प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सांगते, मी ऐन विशीत असताना पहिल्यावहिल्या रिलेशनशीपमध्ये होते, विशेष म्हणजे हे नाते सर्वात जास्त काळ म्हणजे पाच वर्षांहून जास्त टिकले. आपल्याला माहित आहे सोनाक्षी ही शत्रुघ्न आणि पूनम सिन्हा यांची मुलगी आहे. आईवडिल आपल्याला लग्नासाठी घाई करत असल्याचेही ती म्हणते. एका मुलाखतीदरम्यान तिने आपल्या या रिलेशनशिपबाबत खुलासा केला, ती म्हणाली, शाळेत असताना मी या रिलेशनमध्ये होते, हे नाते एकदम क्यूट होते. पण पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी त्या मुलाला गुडबाय केले. आपले खरे सिरीयस प्रेम त्यानंतर बऱ्याच काळाने झाले असेही ती सांगते.
ती म्हणते, तुमच्या सगळ्या नात्यांतून तुम्ही काही ना काही शिकले पाहिजे. कारण प्रत्येक व्यक्ती वेगळा असून प्रत्येकाचे एक वेगळे व्यक्तिमत्त्व असते. पण तुम्हाला सहन करु शकेल असा व्यक्ती तुम्ही शोधायला हवा. या पहिल्या रिलेशनच्यावेळी मी खूप लहान होते पण त्यातून मी खूप गोष्टी शिकले असेही ती पुढे म्हणते. तुम्ही मोठे होता तसे अनुभवातून बऱ्याच गोष्टी शिकत जाता. मी खूप काम करायला लागले, अनेक नवनवीन लोकांना भेटले यामुळे माणूस म्हणून माझ्यात खूप बदल झाले. पण तुम्ही आहात तसे राहा आणि आपण जसे आहोत तसेच आवडणारी एखादी व्यक्ती शोधा.
आता ऐन विशीत प्रेम होणे यात काही गैर नाही. या वयात तुम्ही एखादे नाते सांभाळत असाल तर ती कौतुकास्पद गोष्ट आहे. या वयात होणारे प्रेम एकतर कायमसाठी टिकते नाहीतर तुटते. पण तुम्ही स्वत:लाच नीट ओळखू शकले नसाल तर समोरच्या व्यक्तीची ओळख तुम्हाला कशी पटणार हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रेम, नाते. आयुष्यभराचा जोडीदार शोधण्यासाठी पुढे भरपूर वेळ असतो त्यामुळे विशीत तुम्ही इतर गोष्टींवर लक्ष केंद्रित करायला हवे असे पालकांचे म्हणणे असते. पण विशीत म्हणजे ऐन तारुण्याच्या उंबरठ्यावर तुम्ही प्रेमात पडलातच आणि त्याबाबत खरंच सिरीयस असाल तर मात्र तुम्हाला काही गोष्टींबाबत स्पष्टता असणे आवश्यक आहे. सोनाक्षीच्या मुलाखतीच्या निमित्ताने या विषयावर टाकलेला प्रकाश ...
१. तुम्ही कमिटमेंटसाठी पुरेसे तयार नसता
कमिटमेंट म्हणजे आयुष्यभरासाठी तुम्हाला त्या गोष्टीसाठी वचनबद्ध राहावे लागते. तुमच्या विशीत किंवा अगदी पंचविशीत तुम्ही या गोष्टीसाठी पुरेसे तयार नसता. तुम्ही या वयात लहानसहान गोष्टींबाबतही कमिटमेंट पाळू शकत नाही तर तुम्ही एका व्यक्तीला आयुष्यभराची काय कमिटमेंट देणार. त्यामुळे जर सिरीयस रिलेशनचा विचार करत असाल तर पुन्हा एकदा शांतपणे विचार करणे गरजेचे आहे हे स्वत:ला सांगा आणि तो वेळीच करा.
२. प्रेमाचा नेमका अर्थ कळलाय?
आपण ज्या गोष्टीला प्रेम म्हणतो त्याचा नेमका अर्थ आपल्याला कळलेला आहे का याबाबत खात्री करणे आवश्यक आहे. कारण प्रेम ही मोठी संकल्पना असून ती समजून घेणे आणि त्यासोबत जगणे ही वाटते तितकी सहज-सोपी गोष्ट नक्कीच नाही.
३. तुम्ही स्थिर असण्याची शक्यता कमी असते
या वयात तुम्ही स्थिर आयुष्याच्या शोधात असता पण तुमच्या व्यावहारीक जीवनाची नुकतीच सुरुवात झालेली असल्याने ही स्थिरता तुमच्याकडे असण्याची शक्यता कमी असते. अशावेळी तुम्ही दुसऱ्या व्यक्तीच्या आयुष्याला स्थिरता कसे देऊ शकणार? करीयार, पैसे, नोकरी, कुटुंब या सगळ्या गोष्टींबाबत झगडत असल्याने ही स्थिरता यायला काही काळ जावा लागतो.
४. दुसऱ्या व्यक्तीची काळजी घ्यायला सक्षम असता?
इतरांची काळजी घेण्यात तुम्ही सक्षम असालही, पण त्याबरोबरच या वयात आपण काहीसे स्वार्थी असतो आणि त्यात काही चूक नाही. तुमची स्वत:ची काळजी घेण्यासाठी तुम्ही पुरेसे तयार असणे आवश्यक असते अशावेळी दुसऱ्या एका व्यक्तीची योग्य पद्धतीने आपण काळजी घेऊ शकतो का याचा विचार व्हायला हवा. त्यामुळे या गोष्टीसाठी थोडा वेळ घेणे आवश्यक आहे.
५. त्यागासाठी तयार आहात?
तुम्ही प्रेमात पडत असाल तर हा प्रश्न तुम्ही दररोज स्वत:ला वाचारायला हवा. दुसऱ्या व्यक्तीसोबत आपले आयुष्य शेअर करताना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो. यामध्ये अगदी लहानसहान गोष्टींपासून मोठ्या निर्णयांपर्यंत विचार करावा लागेल. मग असा त्याग करण्याची तुमची या वयात तयारी आहे का हे तपासा आणि मगच पुढे जा.