Join us  

नोकरीतले ताण, बायकोशी भांडण- पुरुषांचाही वाढला ‘स्ट्रेस’; पण पुरुषांनी बोलायचं कुणाशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2022 3:55 PM

Statistics of Connecting Helpline Family Issues Affecting on Male Psychology : पुण्यातल्या कनेक्टिंग नावाच्या हेल्पलाइनवर ६५ टक्के पुरुषांचे फोन कॉल्स, ताण-कौटुंबिक कलह, आत्महत्येचे विचार यामुळे जगणं अस्वस्थ

ठळक मुद्दे ‘नकारात्मकता, अपमान, भेदभाव, वैद्यकीय आणि कायदेशीर चौकशी, नैराश्य, असुरक्षितता अशा अनेक कारणांमुळे माणसांच्या मनावर आघात होतात.पुरुषांमध्येही वाढलेला स्ट्रेस हे घरातल्या प्रेशर बॉम्बचे एक लक्षणच आहे. 

नवराबायकोची लहानमोठी भांडणं काही नवीन नाही. संसार म्हणजे भांड्याला भांडं लागायचंच. त्यात कोरोनाकाळात घरोघर ताण वाढले आणि त्यातून वादही. कोरोनाकाळात तर गृहकलह जास्तच वाढल्याचे जगभरातले चित्र सांगते. घरकाम ते आर्थिक चणचण, मुलांचे संगोपन या टप्प्यातून अनेक जोडपी गेली. यासंदर्भात जगभरात झालेले अभ्यास असं सांगतात की घरगुती कलहात बायका जास्त पोळल्या गेल्या. अनेकींना नोकऱ्या सोडाव्या लागल्या. घरकाम ते मानसिक ताण हे सारंच महिलांच्या संदर्भात टोकाचं होतं. त्यासाठी त्यांनी मदतही मागितली, मानसिक आजारही वाढले हे त्यातूनच लक्षात आलं. पण मग हेच सारं पुरुषांच्याही आयुष्यात झालं का? पुण्यातील कनेक्टिंग या हेल्पलाइनची ‘लोकमत’ वृत्तपत्रात प्रसिध्द झालेली बातमी सांगते की आता पुरुषांवरचाही मानसिक ताण वाढला आहे (Statistics of Connecting Helpline Family Issues Affecting on Male Psychology). 

(Image : Google)

बायको छळते, नोकरी गेली, स्ट्रेस आहे, घरात सततच्या भांडणाचा त्रास होतोय म्हणत पुरुषही हेल्पलाइनवर मदत मागत आहेत. पुण्यातील ‘कनेक्टिंग’ या हेल्पलाइनवर वर्षभरात आलेल्या एकूण ४२७४ फोन आले, त्यापैकी पुरुषांचे २५९० कॉल आहेत. माझ्यात आणि बायकोत सतत भांडण होतात, माझी नोकरी गेली आहे, कौटुंबिक वाद, मानसिक स्थिती चांगली नसणे ही मुख्यत्वे पुरुषांमध्ये प्रचंड तणाव निर्माण करणारी कारणं आहेत. त्यापैकी काहीजण आत्महत्येच्या विचारांपर्यंत जाऊन परतले. 

‘कनेक्टिंग ट्रस्ट’ या सेवाभावी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी काजरी मिश्रा सांगतात, ‘नकारात्मकता, अपमान, भेदभाव, वैद्यकीय आणि कायदेशीर चौकशी, नैराश्य, असुरक्षितता अशा अनेक कारणांमुळे माणसांच्या मनावर आघात होतात. त्यातून आत्महत्येसारखे विचार त्यांच्या मनात येतात. अशावेळी त्यांना भावनिक आधार देणे आवश्यक आहे. त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करणे, वेळीच मदत करणे आवश्यक असते.

(Image : Google)

’जागतिक आरोग्य संस्थेच्या आकडेवारीनुसार, दर ४० सेकंदांत कोणीतरी आपला जीव देत आहे. दरवर्षी जगभरात सुमारे ८ लाख लोक आत्महत्या करतात. आपल्या भवतालात पुरुषांच्याही मनात बरेच साचलेले, डाचलेले असते ते मोकळेपणानं कुठं बोलत नाहीत. स्ट्रेस सहन करतात, कलह होतात, कौटुंबिक वादही वाढतात. त्यानं आरोग्यासह जगण्याची पतही घसरते. त्यामुळे पुरुषांमध्येही वाढलेला स्ट्रेस हे घरातल्या प्रेशर बॉम्बचे एक लक्षणच आहे. 

ताणतणाव असेल तर इथे करा संपर्क

ताणतणावाचा सामना करणाऱ्या व्यक्ती ९९२२००११२२ या क्रमांकावर संपर्क करु शकतात. 

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिपमासिक पाळी आणि आरोग्य