रेस्टॉरंटमध्ये खाण्या -पिण्याचा फोटो असो किंवा जिममध्ये व्यायाम करण्याचा, आऊटिंग असो की कसलं सेलिब्रेशन... अगदी नवा ड्रेस घेतला आहे, हे देखील जगाला ओरडून ओरडून सांगावं, असं काही लोकांना वाटत असतं. एवढंच नाही, तर आज स्टेटसला ठेवायला काहीच हॅपनिंग नाही झालं म्हणून मनोमन खट्टू होणारेही अनेक महाभाग आहेत. पण असं सगळं काही जगाशी शेअर करताना तुमचे आणि तुमच्या जोडीदाराच्या आयुष्यातले काही खाजगी क्षणही तुम्ही दुनियेसमोर आणत असता. कधीकधी हे सगळं ठिक असतं. पण त्याचा अतिरेक झाला तर तुमचं नातंही धोक्यात येऊ शकतं. ही सवय तरूणी आणि महिलांमध्ये खूप जास्त दिसून येते. म्हणूनच तर काहीही शेअर करण्यापुर्वी एकदा तुमच्या नवऱ्याचा किंवा बॉयफ्रेंडचा विचार जरूर करा.
पती- पत्नी किंवा गर्लफ्रेंड- बॉयफ्रेंड हे दोघे परस्परविरोधी स्वभावाचे असू शकतात. दोघांपैकी कुणाला प्रत्येक गोष्ट सोशल मिडियावर शेअर करायला आवडते, तर कुणाला आपली स्पेस ठेवायला, काही गोष्टी फक्त दोघांमध्येच ठेवायला आवडतात. म्हणूनच तर नात्यात दरी येऊ नये म्हणून तुम्ही सोशल मिडियावर काय शेअर करताय आणि काय टाळताय, हे एकदा नीट ठरवून घ्या..
सोशल मिडियावर शेअर करण्यापुर्वी या गोष्टी लक्षात ठेवा...
- बेडरूम ही आपली अतिशय खाजगी जागा असते. ही जागा आणि तिच्यातली गुपिते तरी निदान जगासमोर येऊ नये, असे अनेकांना वाटते. म्हणूनच आपल्या जोडीदाराला कळविल्याशिवाय आणि त्याला विश्वासात घेतल्याशिवाय बेडरूमचे फोटो सोशल मिडियावर टाकू नका.
- आयुष्यात अशा खूप गोष्टी असतात, ज्या आपल्यासाठी खूप आनंददायी असतात. पण त्या जगासमोर येऊ नयेत असे आपल्या जोडीदाराला वाटत असते. विशेषत: ऑफिसचे कलिग, बॉस यांना काही गोष्टी कळू नयेत, असे जोडीदाराचे मत असते. त्यामुळे जोडीदाराला अशा कोणत्या गोष्टी खटकतात, हे एकदा नीट समजून घ्या.
- तुमचा जोडीदार तुमच्यावर किती प्रेम करतो, तुम्हाला किती जपतो, तुम्हाला आज त्याने काय गिफ्ट आणले आहे, हे खरेतर जगाला सांगण्याची काहीच गरज नसते. यामुळे तुम्ही कायम काहीतरी सिद्ध करण्याचा, कुणाला काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करताय, हे दिसून येते. कदाचित ही गोष्ट तुमच्या जोडीदाराला अजिबात आवडणारी नसते.
- जाेडीदाराशी भांडण झाले आहे, तुमच्यात अबोला आहे, हे देखील काहीजणी सोशल मिडियावरून सांगतात. पण असे केल्याने तुमची खाजगी बाब चारचौघात येत आहे, हे लक्षातच येत नाही. भांडण वाढवायला अनेक जण बसलेले असतात. असे भांडणाचे स्टेटस टाकून तिसऱ्या व्यक्तीला दोघांमध्ये घुसण्याची संधी मुळीच देऊ नये.