शारीरिक संबंधांकडे पाहण्याची आपली दृष्टी काहीशी वेगळी असते. केवळ शारीरिक सुख मिळण्यासाठीच जोडीदारासोबत चांगले शारीरिक संबंध आवश्यक असतात असं नाही. तर शारीरिक, मानसिक आणि कौटुंबिक स्वास्थ्याच्या दृष्टीने स्त्री आणि पुरुष यांच्यात शारीरिक संबंध चांगले असायला हवेत (Sex life) . स्त्री-पुरुषाच्या नात्यामध्ये मानसिक किंवा भावनिक जवळीक जास्त महत्त्वाची आहे की शारीरिक संबंध महत्त्वाचे या मुद्द्यावर कायम वाद होताना दिसतात. पण या दोन्हीही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या असून प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉ. सुधीर सोनटक्के यांनी शारीरिक संबंधांबाबत 'लोकमत सखी'शी संवाद साधला.
सेक्स आणि बरंच काही..
आज धकाधकीच्या जीवनशैलीत शारीरिक संबंधांमध्ये योग्यरितीने समतोल असणे आवश्यक आहे. कामाचे वाढते तास, थकवा, सोशल मीडियाचा अतिवापर यांचा संबंधांवर परिणाम होताना दिसतो. पण आपले एकूण वैयक्तिक, मानसिक, भावनिक आणि पर्यायाने सामाजिक जीवन चांगले राहावे असे वाटत असल्यास जोडीदाराविषयी प्रेम, माया आणि शीरीरिक संबंध चांगले असणे गरजेचे आहे. त्यामुळे शारीरिक संबंधांमध्ये समतोल असणे आवश्यक असते. शारीरिक संबंधांमुळे ऑक्सिटोसिन हे संप्रेरक म्हणजेच हॉर्मोनची निर्मिती होते, या हॉर्मोनमुळे आपल्याला मानसिक समाधान आणि पर्यायाने मानसिक शांती मिळण्यास मदत होते. यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. उदासिनता, नैराश्य कमी होऊन आपल्या मनात सुरक्षिततेची भावना वाढते.
शारीरिक संबंध मानसिक आरोग्याबरोबरच शारीरिक आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. शारीरिक संबंधांमुळे एकप्रकारचा व्यायाम होतो. मेंदूचे कार्य सुधारण्यास मदत होते. इतकेच नाही तर शारीरिक संबंधांमुळे रक्ताभिसरण सुधारते आणि प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते. रक्तदाब कमी होणे, पचनक्रिया सुधारणे, त्वचा उजळ होणे हेही फायदे दिसून येतात. असे असले तरी शारीरिक संबंध हे सुरक्षितच असायला हवेत अन्यथा त्यातून उद्भवणाऱ्या अडचणी या जोडप्यांना आणि कुटुंबियांना त्रासदायक ठरु शकतात. आता शारीरिक संबंधांची वारंवारीता काय असावी असाही प्रश्न आपल्यापैकी अनेकांना पडतो. तर साधारणपणे चाळीशीच्या आत जोडप्यांमध्ये आठवड्यातून किमान १ ते २ वेळा शारीरिक संबंध येणे, चाळीशीनंतर आठवड्यातून किमान १ वेळा आणि वयाच्या साठीनंतर दोन आठवड्यातून एकदा शारीरिक संबंध असायला हरकत नाही. मात्र याचे प्रमाण व्यक्तींनुसार बदलू शकते, पण त्याचा समतोल साधणे आवश्यक आहे.
नात्यातल्या सुखाचे फायदे
१. उत्तम शारीरिक संबंध असतील तर आपल्यात नकळत सकारात्मकता आणि आत्मविश्वास येतो.
२. मानसिकरित्या शांत आणि आनंदी राहण्यासाठी शारीरिक संबंध चांगले असणे गरजेचे असते.
३. विविध गोष्टींचा आपल्याला असणारा ताण कमी करण्यासाठी शारीरिक संबंध उपयुक्त ठरतात.
४. उच्च रक्तदाबाचा त्रास कमी होण्यासाठी तसेच व्यायाम म्हणूनही शारीरिक संबंध महत्त्वाचे ठरतात.
५. घटस्फोटाचे प्रमाण कमी होण्यासाठीही जोडप्यांमध्ये शारीरिक संबंध चांगले असणे आवश्यक असते.
६. सर्वात महत्त्वाचे वंश वाढविण्याची म्हणजेच मूल होण्याची गोष्ट शारीरिक संबंधांशिवाय होऊच शकत नाही.