भक्ती चपळगांवकर
गेली शेकडो वर्षे विवाहसंस्था समाजाच्या केंद्रस्थानी आहे. मुलं मोठी झाली की त्यांची लग्नं होतात, त्यांना मुलंबाळं होतात; मग, पुढे त्या मुलांची लग्नं होतात. जणू लग्न होणे हे समाजाने ऑटोपायलटवर टाकलंय. लग्न झाल्याने समाजाला फायदे होतात हे बहुतेकांना मान्य आहे. मूल जन्माला घालण्यासाठी एक हक्काची बाई घरात येते आणि स्वतःला स्वतःच नव्या घराला दत्तक देते. आता तरुण लग्नाळू मुलं-मुली लग्नाकडे वेगळ्या नजरेने पाहत आहेत हेही खरंच म्हणा. ते विचार करून लग्न करतात. बऱ्याचदा लग्नाआधी एकमेकांच्या सहवासात राहतात. मुलं जन्माला घालायची आहेत की नाही, असतील तर कधी, किती वगैरे निर्णयपण विचार करून घेतात.
मग, इतका समाज पुढे जातोय तर लग्नापूर्वी आपल्या आईबाबांचे खिसे रिकामे करून आपले आयुष्य सुरू करू नये, असा विचार हे सुज्ञ तरुण-तरुणी का करीत नाहीत?
वीस-पंचवीस वर्षांपूर्वी बडजात्या कुटुंबाच्या कृपेने आपण लग्नात जोडे लपवायला शिकलो. तिकडे उत्तरेकडे ज्या प्रकारे लग्नात मुलीच्या आईबापांना लुटायच्या अनेक चालीरिती आहेत, त्या बघता घेतले मुलांकडून थोडे पैसे परत तर काय, असा विचार तिकडच्या मुलीच्या मैत्रिणींनी केला असेल. जोडे लपविणे हा त्यातूनच सुरू झालेला प्रकार मग इकडेही सुरू झाला. लग्नात थोडी गंमत, थोडे रुसवेफुगवे रीतभात असल्यासारखे, त्यामुळे तिथपर्यंत ठीक होते; पण, नंतर नंतर ‘मेहंदी लगा के रख ना’ने धुमाकूळ घातला आणि लग्नाच्या आधी मुलीला मेंदीचे चार ठिपके लावणारे मराठीजन मेहंदीसाठी एक दिवस, त्यापाठोपाठ हलदी, त्यापाठोपाठ संगीत असले समारंभ, मग लग्न, बिदाई, रिसेप्शन असं सगळं करू लागले. लग्नापूर्वीचे प्री वेडिंग शूट आणि लग्नसमारंभाचे तमाम शूट नी फोटो, त्यासाठीचा खर्च हे वेगळेच. साखरपुडा हा वेगळा इव्हेंट पूर्वीच झालेला असतो, तो वेगळाच. त्यालाही हॉल, जेवण, मनोरंजन सगळे काही आहेच. या सगळ्यावर लाखोंचा खर्च झालाच पाहिजे, असा समाजाचा समज झाला आहे.
ठीक आहे, समाजात, विशेषतः मध्यमवर्गाकडे जरा पैसा खुळखुळतोय, जगभरात मंदीची लाट उसळली तरी आपल्याकडील मॉलमधील गर्दी आणि हॉटेलच्या ऑर्डर कमी होणार नाहीत हे सत्य आहे. पैसा खिशात असेल तर आपल्यापेक्षा चांगली आर्थिक परिस्थिती असलेल्यांचे अनुकरण केले जाते. यात चित्रपट, मालिका, मासिके, झालेच तर नातेवाईक आणि ओळखीच्यांची आपण उपस्थिती लावलेली लग्ने यांचा प्रभाव असतोच. तो असावा कारण माणसाला सौंदर्याची आसक्ती असते.
त्यात सिनेसुपरस्टार्स, क्रिकेटर्स, सेलिब्रिटीजची कोट्यवधींची उधळपट्टी होणारी लग्ने समाजमाध्यमांवर दिसतात. युरोपच्या एखाद्या समुद्रकिनाऱ्यावर, राजस्थानमधल्या एखाद्या महालात होणारी ही लग्ने कोट्यवधी रुपये खर्च करून होतात. त्याचे देखणे फोटो झळकतात. नवऱ्या मुलीचा वेडिंग त्रुसो (बस्ता) सब्यसाची, मनीष मल्होत्रा किंवा गेला बाजार तरुण तहिलियानीने डिझाईन केलेला असतो. हे फोटो इतके देखणे असतात की लग्नाची स्वप्ने बघणारी प्रत्येक मुलगी स्वतःला त्या वेषात, त्या रंगभूषेत बघू लागते. पण, हे अनुकरण विचारहीन असेल तर लाखो रुपये खर्च करून डेकोरेशन केलेला मंडप आणि खर्च फक्त फक्त माळ्यावरच्या किंवा आता मोबाइलच्या क्लाऊडवर पडून राहिलेल्या फोटोंपुरताच मर्यादित राहील हे लक्षात घ्यायला हवे.
मायेची साडी आणि आठवणी
अशावेळी एखादीच सेलिब्रिटी वेगळी दिसून येते. नेटफ्लिक्सवर ‘कपिल शर्मा शो’मध्ये सोनाक्षी सिन्हाने सांगितले, “माझ्यासाठी लग्न हा खूप भावनिक सोहळा होता. माझी आई जी साडी नेसून लग्नाच्या मंडपात आली तीच साडी नेसल्यावर मला फार छान वाटले आणि मला मुलगी झाली तर भविष्यात तिने तिच्या लग्नात तीच साडी नेसली तर मला अजून छान वाटेल.”
लग्न समारंभात पैशांचे इतके प्रदर्शन होत असताना माझी मुलगी वेगळा विचार करते याबद्दल तिच्या आईनेपण तिचे कौतुक केले. यामी गौतमनेही लग्नात तिच्या आईची साडी नेसली होती. त्या साडीवरून आठवले की इंदिरा गांधी त्यांच्या लग्नात खादीची गुलाबी साडी नेसल्या होत्या आणि त्याचे सूत पंडित नेहरूंनी तुरुंगात कातले होते, हीच साडी पुढे सोनिया गांधींनी राजीवबरोबर लग्न होताना नेसली होती.
एखाद्या कार्यक्रमात पूर्वी घातलेले कपडे पुन्हा घालायला आता ‘रिपर्पज करणे’ असा शब्दप्रयोग आहे. एकदा कपडा नेसला की त्याचा उद्देश संपतो जणू. हा विचार घातक आहेच; पण, हा पाश्चात्त्य जगातून, अमेरिकेतून आला याबद्दल आश्चर्य वाटायला नको. ज्या देशाने लोकसंख्येची घनता कमी असतानाही जगात सगळ्यात जास्त कचरा निर्माण केला आहे, तिथेच अशा संकल्पना जन्माला येणार. अमेरिकेने उत्तमोत्तम शोध लावले, जगाला अनेक क्षेत्रांत नवी दिशा दिली, तिथल्या नावीन्याच्या शोध घेण्याच्या वृत्तीने अमेरिका जगावर राज्य करतोय; पण, लाइफस्टाइल किंवा राहणीमानाच्या बाबतीत या देशाने जगाला फार वाईट वाटेवर नेले आहे. आपल्याकडेही होऊ दे खर्च म्हणत खर्च करणे याला काही अर्थ नाही.
कित्येक वर्षांपूर्वी मी माझ्या एका वर्गमित्राच्या भावाच्या लग्नाला बारामतीच्या शेजारच्या खेड्यात गेले होते. गावाकडचे लग्न. तिकडे स्टेजवर लग्न लागले, वाजंत्र्यांनी वाजवले आणि इकडे मंडपात, ऑलिम्पिकमध्ये होणार नाहीत अशा तत्परतेने लोकांनी शिस्तशीर रांगा केल्या आणि ते जमिनीवर बसले, सतरंज्या लागल्या की नाही हे आठवत नाही. आठवतं ते त्या लग्नातलं चविष्ट जेवण. पत्रावळी लागल्या, त्यात लगोलग मसालेभात वाढला गेला, पुढे आली ती मोठ्या उखळात वांगी, बटाटे, हरबरे चेचून केलेली रस्साभाजी, पुरी आणि बुंदी. रसना तृप्त झाली. नवरा-नवरी खूश, आम्ही खूश.
आताच्या लग्नांत हा मेनू नसेल कदाचित; पण, तो साधेपणा निश्चितच असू शकतो. पैसा लग्नात संपविण्यासाठी साठवायचा नसतो, एवढे शहाणपण आले तरी पुरे...
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)
bhalwankarb@gmail.com