू किती लहान / मोठा हवा आहे तसेच तो शरीराच्या दिसणाऱ्या भागावर हवा आहे की झाकलेल्या याचाही विचार करावा.
४. स्वस्तात मस्त नको, टॅटू काढताना हायजिनची आणि आरोग्याची काळजी घ्या.
५. कोणाच्याही आग्रहाला बळी पडून किंवा प्रेमाची परीक्षा म्हणून टॅटू काढून घेऊ नका.