- डॉ. ऊर्जिता कुलकर्णी
‘य’ आणि ‘क्ष’ यांच्या लग्नाला साडेतीन वर्षं झाली, तरीही दोघांत कामजीवनाबाबत असमाधान आहे. परंतु दोघेही याबाबत मौन पाळून आहेत. कुटुंबातील व्यक्ती, मित्रमंडळी, यांनी नेहमीचा, ‘मूल कधी होणार!? गुड न्यूज कधी देताय?’ हा प्रश्न विचारल्यामुळे, त्यांच्यावर आता दडपण आलंय. सुरुवात वेगवेगळ्या रक्त, लघवी इत्यादी तपासण्या, काही शारीरिक तपासण्या इथून झालीये. ‘य’ आणि ‘क्ष’, शारीरिक संबंधांबाबत मात्र डॉक्टरांना काहीच उलगडून सांगत नाहीत. संबंध येतात, नेहमी येतात. असतात बऱ्यापैकी, अशी मोघम चर्चा करतात. त्याचं कारण, ‘य’ ला असणारी समस्या आणि त्याविषयी दोघांनाही वाटणारा लाजिरवाणेपणा.
लग्नांनंतर संबंधांची सुरुवात झाली, तसं शारीरिक संबंध याबाबत फार काही माहिती नसणारे हे दोघे, जमेल तसे पुढे जात राहिले. त्यानंतर, मित्र-मैत्रिणींशी बोलून दोघांनी अनेक गोष्टी समजावून घेण्याचा प्रयत्न केला. कारण, ‘य’ला लिंगाची ताठरता टिकत नाहीये, पेक्षा आल्यानंतर अगदी संबंध ठेवायच्या वेळेसच ती पटकन नाहीशी होतेय, लिंग शिथिल पडतंय हे जाणवत होतं. त्यावर ‘क्ष’ देखील आपलं असमाधान व्यक्त करत होतीच. तरीही, ही समस्या असू शकते, किंवा यासाठी तज्ज्ञांशी बोलावं यावर मात्र विचार झाला नाही. मूल व्हायला हवं यासाठी चालू असणाऱ्या उपायांमध्ये देखील डॉक्टरांना आपण अंधारात ठेवतोय हे देखील यांच्या लक्षात आलं नाही.
‘य’ ची समस्या होती, शिस्नाची अती- संवेदन-शीलता.
म्हणजे काय?
- अशा समस्येत, पुरुषांना संबंध ठेवण्यात अडथळे येतात. लिंगाला आलेली ताठरता, शिस्नाचा किंवा त्याच्या पुढील भागाचा योनीशी संपर्क आला, शिस्नाची आणि योनीची त्वचा जरी एकमेकांच्या संपर्कात आली, तरीही, अनेकदा अशा समस्यांमध्ये, लिंगाला आलेली ताठरता ताबडतोब, कमी होते, लिंग शिथिल पडतं आणि पुढील क्रियाकठीण होऊन बसते.
काय कारणं असू शकतात?
* अनेकदा संबंधांविषयी अननुभवी असणाऱ्या पुरु षांमध्ये सुरु वातीच्या काळात ही समस्या दिसते.
* शारीरिक संबंधांविषयी नको इतकं औत्सुक्य, त्यातून पहिल्याच संबंधाच्या वेळेस निर्माण होणारी मनाची अवस्था यातून देखील असं होऊ शकतं.
* काही पुरुषांमध्ये, शिस्नावर असणारे त्वचेचे आवरण मागे- पुढे होणं, हाच अनेकदा सुरु वातीला वेदनादायक भाग असू शकतो. इथे पुरुषाचं वय काय आहे यापेक्षा, एकंदर लैंगिकता, हस्तमैथुन, लिंगावर असणारी त्वचा, त्याची स्वच्छता याविषयी त्या पुरुषाला किती माहिती आहे, किंवा जाणून घेतलेलं आहे, हे पाहणं गरजेचं ठरतं.
* अनेकदा हस्तमैथुनासंबंधीच्या भ्रामक समजुतीतून ते अजिबातच न करणं, यातून लिंगावरील त्वचेची नैसर्गिक हालचाल देखील संबंधांच्या वेळेस अवघड, वेदनादायक होऊन बसते. तर काही पुरुषांमध्ये, फायमोसिस/ पॅरा-फायमोसिस यासारखी स्थिती असू शकते. जिथे हीच त्वचा शिस्नाभोवती घट्ट बसून, ती नैसर्गिकरित्या लिंगाला ताठरता येताना मागे सरत नाही. अशा वेळेस, तज्ज्ञांचा सल्ला घेऊन गरज भासल्यास छोटीशी शस्त्रक्रिया करून घेणं गरजेचं असतं. म्हणूनच अगदी लहान वयापासून शारीरिक स्वच्छतेत, लिंगाच्या स्वच्छते संदर्भात पालकांनी योग्य काळजी घेतली, योग्य मार्गदर्शन केलं तर त्वचेच्या मागे सरकाण्याबाबत काही समस्या असतीलच तर त्या एकतर वेळीस निदर्शनास येतात. त्याचबरोबर लिंगाची स्वच्छता याबाबत कोणत्याही प्रकारचा गंड, किंवा चुकीचे समज मुलांमध्ये राहात नाहीत.
१. कामेच्छेचा अभाव याचबरोबर अती उत्तेजना, उन्मादक अवस्था, किंवा सातत्यानं केवळ याच वैषयिक विचारात मन गुंतून त्याविषयी कल्पना विलासात रमणा:या पुरु षांमध्ये देखील, प्रत्यक्ष संबंधांच्या वेळेस शिस्नाला अती-संवेदनशीलता जाणवू शकते. किंवा हस्तमैथुनाचे व्यसन जडलं असेल, तर त्यातही अनेकदा हे जाणवू शकतं.
२. बऱ्याचदा एखाद- दोन वेळा ही किंवा इतर समस्या निर्माण होऊन संबंध येण्यास अडथळा झाल्यावर, नंतर त्याविषयी एक विशिष्ठ प्रकारचा ताण मनावर राहून, प्रत्येक वेळेस शारीरिक संबंध येताना या पहिल्या अनुभवांचा नकारात्मक विचार होऊ शकतो. त्यातूनही ताठरता अचानक नाहीशी होऊ शकते. किंवा त्याच वेळेस शिस्न अधिक संवेदनशील होऊन, कोणत्याही प्रकारचे स्पर्श टाळण्याकडे कल होऊ शकतो.
३. एकंदरीतच स्वभावत: व्यक्ती थोडीशी, नाजूक, घाबरट किंवा कोणत्याही बाबीचा मनावर पटकन परिणाम करून घेणारी अशी असेल, तर अशा पुरुषांमध्ये देखील ही समस्या दिसते. अशा वेळेस, त्यांच्या स्वभावाविषयी खोलात जाऊन विचार करावा लागतो. तिथे बालपणापासून झालेली जडणघडण, त्यांच्या आजूबाजूचे कौटुंबिक वातावरण, लैगिकता किंवा एकंदर सर्वच विषयात मिळालेले/ न मिळालेले वैचारिक, भावनिक स्वातंत्र्य, त्यातून मनात दडपून ठेवलेल्या भावना, विचार याबाबतही संपूर्णपणो विचार करणं आणि त्यातून मार्ग काढणं गरजेचं असतं.
४. त्याशिवाय एकंदरीत स्त्री-पुरुष संबंधांविषयी असणारी भीती, किळस, कोणतीही नकारात्मक भावना, यावरही काम करावं लागतं. लैंगिक अभिमुखता कोणत्याही प्रकारची असेल तरीही, अशी समस्या जाणवू शकते.
महत्वाचं म्हणजे, अशी समस्या जाणवत असेल, किंवा आपल्या जोडीदाराशी येणारे शारीरिक संबंध याविषयी काहीही शंका असतील, तर तज्ज्ञांशी खुलासेवार बोललं पाहिजे. त्यातही मूल होत नाही म्हणून उपचार चालू असतील, तर सर्वात आधी, संबंध नेमके कसे होतायत यावर विस्तृत चर्चा केली पाहिजे. त्यातून अनेकदा दडून राहिलेला, किंवा ज्यावर खरे उपचार करणं गरजेचं आहे असा भाग समोर येतो. मूल होणं हा स्त्री-पुरुष संबंधातील एक भाग, परंतु त्याचसोबत सुयोग्य आणि आनंदी कामजीवन हा हेतू ठेवणं गरजेचं!
(लेखिका होमिओपॅथिक तज्ज्ञ असून मानसोपचार, लैंगिक समस्या या विषयात समुपदेशन करतात)