Join us  

समंथा म्हणते, घटस्फोट झाला म्हणजे बाईचीच चूक, असा दोष का देता? -आहे उत्तर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2021 1:14 PM

घटस्फोटात पुरुषाचा काहीच दोष नसतो का? आपली समाजव्यवस्था कधी बदलणार, की अजूनही स्त्रीच्या चारित्र्यावरच संशय घेतले जाणार? 

ठळक मुद्देविभक्त होण्याबाबत अनेकांनी हळहळ व्यक्त केली असली तरी त्यांच्याबाबत काही कटू चर्चाही रंगल्या आहेतमहिलांशी संबंधित नैतिकता नेहमी प्रश्नाखाली असते. पुरुषांच्या नैतिकतेवर कोणीही प्रश्न करत नाहीस्त्रीवर अशाप्रकारची चिखलफेक करणं कितपत योग्य आहे?

साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री आणि नागा चैतन्य यांनी नुकताच घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर या दोघांविषयीच्या चर्चेला सोशल मीडियावर उधाण आले. हे दोघांच्या विभक्त होण्याबाबत अनेकांनी हळहळ व्यक्त केली असली तरी त्यांच्याबाबत काही कटू चर्चाही रंगल्या आहेत. समंथा सध्या सोशल मीडियावर सक्रिय असून नागापासून विभक्त झाल्यानंतर तिने पहिली पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने समाजाच्या दुटप्पीपणावर भाष्य केले आहे. आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर समंथा म्हणते, ‘महिलांशी संबंधित कोणतेही मुद्दे नैतिकदृष्ट्या संशयास्पद मानले जातात, परंतु पुरुषांनी केलेले काम नैतिकदृष्ट्या प्रश्नार्थक नाही. त्यामुळे समाज म्हणून आपल्याकडे मूलत: नैतिकता नाही.’ आपल्या पोस्टमध्ये ती पुढे म्हणते, एखाद्याच्या दु:खात तुमच्या भावनांची गुंतवणूक पाहून मी भारावून गेले आहे. 

या कठीण काळात मला पाठिंबा देणाऱ्या आणि माझ्या विरोधात चालणाऱ्या सगळ्या अफवांना जोरदार उत्तर देणाऱ्या सर्वांचे आभार. माझं अफेअर्स होतं, मला मुलं नको होती, मी संधीसाधू आहे आणि आता तर म्हणत आहेत की, माझा गर्भपात झाला आहे असे आरोप माझ्यावर करण्यात येत आहेत. पण घटस्फोट ही एक वेदनादायक प्रक्रिया आहे. मला ही वेदना एकट्याने सहन करू द्या. समंथाने तिचा मित्र प्रीतम जुकलकरसोबतच्या वाढत्या मैत्रीमुळे घटस्फोट घेतला आहे अशी चर्चाही अनेक ठिकाणी रंगली. त्यावर अभिनेत्रीने आज सकाळी एका पोस्टद्वारे प्रश्न विचारला होता आणि म्हटलं होतं की, 'महिलांशी संबंधित नैतिकता नेहमी प्रश्नाखाली असते. पुरुषांच्या नैतिकतेवर कोणीही प्रश्न करत नाही. त्यामुळे एक समाज म्हणून मुळात नैतिकता शिल्लक नाही.

साऊथमध्ये दबदबा असलेली आणि टॉलिवूड गाजवणारी प्रसिद्ध अभिनेत्री समंथा असो किंवा तुमच्या आमच्यातील एखादी तरुणी. आपल्याकडे स्त्रीच्या चारित्र्यावर अशाप्रकारे शिंतोडे उडवणे ही फार नवीन बाब नाही. पण एखादे नाते चांगले असताना त्या नात्याकडे आपण अतिशय चांगल्या भावनेने पाहतो आणि एकाएकी ते नाते तुटल्यावर त्याविषयी अशापद्धतीने बोलतो हे कितपत बरोबर आहे. समाज म्हणून किंवा व्यक्ती म्हणून आपण खरंच प्रगल्भ झालो आहोत का? एकीकडे समाज पुढे जातो हे म्हणत असताना स्त्रीवर अशाप्रकारची चिखलफेक करणं कितपत योग्य आहे? नातं तुटल्यावर त्यावर अशापद्धतीने तिरकस लिहीणे, टिकाटिपण्णी करणे त्या व्यक्तींना मानसिक खच्चीकरण करणारे नसेल का, याचा विचार समाज म्हणून आपण कधी करणार आहोत की नाही. समंथा म्हणते, नेहमी स्त्रीच्या चारित्र्यावरच का संशय घेतला जातो. पुरुषांचे चारित्र्य नेहमीच चांगले असते असे कसे असेल, याबाबत विचार होण्याची आवश्यकता आहे, याचा विचार कधी होणार. एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून किंवा तिला व्यक्त व्हावेसे वाटते म्हणून आज ती या सगळ्या विषयाबाबत सोशल मीडियावर मोकळेपेणाने बोलू शकते. तिच्या गोष्टींना प्रसिद्धीही मिळते. पण सामान्य तरुणींचे, महिलांचे काय? त्या किती लोकांसमोर जाऊन आपली बाजू मांडू शकतात आणि किती जणांची तोंडे बंद करु शकतात. की त्यांनी नेहमी आपल्यावर झालेले हे आरोप ऐकून गप्पच बसायचं. अतिशय नाजूक आणि वैयक्तिक असणाऱ्या या विषयांवर अशाप्रकारे बोलणे अतिशय चुकीचे आहे. 

   

  
 
  View this post on Instagram 
 
          A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

 

याबाबत समुपदेशक मानसी तांबे-चांदोरीकर म्हणतात,

आपला समाज पुढारतोय असे म्हणत असताना आजही पुरुषप्रधान संस्कृती कायम आहे. घटस्फोट किंवा लग्नसंस्थेशी संबंधित बाबींमध्ये आजही मुलीला दोषी धरण्याचे प्रमाण जास्त आहे. आजही मुलींनी हे करु नये, मुलींनी असे वागावे अशी बंधने मुलींवर घातली जातात. संसार करणे, घराला बांधून ठेवणे हे काम बाईचेच आहे. त्यामुळे जर हा संसार मोडला तर ती कमी पडली म्हणून तसे झाले असे आजही म्हटले जाते. एकीकडे आपण स्त्रीला शक्ती म्हटले जाते पण दुसरीकडे मात्र तिच्यावर वेगवेगळे आरोप करुन तिची अवहेलना केली जाते. त्यामुळे आपला समाज आजही रुढी-परंपरांमधून पुरेसा बाहेर आला आहे असे आपण म्हणू शकत नाही. मग खरंच स्त्री-पुरुष समानतेच्या गोष्टी करताना ती आपल्या आतपर्यंत रुजली आहे का याचा नव्याने विचार होण्याची गरज आहे. घटस्फोटासारख्या नाजुक विषयांवर अशाप्रकारे मत नोंदवताना किंवा निष्कर्षापर्यंत येताना दोन्ही बाजुंनी सर्व गोष्टी पडताळून पाहणे आवश्यक असते. त्यातील सत्यतेची खात्री करणे आवश्यक असते. प्रत्येक नाते, त्याची कहाणी, वेगळे होण्यामागची कारणे वेगवेगळी असू शकतात. त्याकडे तितक्याच संवेदनशीलतेने पाहायला हवे, नाहीतर समाज म्हणून आपल्याला अजून बराच टप्पा गाठायचा आहे असे म्हणावे लागेल.   

टॅग्स :समांथा अक्कीनेनीइन्स्टाग्रामघटस्फोटसोशल मीडिया