Lokmat Sakhi >Relationship > सलाम त्या माऊलीला! मुलगा गेल्याचं दु:ख बाजूला ठेवून सासूबाईनेच केले सुनेचे कन्यादान!

सलाम त्या माऊलीला! मुलगा गेल्याचं दु:ख बाजूला ठेवून सासूबाईनेच केले सुनेचे कन्यादान!

सासूबाई जेव्हा आईच्या मायेनं सुनेच्या पाठीशी उभी राहते..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 04:32 PM2021-12-08T16:32:40+5:302021-12-08T16:42:01+5:30

सासूबाई जेव्हा आईच्या मायेनं सुनेच्या पाठीशी उभी राहते..

she lost her son, mother helped daughter in law to remarry, story in Maharashtra | सलाम त्या माऊलीला! मुलगा गेल्याचं दु:ख बाजूला ठेवून सासूबाईनेच केले सुनेचे कन्यादान!

सलाम त्या माऊलीला! मुलगा गेल्याचं दु:ख बाजूला ठेवून सासूबाईनेच केले सुनेचे कन्यादान!

Highlights सिनेमातली गोष्टीही साधीच वाटावी, अशी ही अकोल्यातली कहाणी.

राजेश शेगोकार

बाबूल नावाचा एक सिनेमा फार गाजला. आपला मुलगा गेल्यावर सुनेचे लग्न वडिलांच्या मायेनं लावून देणाऱ्या आणि त्यासाठी समाजाशी लढणाऱ्या वडिलांची ती गोष्ट होती. अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांचा गाजलेला तो सिनेमा. ती गोष्ट पाहून अनेकांना वाटलंही असेल की, असं कुठं प्रत्यक्ष आयुष्यात घडतं का? मात्र, सिनेमातली गोष्टीही साधीच वाटावी, अशी ही अकोल्यातली कहाणी. सासू - सुनेचीच, पण वेगळी. इथं सासूबाईनं आई होत आपल्या सुनेचा पुनर्विवाह करण्यास नुसती संमतीच दिली नाही तर त्यासाठी पुढाकार घेतला आणि तिचे कन्यादानही केले. लता बाहेकर त्यांचं नाव. त्यांच्या लेकाचा, धनंजयचा तीन वर्षांपूर्वी हृदयविकाराने मृत्यू झाला. आई, पत्नी स्वाती आणि दाेन लहान लेकरं असा परिवार. त्यांच्यावर दु:खचा डोंगर कोसळला. मात्र, आपल्या काळजावर दगड ठेवून सासूबाईंनी ठरवलं की, आपल्या सुनेला तिचं आयुष्य नव्यानं जगता यायला हवं. त्यासाठी मग त्यांनी सुनेची आई होत तिच्या लग्नाचा विचार सुरु केला. सुनेचा दुसरा विवाह करून देण्यासाठी त्यांनी भावसार समाजाचे अध्यक्ष अनिल मावळे यांच्याशी सल्लामसलत केली. सासूबाईंचे हे आधुनिक विचार आणि मायाळू रुप पाहून मावळेही भारावून गेले आणि त्यांनी पुढाकार घेऊन दोन-तीन स्थळं स्वातीसाठी सुचविली. पण, स्वातीला दोन मुलांसह स्वीकारण्याच्या अटीचा काेणीच विचार केला नाही. पण लताबाई स्थळ शोधत होत्या. लोणी येथील महेंद्र मधुकर पेठकर यांचे स्थळ आले. ते प्रथमवर, नोकरी निमित्त खामगाव येथे स्थायिक झाले आहेत. त्यांनी दाेन्ही मुलांना स्वीकारत या विवाहाला संमती दर्शवली. स्वातीचीही संमती घेण्यात आली. दोन्ही कुटुंबातील सदस्यांनी होकार दर्शवला. दाेघांचाही अगदी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह ठरला. मात्र, लताबाईंनी घेतलेल्या सुनेच्या पुनर्विवाहाच्या निर्णयाला समाजातून काहीसा विरोधही झाला. मात्र, भावसार समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी लताबाईंच्या निर्णयाला पाठबळ दिले.

आणि मग अन् लताबाईंनी सुनेचे कन्यादान करण्याचा निर्णय घेतला. लग्न व्यवस्थित पार पडले.
लताबाईंना या साऱ्यासंदर्भात विचारले, तर त्यांच्या बोलण्यात आपण काही फार वेगळे केले, असा आव जाणवत नाही. त्या सहज सांगतात, सासूने सुनेला मुलीसारखे स्वीकारले तर मग काहीच अवघड नाही. मला जे पटले, रुचले, तिच्यासाठी योग्य वाटले ते मी केले.
एका साध्या माऊलीने आपल्या कृतीनं असा समाजासमोर आदर्श ठेवला आहे.

Web Title: she lost her son, mother helped daughter in law to remarry, story in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.