गौरी पटवर्धन
“काजळ जरा जास्त लागलंय का आज?”“तुला यलो पेक्षा तो ऑरेंज टॉप जास्त छान दिसतो... तो घाल.”“लिपस्टिक जरा जास्तच डार्क आहे का?”“तू योगापेक्षा एरोबिक्स का नाही ट्राय करत? दॅट्स मच बेटर एक्सरसाइज यू नो? शिवाय त्याने वेट लॉस पण होईल.”“किती पाणी पितेस तू जेवतांना?”“असे काय केस वर बांधून ठेवले आहेस? जरा नीट विंचर ना…”“फारच उशीर झाला ना आज तुला यायला?”“तुझ्या इअररिंग्ज फारच कॉलेज गर्ल टाईप्स वाटतायत. मला वाटतं बदल तू त्या…”-या आणि अश्या वर वर पाहता अत्यंत निरुपद्रवी कॉमेंट्स दिवसभर बायकांचा पिच्छा पुरवत असतात. त्या करणारे लोक बहुतेक वेळा अत्यंत जवळचे पुरुष आणि काही वेळा स्त्रियाही असतात. या कॉमेंट्स करणारे लोक अत्यंत मनापासून त्या बाईच्या भल्यासाठीच या सूचना वेळोवेळी देत असतात. ते त्यांचं प्रामाणिक मत असतं. आणि तरीही त्यात काहीतरी खटकत राहतं. काय ते कळत नाही. बरं या त्यात तो टिपिकल “आमच्याकडे हे चालत नाही.” किंवा “बायकांनी असे कपडे घालू नयेत.” असला टिपिकल बंधनं घालण्याचा सूर नसतो. असलीच तर काळजी असते, आपुलकी असते, कळकळ असते… आणि तरीही त्यात काहीतरी असं असतं ज्यामुळे या सूचना नको वाटतात.
ते असं की त्या सूचना बहुतेक वेळा मोठ्या वयाच्या, स्वतःचं चांगलं वाईट उत्तम समजणाऱ्या स्त्रीला दिलेल्या असतात. त्या पर्सनल स्पेसमध्ये घुसतात. ती जेवतांना किती? पाणी पिते हा काही संपूर्ण कुटुंबाने निर्णय घेण्याचा विषय असू शकत नाही. बरं सल्ला देणाऱ्याला त्यातलं काहीच कळत नसतं. त्याने नुकतंच कुठल्यातरी फॉरवर्डेड मेसेजमध्ये वाचलेलं असतं की जेवतांना फार पाणी पिऊ नये. बरं फार म्हणजे किती? तर सूचना देणारा स्वतः जेवढं पाणी पितो ते योग्य. पण मग तुम्ही तुम्हाला पाहिजे तेवढं प्या आणि तिला पाहिजे तेवढं पिऊ द्या. पण तसं नाही. आपल्याला घरातल्या बायकांपेक्षा जास्त कळतं हे गृहीतक बहुतेक सगळ्या पुरुषांच्या डोक्यात फिट्ट बसवलेलं असतं. त्यामुळे त्यांना अश्या सतत सूचना करत राहणं ही ऑलमोस्ट त्यांची जबाबदारी वाटते.बरं, “माझं मी बघीन. विचारल्याशिवाय सल्ला देऊ नकोस.” असं म्हणायला बायकांना कोणी शिकवलेलंच नसतं. त्या निमूटपणे सल्ले ऐकून घेत राहतात. त्याप्रमाणे वेळोवेळी वागण्यात, सवयीमध्ये बदल करत राहतात. जणू काही त्यांचं आधी खरंच काहीतरी चुकलेलं असावं. आणि मग एक स्टेज अशी येते की आपण काहीही केलं तरी घरातल्या कोणीतरी (शक्यतो पुरुष माणसाने) ते ओके केल्याशिवाय ती गोष्ट करण्याचा कॉन्फिडन्स वाटत नाही. “मला छान वाटतंय म्हणून” हे कारण पुरेसं ठरेनासं होतं.त्यापेक्षा या अनावश्यक सूचना देणं बंद केलं तर? किंवा ऐकून घेणं बंद केलं तर? काजळ किती लावलंय ते तिला माहिती असतं, लिपस्टिक डार्क आहे काय तिला लावतांना दिसत नाही का? विचारला तर सल्ला द्या. नाही तर कॉम्प्लिमेंट द्या. तिचं तिला ठरवू द्या!पण तसं होत नाही आणि मग कोण काय म्हणेल या धाकातच आपल्याही नकळत बायका आयुष्यभर जगतात. आपल्याला काय छान दिसतं याचं सर्टिफिकेट इतरांकडे मागत राहतात.. कळत-नकळत!बघा विचार करुन..