घटस्फोट ही अशी गोष्ट आहे की ज्यामुळे नातेसंबंधात असणाऱ्या २ व्यक्ती वेगळ्या होतात. पण त्यामुळे २ परीवार आणि मुख्यत: त्यांच्या मुलांची सगळ्यात जास्त फरफट होते. मुलांना जन्म दिला आहे म्हणून सोबत राहणारेही असंख्य जण आपल्या आजुबाजूला असतात. पण मुलांना दोन्ही पालकांचे प्रेम मिळावे आणि त्यांची यामध्ये ओढाताण होऊ नये यादृष्टीने पालकांनी विचार करायचे ठरवले तर त्यांची होणारी घालमेलही खूपच त्रासदायक असते. प्रसिद्ध अभिनेता सोहेल खान आणि फॅशन डिझायनर सीमा सजदेह यांनी २४ वर्षांच्या नातेसंबंधानंतर मागील वर्षी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यावर सोशल मीडियात बरीच चर्चाही झाली. या दोघांना २ मुलं असून या सगळ्या गोष्टींबाबत सीमा हिने नुकतेच एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे. आई म्हणून विचार करताना मुलांसाठी आपली कशाप्रकारे घालमेल झाली याबाबत स्पष्टपणे काही गोष्टी सांगितल्या (Seema Sajdeh talked about Divorce with Sohail khan).
लग्नानंतर आपल्याला अनेकदा या नात्यातून वेगळे व्हावे असे वाटले. त्याप्रमाणे मी आणि सोहेल बऱ्याच वर्षांपासून वेगळे राहत होतो, मात्र जगासाठी आम्ही एकत्र होतो. त्यावेळी माझा मुलगा अशा वयात होता जिथे मी वेगळे होणे योग्य नव्हते. पण एक वेळ अशी आली की मला माझे लग्न आणि मुलं यांमध्ये एक काहीतरी निवडण्याची वेळ आली तेव्हा मी मुलांची निवड केली असे सीमाने सांगितले. आमच्या घटस्फोटाबाबत नको नको त्या चर्चा झाल्या. दुसरी महिला आमच्यात आल्याने हे झाल्याचेही बोलले गेले. आपण खान कुटुंबाचे नाव आणि पॉवर यांचा वापर केला आणि गरज संपल्यावर त्यांना दूर केले अशा आशयाच्या काही कमेंटस लोकांनी केल्या आहेत. मात्र २ व्यक्ती एकमेकांसोबत आनंदी नसतील आणि त्यांच्यात सतत वाद होत असतील तर त्याचा मुलांवर कळत-नकळत परीणाम होत असतो. त्यावेळी कदाचित आपल्याला ते लक्षात येत नाही आणि मुलं पटापट मोठी होतात. पण त्यांच्यावर आपल्या नात्याचा खूप परीणाम झालेला असतो त्यामुळे मुलासाठी आम्ही दोघांनी हा ठरवून घेतलेला निर्णय होता असेही ती म्हणाली.
पुढे सीमा म्हणाली, खरंतर घटस्फोट ही फक्त कागदोपत्री प्रक्रिया होती. पण आम्ही दोघे कधीपासूनच वेगळे राहत होतो. निर्वण महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्याने मला आता तू पुढे जाऊ शकतेस असे सांगितल्यावर मी घटस्फोटाची प्रक्रिया केली असेही तिने स्पष्ट केले. सोशल मीडियावर येणाऱ्या कमेंटस आणि लोक करत असलेल्या चर्चांकडे लक्ष न देण्याचे आपण ठरवले असल्याचेही सीमा म्हणाली. अशाप्रकारे लोक आपल्या मुलांबद्दल, कुटुंबाबद्दल जेव्हा नको नको ते बोलतात तेव्हा त्याचा खूप त्रास होतो असेही ती म्हणाली. त्यामुळे सोशल मीडियापासून दूर राहणे केव्हाही जास्त उत्तम असेह तिने सांगितले. आपण आज जी काही आहे ती माझ्या आयुष्यात असलेली माझी भावंडं, कुटुंब आणि माझ्या मैत्रिणी यांच्यामुळे असे सीमा म्हणाली.