सध्याच्या स्थितीत पॉर्नच्या विळख्यात अडकणाऱ्यांची संख्या वाढतेय. पुरूषांमध्येच नाही तर महिलांमध्येही पॉर्नचं अॅडिक्शन असण्याचं प्रमाण वाढतंय. कोणी मानसिक समाधानासाठी, ताण घालवण्यासाठी तर कोणी शारीरिक भूक भागवण्यासाठी पॉर्न पाहण्याचा विचार करतं. पॉर्न पाहण्याच्या व्यसनात अडकण्याआधी आपण स्वत:ला सावरायला हवं. पॉर्नचं व्यसन लागण्याची कारणं आणि त्यातून बाहेर येण्याच्या उपायांबाबत आम्ही, पत्रकार आणि सोशल मीडिया तज्ज्ञ मुक्ता चैतन्य यांच्याशी बोललो.
मुक्ता चैतन्य सांगतात की, ''पुरूषांसह बायकांनाही पॉर्न अॅडिक्शनमधून बाहेर येण्यासाठी सारख्याच प्रक्रियेतून जावं लागतं. सगळ्यात आधी आपण पॉर्न कोणत्या कारणांसाठी पाहतो हे स्वत:ला समजायला हवं. सामान्यत: आनंद मिळवण्यासाठी, भावनिक सुखासाठी, ताण तणावापासून मुक्तता, लैगिंक भूक भागवण्यासाठी लोक पॉर्न पाहतात. जर तुम्ही जास्तवेळ पॉर्न पाहताय असं जाणवत असेल तर सगळ्यात आधी वेळ कमी करा. कोणतंही व्यसन सोडवण्याच्या ज्या पायऱ्या असतात त्याचप्रमाणे पॉर्नचं व्यसन सोडवण्यासाठीही पॉर्न पाहण्याचा वेळ कमी करायला हवा. दिवसेंदिवस ही वेळ अधिकाधिक कमी करायला हवी. तरच तुम्ही या व्यसनापासून पूर्णपणे मुक्त होऊ शकता.''
पुढे त्या सांगतात की, '' जर तुम्ही भावनिक गरजेसाठी किंवा ताणातून मुक्त होण्यासाठी पळवाट म्हणून पॉर्न पाहत असाल तर यामुळे तुमचे प्रश्न सुटणार नाहीl. पॉर्न पाहण्यानं तुम्हाला तात्पुरतं समाधान वाटू शकतं. बऱ्याच लोकांमध्ये स्ट्रेस आणि झोप या दोन्ही गोष्टी पॉर्नोग्राफीशी लिंक असतात. स्ट्रेस खूप वाढला असेल किंवा झोप लागत नसेल तेव्हा लोक पॉर्न पाहतात. जेणेकरून चांगली झोप येईल, रिलॅक्स वाटेल. जर तुमच्याबाबतीतही असं काही होत असेल तर आपलं व्यसन वाढण्याआधीच तुम्ही थेरेपीस्ट किंवा काऊंसिलरला भेटून प्रश्न सोडवू शकता. आपण पॉर्न एडीक्ट झालो आहोत का हे लक्षात घ्यायला हवं. अनेकदा आपण पॉर्न एडिक्टेट, डिपेंडंट आहोत हे स्वीकारणं खूप कठीण असतं.''
पॉर्न अॅडिक्शनची लक्षणं, खबरदारी
१) पॉर्न सातत्यानं पाहण्याची इच्छा होते
२) वेळी अवेळी, रोज पॉर्न पाहावेसे वाटतात. दिवसभरातील इतर कामं सुरू असताना तुम्ही मध्येच पॉर्न पाहत असाल तर हे एडिक्शन असू शकतं.
३) झोपताना किंवा दिवसभरातील कामं संपल्यावर तुम्हाला पॉर्न पाहावेसे वाटत असतील तर ही सवय पुढे व्यसनात बदलू शकते. जर तुम्ही पॉर्न पाहत असाल तर ते कशाप्रकारचे, कितीवेळा पाहताय हे लक्षात घ्या. जर तुम्हाला सेक्सुअल अब्यूजचे कटेंट पाहणं जास्त आवडायला लागलं असेल तर तुम्ही नक्कीच चुकीच्या मार्गावर आहेत. पॉर्न पाहतानाही तुम्ही काय बघता आणि किती वेळ बघता याबाबत जागरूक असणं गरजेचं आहे.
एका संशोधनात विवाहित स्त्रियांमध्ये पॉर्न पाहण्याचं प्रमाण अधिक आहे असं समोर आलं होतं. लैगिंक विकार तज्ज्ञ डॉ. राजन भोसले यांच्या म्हणण्यानुसार ''पॉर्न पाहण्याबाबत युरोपिन देशातील स्त्रिया आणि भारतीय स्त्रिया यांची तुलना केली जाऊ शकत नाही. त्यामुळे हा रिसर्च सर्वसमावेश असू शकत नाही. आधीच्या तुलनेत सध्या तंत्रज्ञान आणि मोबाईल्सचा वापर वाढल्यानं पॉर्न पाहण्याचं प्रमाण वाढलंय पण ते फक्त महिलांमध्येच नाही, तर पुरूषांसह आता लहान मुलंही पॉर्न पाहायला लागली आहेत. आजकाल सगळेच आपापल्या मोबाईलवर आपल्या आवडीनुसार पॉर्न पाहतात. त्यामुळे फक्त विवाहित स्त्रियांमध्येच पॉर्न पाहण्याचं प्रमाण वाढलंय असं गृहित धरणं योग्य ठरणार नाही.''