जास्तीत जास्त लोकांना रात्रीच्यावेळी शरीरसंबंध ठेवणं योग्य वाटतं. पण रात्रीच्यावेळेपेक्षा सकाळी शरीरसंबंध ठेवणं फायदेशीर ठरतं. जेणेकरून दिवसभर काम करण्यास उत्साह राहतो आणि स्ट्रेस कमी होण्यास मदत होते. सकाळच्यावेळी संबंध ठेवणं एक मॉडरेट वर्कआउटच्या स्वरूपात फायदेशीर ठरतं. पॉझिटिव्ह एनर्जी देण्यासह दिवसाची सुरूवात चांगली होते. याशिवाय कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. २०१८ मध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेनुसार १००० वयस्कर लोकांपैकी ५३ टक्के लोकांनी हे मान्य केले की, सकाळी सेक्स केल्यानं दिवसभर ताजंतवानं वाटतं. सकाळी संबंध ठेवण्याचे काही फायदे आहेत.
ताण कमी होतो
संशोधनानुसार, हे सिद्ध झाले आहे की सकाळी सेक्स करणे एक उत्तम स्ट्रेस बस्टर म्हणून काम करते आणि यामुळे तुमचा मूड दिवसभर चांगला राहतो. कारण सकाळी सेक्स करताना डोपामाइन आणि सेरोटोनिन हार्मोन्स शरीरात तयार होतात जे ताण कमी करण्यास मदत करतात. जेव्हा दिवसभर मूड चांगला असतो, तेव्हा साहजिकच तुमच्या कामातील उत्पादकताही वाढते.
वीर्याची गुणवत्ता
एका संशोधनानुसार सकाळी सेक्स केल्याने पुरुषांमधील वीर्याची गुणवत्ता 12 टक्क्यांनी वाढते. विशेषतः ज्या महिलांना गर्भधारणा होण्यात अडचण येते, त्यांनी सकाळच्यावेळी सेक्स करावा. यामुळे गर्भधारणेची शक्यता वाढते आणि सेक्सशी संबंधित अनेक समस्यांपासून सुटका मिळते.
शरीरसंबंध ठेवण्याची योग्य वेळ कोणती?
लैगिंक विकार तज्ज्ञ डॉ. राजन भोसले सांगतात, ''ज्यावेळी दोघंही रिलॅक्स असतील, शरीरसंबंधांचा मूड असेल किंवा दोघांनाही एकमेंकाबद्दल आकर्षण वाटत असेल तर अशावेळी कपल्समध्ये वेळेचं बंधन आडवं येत नाही. त्यांना जेव्हा सोयीस्कर वाटेल तेव्हा ते शरीरसंबंध ठेवू शकतात. रात्री किंवा सकाळच्यावेळेतच शरीर संबंध ठेवायला हवेत असं काहीही नाही. ज्यावेळी दोघांमध्येही भावना जागृत झालेल्या असतील ती योग्य वेळ ठरू शकते. म्हणूनच संभोग असा शब्द वापरला जातो. सम आणि भोग म्हणजेच यात दोघांनाही सम प्रमाणात आनंद मिळतो.''
वैद्यकीयदृष्ट्या पहाटेची वेळ प्रभावी ठरते
पुढे त्यांनी सांगितले की, ''पहाटेची वेळ शरीर संबंध ठेवण्यासाठी सगळ्यात उत्तम ठरते. कारण लैगिंक उत्तेजना देणारा टेस्टोस्टेरॉन हॉर्मोन पहाटेच्यावेळी स्त्रीयांमध्येही आणि पुरूषांमध्येही चांगला प्रतिसाद देतो. याशिवाय रात्री भरपूर विश्रांती घेतल्यानं पहाटेच्यावेळी फ्रेश वाटतं. पहाटेच्यावेळी मिळणारी उत्तेजनाही वेगळीच असते. त्यामुळे दोघांमध्ये अंडरस्टॅडिंग असेल तर ठरवून पहाटेच्यावेळी शरीरसंबंध ठेवले तर जास्त सुख लाभू शकतं.''
''बहुतांश लोक कामावरून थकून घरी येतात त्यानंतर रात्री शरीरसंबंध ठेवतात. खरं पाहता त्यावेळी शरीराला विश्रांतीची गरज असते. कारण दिवसभर काम केल्यानं शरीरात जराही त्राण नसतो, अशावेळी संबंधांपेक्षा झोपणं जास्त गरजेचं असतं. लैगिंक संबंधाचा विचार केला तर त्यातही पहाटेची वेळ उत्तम असल्याचं म्हटलं आहे.'' असंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
वास्तविक पाहता अनेक जोडप्यांची दिनचर्या आणि कौटुंबिक वातावरणामुळे त्यांना सकाळी शरीरसंबंध ठेवणं शक्य होत नाही. उदा. ऑफिसला किंवा जीमला जाण्यासाठी लवकर उठावं लागतं, मुलांच्या शाळेची तयारी, स्वयंपाक करण्यासाठीच लवकर उठावं लागतं. म्हणून सकाळी संबंध ठेवणं शक्य होत नाही. अशा स्थितीत जोडप्यांनी हा प्रश्न कसा सोडवायचा याचा विचार परस्पर सहमतीने करायला हवा.