अनन्या भारद्वाज
तुझा माझ्यावर विश्वास नाही का? मी ‘तसला’ आहे का? पाठव ना एखादा हॉट फोटो असा हट्टच बॉयफ्रेण्डने केला तर मुली काय करतात? काहींना ते भलतं रोमॅण्टिक वाटतं. तोवर व्हॉट्सॲपवर चॅट करत सेक्सटिंग अर्थात सेक्ससंबंधित गप्पा सुरु झालेल्या असतात. हॉट ॲडल्ट काही जोक्स काही क्लिप्सची देवाणघेवाण होते. आपण प्रेमात आहोत तर इतपत चालतंच असं म्हणत सेक्सटिंग सुरु होतं. मग त्यातून भरवशाचे हट्ट, कमी कपड्यात फोटो, न्यूड फोटो, न्यूड व्हिडिओ चॅट, न्यूड हॉट व्हिडिओ याची एकमेकांशी देवाणघेवाण सुरु होते. काहीजण तर आपल्या एकत्र नाजूक क्षणांचेही व्हिडिओ करतात. आता मुद्दा असा की जोवर दोघं प्रेमात असतात तोवर याची धास्ती नसते पण ब्रेकअप झालं तर? एका बाजूने हे सारं व्हायरल करण्याची धमकी देणं, ब्लॅकमेल करणं सुरु झालं तर?
तिथंच अनेक गंभीर प्रश्न निर्माण होतात आणि अनेकदा मुलींनाच काय मुलांनाही त्याचं भान नसतं. सेक्सटिंग कुल वाटण्यापासून ते सगळेच करतात इथपर्यंत आणि आपला एकमेकांवर विश्वास आहे आपण एकमेकांना फसवणार नाही असं म्हणेपर्यंत ते सर्रास चालतं. आपापल्या मित्रमैत्रिणींनाही आपण कसे ‘कुल’ आहोत हे दाखवण्यासाठी ते शेअरही केलं जातं. आणि मग ते कधी आणि किती वाढेल याचा कुणालाच अंदाज नसतो.
(Image : google)
जर्नल ऑफ सायबर सायकॉलॉजी बिहेव्हिअर ॲण्ड सोशल नेटवर्किग या पत्रिकेत प्रसिध्द झालेले अभ्यास सांगतात की, तरुण मुलामुलींमध्ये सेक्सटिंगचं प्रमाण जास्त आहे. मात्र सेक्स मेसेजेस सोबत आपले न्यूड इमेजही सर्रास पाठवले जातात. वयात आल्यावर लैंगिक भावना तीव्रअसणं, प्रत्यक्ष नाही तर ते लैंगिक समाधान डिजिटल सेक्समधून मिळवणं सुरु होतं.
आणि मग कधी अनेकजण डिजिटल सेक्सला बळी पडतात हे कळतही नाही.
तुम्ही असं वागता का? तपासा..
१. कितीही एकमेकांवर प्रेम असलं तरी आपले न्यूड फोटो शेअर करायचे नाहीत.
२. जो त्यासाठी हट्ट करेल, आग्रह करेल त्यापासून लगेच ब्रेकअप केलं तरी चालेल.
३. न्यूड व्हिडिओ, फोटो, सेक्स चॅट हे सारं टाळायचंच.
४. ब्लॅकमेल सुरुच झालं तर न घाबरता घरी किंवा पोलिसांना सांगणं उत्तम.
५. आपल्या शरीराचा आदर आपण केला नाही तर त्याचा गैरफायदा घेतला जाऊच शकतो हे कायम लक्षात ठेवायचं.