Join us  

समीर वानखेडेंच्या निमित्ताने स्पेशल मॅरेज ऍक्ट पुन्हा चर्चेत, काय असतो हा कायदा, तरतुदी काय सांगतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2021 12:06 PM

स्पेशल मॅरेज ऍक्ट, भिन्न धर्मीय व्यक्तींच्या विवाहाबाबत काय सांगतो?

ठळक मुद्देस्पेशल मॅरेज अॅक्ट पुन्हा चर्चेत का आलासमीर वानखेडे यांचे पहिले लग्न स्पेशल मॅरेज अॅक्ट अंतर्गत झाले का?

क्रूज ड्रग प्रकरणामुळे आर्यन खान हे नाव जसे चर्चेत आहे तसेच एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांचेही नाव जोरदार चर्चेत आहे. त्यामुळे मूळ मुद्दा बाजूला राहून वेगळाच विषय रंगला आहे. धर्माच्या मुद्द्यावरुन समीर वानखेडे यांच्यावर आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर बरेच आरोप केले आहेत. वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर हिनेही या आरोपांवर मौन सोडत वानखेडे यांच्यावरील आरोप खोडून काढले आहेत. नवाब मलिक यांनी 25 ऑक्टोबर रोजी ट्विटवर एक पोस्ट केली होती. त्या पोस्टमध्ये असलेला दस्तऐवज म्हणजे समीर वानखेडे यांचा जन्माचा दाखला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामध्ये त्यांचे नाव समीर दाऊद वानखेडे असे असल्याचे म्हटले आहे. तसेच समीर यांचा सबाना कुरेशी यांच्याशी निकाह झाला असून त्यांच्यासोबतचा एक फोटोही मलिक यांनी पोस्ट केला आहे. यावरुन वानखेडे मुस्लिम असल्याचे दिसते. तर वानखेडे यांनी खोटी जात दाखवत नोकरीत आरक्षण घेतल्याचे आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. 

( Image : Google)

मात्र हे आरोप वानखेडे यांनी खोडून काढले असून आपण धर्माने हिंदू असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आपले वडिल हिंदू असून आई मुस्लिम होती. आईच्या इच्छेखातर आपण पहिले लग्न मुस्लिम मुलीशी मुस्लिम पद्धतीने केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. आता त्यांची आई हयात नसून पहिल्या पत्नीशीही आपण कायदेशीररित्या घटस्फोट घेतल्याचे त्यांनी सांगितले. तर २०१७ मध्ये समीर वानखेडे यांनी क्रांती रेडकर यांच्याशी हिंदू पद्धतीने लग्न केले. आता पहिले लग्न दोन वेगळ्या धर्माच्या व्यक्तींमध्ये झाले असून दोघांनीही आपले धर्म बदलले नसल्याचे बोलले जात आहे. म्हणजेच हे लग्न विशेष विवाह कायद्यांतर्गत (Special Marriage Act) झाल्याचे समजते. आता हा विशेष विवाह नोंदणी कायदा काय असतो याबाबत प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे म्हणतात...

( Image : Google)

विशेष विवाह नोंदणी कायद्याविषयी... 

१. वेगळ्या धर्माचे २ लोक जर लग्न करत असतील आणि त्यांनी आपला धर्म बदलला नाही तर ते लग्न विशेष विवाह कायद्यांतर्गत नोंदणी केले जाते. 

२. तसेच दोन व्यक्तींचे एकमेकांवर प्रेम असेल आणि त्यांनी पळून जाऊन लग्न केले तरीही अशाप्रकारे विशेष विवाह कायद्यांतर्गत नोंदणी होते. याठिकाणी लग्न लावणारी व्यक्ती आणि २ इतर व्यक्ती यांची सही गरजेची असते. 

३. निकाह म्हणजेच मुस्लिम पद्धतीने केले जाणारे लग्न हे केवळ दोन मुस्लिम व्यक्तींमध्येच होऊ शकते. 

४. मात्र या सगळ्यातील महत्त्वाची बाब म्हणजे आपल्याकडे धर्मांतर करण्याची कोणतीही अधिकृत पद्धत अस्तित्वात नाही. संविधानात, कायद्यात याबाबत कोणतेही ठोस नियम नाहीत. त्यामुळे आपल्याकडे अनेक अडचणी आणि गोंधळ निर्माण होतात.

५. सुरुवातीला या कायद्यांतर्गत नोंदणी करण्यासाठी १ महिना थांबावे लागत होते. मात्र आता ही नोंदणी लगेचच करता येऊ शकते. अलाहाबाद न्यायालयाने याबाबतचा निर्णय दिला आहे. 

टॅग्स :रिलेशनशिपलग्नक्रांती रेडकरसमीर वानखेडे