Join us  

कानकोंडा पुरुष चवताळून बाईवर हात उगारत म्हणतो, स्साली.. जबान चलाती है?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2023 3:18 PM

पुरुषांच्या आयुष्यातली घुसमट शोधात बुंदेलखंडात केलेल्या प्रवासाची कहाणी : यावर्षीच्या 'लोकमत दीपोत्सव' मध्ये! वाचा, लोकमत दीपोत्सव

ठळक मुद्देतो उसनं अवसान आणतो, डरकाळ्या फोडतो, बाईला झोडतो, मारतो.. आपली हताशा, निराशा अन‌् अपयशाचं खापर बाई आणि बेरोजगारी यांच्यावर फोडतो.

बुंदेलखंड हा भारतातला अविकसित, मागास भाग मानला जात असला तरी, त्यातही ‘विकसित’ आणि ‘अविकसित’ असे फरक दिसतातच. शक्यतो या सर्वच भागात आम्हांला जाता येईल असा आमचा प्रयत्न होता. मध्य प्रदेशातल्या नयागांव छीर या भागात आम्ही पोहोचलो. त्यातल्या त्यात थोडा ‘विकसित’ म्हणता येईल असा. हा परिसरही मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर येतो.

सतना जिल्ह्यात रस्त्यावरच एक टपरी होती. रस्त्याच्या कडेलाच झाडाखाली सात-आठ खाटा टाकलेल्या होत्या. त्या ठिकाणी काही लोक झोपलेले होते. आराम करत होते. लांबच्या प्रवासात चहापाणी घ्यायला, थोडी विश्रांती घ्यायला लोक इथे थांबतात. टपरीचा मालक किरण तरुण मुलगा होता. इंटरपर्यंत शिक्षण झालेलं. शेजारीच त्याची शेती होती. इथे टपरी टाकल्यामुळे गिऱ्हाइकी पण करता येते आणि शेतीकडेपण पाहाता येतं, असं त्याचं म्हणणं. हा मंदिरांचा परिसर आहे. त्यामुळे इथे बऱ्यापैकी विकास झाला आहे, हॉस्पिटल झालं आहे, विश्वविद्यालय झालं आहे, जवळच एअरपोर्टही तयार होतंय, लोकांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी घरं तयार होताहेत, त्यामुळे इथे कन्स्ट्रक्शनच्या कामासाठी ‘बेलदार’ आणि ‘रेजा’ यांना चांगली मागणी आहे. बेलदार म्हणजे पुरुष मजूर तर रेजा म्हणजे स्त्री मजूर.

पुरुषांना किमान चारशे रुपये तर महिलांना किमान ३५० रुपये रोजंदारी मिळते. त्यामुळे इथल्या लोकांना कामाची तशी फारशी कमतरता नाही. कारण सातत्यानं नवी बांधकामं इथे उभी राहताहेत. आजूबाजूला जंगल आहे, पण कन्स्ट्रक्शन्सची कामं सुरू झाल्यानं जंगलातली कामं, लाकूडतोड आता तशी कमी झाली आहे. ‘बिजली आई, गॅस आया, इसलिए लकडी की डिमांड अब कम हो गई..’ असं किरणचं म्हणणं होतं. ‘बिकास तो हो रहा है भैया, लेकिन वो संस्कार छिन रहा है..’

(छायाचित्रं- प्रशांत खरोटे)

शेजारीच उभे असलेले पन्नाशीतले रामचाचा एकदम बोलले. तुम्हांला असं का वाटतंय विचारल्यावर म्हणाले, ‘हमारे आसपासके करीब दस-बीस गावों मे आजतक कभी लडका-लडकी घरसे भाग नहीं गये थे, मैंने तो ये कभी ना देखा, ना सुना था.. लेकिन अब ये मैं जादा सुन रहा हूँ.. अभीतक यहाँ लव्ह मॅरेज कभी हुआ नहीं, लेकिन अब होगा, अभीही गाँव की तीन लडकीया भाग गई थी। दो को तो वापस ले आये, मगर पता नहीं, कौन कब भाग जाए.. सब मोबाईल का परिणाम है..’‘कंट्रोल’ही नहीं है लडकियाँ, औरतोंपर.. ना उनके माँ-बाप का, ना उनके मर्द का..’- मगनलाल सांगत होते, ‘कंट्रोल करेंगे भी कैसे? घर के मर्द नामर्द बनके घर में बैठे है। औरतें बाहर निकलकर काम कर रही है, घर में पैसा ला रही है, घर चला रही है, उनके पास पैसे की और डिसिजन की भी पॉवर आ गयी है, उनको अपनी ताकद और अधिकार का पता चल गया है, जागरूक हो गयी है महिलांए, तो फिर ये बदलाव तो दिखेगाही!’

त्यांना विचारलं, पण काय वाटतं तुम्हांला, महिला स्वयंपूर्ण होताहेत, घराबाहेर पडून घर चालवताहेत, हे तुम्हांला अयोग्य वाटतं का?..त्यांचं म्हणणं होतं, ‘घर में औरत अपने पती पर, ससूर पर कितनी भी हावी क्यों न हो, लेकिन समाज के सामने झुकी रहे. घर की, घर के मर्द की इज्जत ना उछाले!..’

थोडं पुढे जाऊन आडवाटेनं छीर कपूरवा या गावात शिरलो. गाव छोटंसंच. एकूण साठ घरं. इथेही चार तरुण ‘लकडी’ खेळत होते. इतर दोन-तीन जण त्यांच्या शेजारी बसून त्यांचा ‘गेम’ पाहत होते. ‘लकडी’ हा पत्त्यांचा एक खेळ. ऑनलाईनही खेळता येतो. बरेच जण पैसे लावून खेळतात. ह्या पोरांचंही तेच चाललं होतं.त्यांतला एक जण एका चिठोरीवर प्रत्येकाचे पॉइंट लिहित होता, पण आम्ही फक्त टाइमपास म्हणून खेळतोय, असं त्यांचं म्हणणं. बहुतेकांची लग्नं झालेली. त्यांना विचारलं, तुमच्या बायका बाहेर मजुरीला जातात का? जवळपास प्रत्येकानं सांगितलं, ‘एक औरत को नहीं खिला पाये, तो फिर मर्द क्या काम का? हमारी औरते काम के लिए घरसे बाहर नहीं जाती..’

गावातच आणखी एक मोठं घर. या घरातली सगळी मुलं-मुली शिकलेली आहेत. काही ग्रॅज्युएटही झालेली आहेत आणि काही जण शहरात जाऊन नोकरीही करतात. घरातल्या सगळ्यांचंच म्हणणं होतं, महिलांनी शिकायला पाहिजे. प्रत्येक कुटुंबानं त्यांना शिकवलं पाहिजे. त्यांनी नोकरी करण्यातही काहीच वावगं नाही, पण महिलांनी आपली ‘पायरी’ मात्र सोडायला नको. अगदी ‘पडदा’ नको, पण घरातल्या सुनांनी समाजाची, घरच्यांची मानमर्यादा पाळलीच पाहिजे.खाटेवर उघड्यानंच बसलेल्या आणि जुन्या वर्तमानपत्रानं हवा घेणाऱ्या सत्तरीतल्या आजोबांनी लगेच आपलं मत मांडलं, महिलांनी घरातल्या पुरुषांशी,मोठ्या माणसांच्या नजरेला नजर नाही मिळवली, मान-नजर खाली झुकवलेली ठेवली, तरी तो पडदाच आहे. तेवढीच त्यांच्याकडून अपेक्षा आहे.

हे आजोबाही शिकलले आहेत. बरीच वर्षं त्यांनी शहरात काढली आहेत. खूप काम, मेहनत केली आहे. त्यांचं घरही त्यांनी स्वत:च बांधलं आहे.ते म्हणतात, आजचे पुरुष हे ‘पुरुष’च नाहीत. त्या वेळी बायकाही तीन-तीन किलोमीटर अंतरावरून डोक्यावरून पाणी आणायच्या. शिवाय घरचं सगळं स्वयंपाकपाणी, झाडलोट, आल्यागेल्याचं, असलंच तर स्वत:च्या शेताचं. पहाटे चारपासूनच त्यांची कामं सुरू व्हायची. इतकी कामं करूनही दिवसभर कशा फ्रेश. ‘मर्द’ म्हणवणारे आत्ताचे पुरुष, ते तर थोडंसं काम करताच धापा टाकतात. दम लागतो त्यांना. त्या वेळच्या बायकासुद्धा आत्ताच्या पुरुषांपेक्षा जास्त ‘मर्द’ होत्या!..’

***

बाई आणि बेरोजगारी ही बुंदेलखंडातील पुरुषांची मुख्य कमजोरी आहे. तेच त्यांचं रडगाणंही आहे. याच दोन गोष्टींनी इथल्या पुरुषांचं आयुष्य व्यापलं आहे. जे हवं, ज्यासाठी धावायचं, तेच मृगजळासारखं दूरदूर जात असल्यानं तो भांबावला आहे. चक्रावला आहे. अस्वस्थ झाला आहे. त्याउलट बायका सामर्थ्यवान होताहेत. त्यांच्या हाती सत्ता येते आहे. सरकारकडून त्यांना बळ मिळतं आहे. त्या स्वत:ही कर्तृत्ववान होताहेत. जिद्दीनं आपली लढाई लढताहेत.ज्या बाईला आजपर्यंत पायाची दासी मानलं, जिला कस्पटासमान लेखलं, तीच आता आपल्या डोक्यावर बसते आहे; आपल्याला खिजवते आहे. आपल्याला, आपल्या कर्तृत्वाला, आपल्या पुरुर्षार्थाला आव्हान देते आहे, असं वाटून तो आणखी-आणखी कोषात जातो आहे. आपलं आता काय होईल याची भीती त्याच्या चेहऱ्यावरून, त्याच्या हावभावांवरून त्याच्या व्याकुळतेतून दिसते आहे.

घरातला ‘पुरुष’ बाईच आहे. ‘कर्ता’ तीच आहे. कारण सगळं काही तीच करतेय. तीच घर सांभाळतेय, संसार करतेय, घर चालवतेय. घरात पैसा आणतेय. कायदेहीतिच्याच बाजूनं आहेत. आपलं ‘नामधारी’ राजेपद कधीच गळून पडलंय, हेही इथल्या पुरुषाला कळून चुकलं आहे. त्यामुळे तो अजून कानकोंडा झाला आहे. पुरता निकम्मा झाल्यामुळे दारू, नशा, पत्ते अशा गोष्टींचा त्याला आधार लागतो. बेरोजगारीनंही त्याला घराबाहेर काढलं आहे. साधं पोट भरण्यासाठीही आज इथे तर उद्या तिथे, असं ‘पलायन’ त्याला करावं लागतं य. त्याला ‘किंमत’ राहिलेली नाही. आपल्यातला ‘पुरुषार्थ’ अजून संपलेला नाही, आपण अजूनही ‘आहोत’ हे दाखवण्यासाठी म्हणून मग तो उसनं अवसान आणतो, डरकाळ्या फोडतो, बाईला झोडतो, मारतो.. आपली हताशा, निराशा अन‌् अपयशाचं खापर बाई आणि बेरोजगारी यांच्यावर फोडतो.

झाकली मूठ सव्वा लाखाची, म्हणून बाईला केविलवाणेपणानं म्हणतो, समाज के सामने झुकी रहे, मर्द की इज्जत ना उछाले!..

(लोकमत दीपोत्सव मध्ये प्रकाशित झालेल्या समीर मराठे यांच्या लेखातील अंश.)लोकमत दीपोत्सव अंक मागवण्यासाठी संपर्कऑनलाईन बुकिंग deepotsav.lokmat.comसवलतीच्या दरात ग्रुप बुकिंगसाठी संपर्क फोन– 1800-233-8000 आणि 960-700-6087 (सकाळी ११ ते संध्याकाळी ५) )

टॅग्स :लोकमत दीपोत्सवरिलेशनशिप