स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा आपण नेहेमी मारतो. त्यासंदर्भात नेहमीच चर्वितचर्वण सुरू असतं, पण अमेरिकेसारख्या प्रगत देशातही अजून पूर्णपणे ही समानता नाही. तिथेही पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी हक्क, कमी पगार, दुय्यम दर्जा दिला जातो. शतकानुशतकांपासून समानतेची ही लढाई जगभरात सुरू आहे; पण तिला अजूनही पुरेसं यश आलेलं नाही. वैवाहिक संबंध, विवाह, मुलं या बाबतीत तर महिलांवर जगभरातच अनेक ठिकाणी कठोर सामाजिक आणि कायदेशीर बंधनं आहेत. जे अधिकार पुरुषांना आहेत, ते स्त्रियांना नाहीत, त्या बाबतीत स्त्री - पुरुषांसहित सारेच ‘कट्टर परंपरावादी’ आहेत.
सध्या दक्षिण आफ्रिकेत स्त्री-पुरुष समानतेवरून खूप मोठं वादळ उठलं आहे. अर्थात त्याचं कारणही तसंच आहे. दक्षिण आफ्रिका हा काही तसा श्रीमंत किंवा विकसित देश नाही, तरीही दक्षिण आफ्रिकेचं संविधान हे जगातल्या सर्वांत उदार संविधानांपैकी एक मानलं जातं. कारण तेथील नागरिकांना आणि महिलांना बरेच अधिकार आहेत. स्त्री-पुरुष समानता आणि भिन्नलिंगीय समाजाबाबतही तिथे उदार दृष्टिकोन आहे. दक्षिण आफ्रिकेत स्त्री असो किंवा पुरुष; दोघांनाही समलैंगिक विवाहाचा अधिकार आहे. पुरुषांना बहुविवाहाचा किंवा बहुपत्नित्वाचा अधिकार आहे. पुरुषांना एकाच वेळी एकापेक्षा जास्त पत्नी असू शकतात, तो अधिकार मात्र स्त्रियांना नाही. ही असमानता आता सरकारच्याच डोळ्यांत खुपते आहे. पुरुषांना जर एकाच वेळी अनेक बायका असू शकतात, तर महिलांना एकाच वेळी एकापेक्षा जास्त नवरे का असू नयेत, असा सवाल आहे. ही असमानता दूर करण्यासाठी सरकारच्या गृह विभागानेच एक प्रस्ताव तयार केला आहे, विवाहाच्या बाबतीत पुरुषांप्रमाणेच स्त्रियांनाही पती निवडीचा आणि एकापेक्षा अधिक पती असण्याचा अधिकार असावा यासाठी संसदेत हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. संसदेत मान्यता मिळाल्यानंतरच या प्रस्तावाचे कायद्यात रूपांतर होईल. पण, या प्रस्तावामुळे केवळ देशातच नाही, तर अख्ख्या जगात खळबळ उडाली आहे. दक्षिण आफ्रिकेतही त्यावरून मोठे वादविवाद, चर्चा रंगल्या आहेत. विवाहाबाबत स्त्रियांनाही समान अधिकार असावेत यासाठी दक्षिण आफ्रिकेतील मानवाधिकार कार्यकर्त्यांनी तर कधीचीच ही मागणी लावून धरली आहे. पण, आता सरकारनेच प्रस्ताव तयार केला म्हटल्यावर कट्टरपंथियांनी त्याला प्रचंड विरोध केला आहे. यामुळे देशाची संस्कृती नष्ट होताना याबाबतची नुसती चर्चादेखील बाश्कळ आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. विरोधी पक्षांनीही या प्रस्तावाला विरोध केला आहे.
आफ्रिकन डेमोक्रॅटिक पार्टीचे नेते केनेथ मेशो म्हणतात, बहुपत्नित्व ही शेकडो वर्षांपासूनच समाजमान्य प्रथा, परंपरा आहे. ‘बहुपतित्व’ ही संकल्पनाच हास्यास्पद आहे. ती समाजालाही मान्य होणार नाही. शिवाय पुरुषही याबाबतीत अतिशय ‘आक्रमक, संशयी’ असतात.
इस्लामिक अल जमाह पार्टीचे नेते गनिफ हेंड्रिक्स यांचं म्हणणं आहे, या प्रकारामुळे विवाहसंस्थेलाच तडे जातील. मूल नेमकं कुणाचं यावरूनही वाद होतील आणि त्यासाठी डीएनए टेस्ट कराव्या लागतील. आफ्रिकन संस्कृतीला हा प्रकार पूर्णत: परका आणि न स्वीकारता येण्याजोगा आहे, अशी प्रतिक्रिया बहुसंख्य धार्मिक नेत्यांनी व्यक्त केली आहे.
‘बहुपतित्व’ या विषयावर संशोधन आणि अभ्यास करणारे प्राध्यापक कोलीस मकोको यांच्या मते दक्षिण आफ्रिका सरकारच्या प्रस्तावावरील आक्षेप नियंत्रणाबाबत आहेत. आफ्रिकन समाज या समानतेसाठी तयार नाही. ज्या महिलांवर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही त्यांचे काय करावे हे आम्हाला माहीत नाही.
यासंदर्भातील धोरणबदलाबाबत आरोग्य विभाग धार्मिक, परंपरावादी नेते, मानवाधिकार कार्यकर्ते आणि इतर गटांशी कळीच्या मुद्द्यांवर चर्चा करीत आहे.
सध्याच्या कायद्यात सज्ञान नसलेल्यांनाही लग्नाचा अधिकार आहे. ज्या जोडप्यांपैकी एखाद्याला लिंगबदल करायचा आहे आणि घटस्फोट न घेता आपलं लग्नही कायम ठेवायचं आहे, याबद्दल सध्या कायदा काहीच बोलत नाही, याबाबतही सरकारला कायद्यात सुधारणा करायची आहे. मुस्लीम, हिंदू, ज्यू विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यात येईल, असेही या प्रस्तावात म्हटले आहे.
आफ्रिकन विशेषज्ञांचे याबाबत मत आहे, की बहुपतित्वाचा कायदा झाला, तर तो एक मोठा क्रांतिकारी बदल ठरेल. महिलांना वैवाहिक स्वातंत्र्याचा अनुभव घेता येईल आणि रुढीवादी लोकांना मोठा झटका बसेल.
मुलं कोणाला ‘बाप’ म्हणणार?
ज्या पुरुषांना स्वत:ला एकापेक्षा जास्त पत्नी आहेत, त्यांनीही या प्रस्तावाला कठोर विरोध केला आहे. दक्षिण आफ्रिकेतील उद्योगपती आणि टीव्ही पर्सनॅलिटी मुसा मसेलुकु यांना चार बायका आहेत. ते म्हणतात, बहुपतित्वाला मान्यता दिली तर आफ्रिकन संस्कृतीच नष्ट होईल. या संबंधांतून जन्माला आलेल्या मुलांचं काय होईल? आपले वडील कोण, याची ओळख त्यांना कशी पटणार? महिला कधीच पुरुषांची जागा घेऊ शकत नाहीत. हे असं काहीतरी विचित्र कुठेतरी, कधीतरी तुम्ही ऐकलं आहे का? पुरुषांनी बायकोच्या घरी राहायला जावं आणि आपल्या बायकोचं आडनाव लावावं असं तुम्हाला अपेक्षित आहे का?