अगं, मी काय म्हणतोय ऐकतेस का जरा ?... अरे, मला ना तुला काहीतरी सांगायचं आहे ऐकतोस का ?... तू बोल मी ऐकतो आहे... असे संवाद आजकाल आपल्याला प्रत्येक घरात ऐकायला मिळतात. कित्येक जोडीदार एकमेकांच्या समोर असून देखील आपल्या पार्टनरशी बोलताना त्यांचे सर्व लक्ष हे हातातल्या स्मार्ट फोनकडे असते. आपल्यासोबत देखील हे रोजच घडत असेल. आपण दिवसभर थकून भागून घरी येतो, आणि घरी आल्यानंतर आपल्या जोडीदाराशी आपल्याला खूप गोष्टी शेअर कराव्याशा वाटत असतात. पण अशावेळी जोडीदाराचे अर्धे लक्ष हे फोन मध्ये असल्यामुळे आपल्याला नीट बोलता येत नाही. यालाच आजकालच्या भाषेत "फबिंग" (Phubbing) असे म्हटले जाते. हा शब्द जरी नवीन असला तरीही आपल्यासोबत घडणारी ही घटना अगदी रोजचीच आहे.
'फबिंग' हा शब्द पहिल्यांदा २०१२ मध्ये वापरला गेला जेव्हा प्रत्येकाच्याच हातात स्मार्टफोन होता आणि लोक फोनमुळे त्यांचे मित्र आणि कुटुंबाकडे दुर्लक्ष करू लागले. हा शब्द आणि कृती जेवढी विचित्र आहेत, तेवढेच विचित्र याचे परिणाम देखील आहेत. "फबिंग" मुळे वैयक्तिक नातेसंबंध, मानसिक आरोग्य, जोडीदारासोबतचे नातेसंबंध, मित्र - परिवाराकडे दुर्लक्ष यांसारख्या वेगवेगळ्या नातेसंबंधात दुरावा येऊ शकतो. स्मार्टफोनमध्ये डोकं खुपसलं की ते तासंतास वर येत नाही. इंटरनेटवर अनेक गोष्टी असतात ज्याकडे आपले मन आकर्षित होते. यामुळे आपल्याला आजूबाजूच्या जगाचा विसर पडतो, आणि याचाच परिणाम नातेसंबंधांमध्ये होताना दिसतो(Study finds regular 'phubbing' could be damaging marriages).
"फबिंग" या विषयावर झालेले संशोधन...
या अभ्यासात संशोधकांनी "फबिंग" म्हणजे "पार्टनर फोन फबिंग'चा ४५३ प्रौढ व्यक्तींवर काय परिणाम होतो याचा अभ्यास केला आहे. फबिंगचा अर्थ असा आहे की, आपल्या जोडीदारासोबत रोमँटिक किंवा क्वालिटी टाइम एकत्र एन्जॉय करत घालवत असताना, लोकांना सेलफोनचे किती आकर्षण असते ? किंवा जोडीदारासोबत असूनही किती वेळा ते सेलफोनचा वापर करतात. या अभ्यासाच्या निष्कर्षात, ४६.८ % लोकांना त्यांच्या साथीदाराने "फब्ड' केल्याचे आढळून आले. तर २२.६ % लोकांनी म्हटले, यामुळेच आमचे भांडणही झाले. ३६. ६ % लोकांनी सांगितले, यामुळे आमच्यात डिप्रेशन निर्माण झाले. हे संशोधन "कॉम्प्युटर्स इन ह्युमन बिहेवियर जर्नल' या नावाने प्रसिद्ध झालेले आहे.
सेक्सनंतर पाय उंच करुन झोपून राहिले तर गर्भधारणेची शक्यता वाढते? -हे खरे की खोटे?
"फबिंग" मुळे नवरा - बायकोच्या नात्यात दुरावा कसा येतो...
जेव्हा आपण आपल्या लोकांच्या आजूबाजूला असतो, तेव्हा आपण काय बोलतो आणि आपण काय म्हणतो याकडे त्यांनी पूर्ण लक्ष द्यावे असे आपल्याला मनापासून वाटते. अशा प्रकारे नाती घट्ट होतात. पण जेव्हा संभाषणाच्या वेळी कोणीतरी त्याच्या फोनमध्ये मग्न असतो, तेव्हा तो त्याच्या सभोवतालच्या गोष्टींशी संपर्क गमावतो. ते मधेच काहीतरी ऐकतात आणि थोडंसं उत्तर देतात, पण त्यांचे आपल्या बोलण्याकडे अर्धवट लक्ष असल्यामुळे तुमचे किंवा इतर लोकांचे मन दुखावू शकते, किंवा वाईट वाटू शकते. स्मार्टफोन आणि डिजिटल उपकरणे विवाह आणि प्रेमसंबंधांमध्ये विषासारखेच असतात. एका रिसर्चनुसार, फोनमध्ये मग्न राहण्याच्या या सवयीमुळे संबंध घटस्फोटापर्यंत जाऊ शकतात. आपला संपूर्ण वेळ फोनला देणाऱ्या जोडप्यांमध्ये नैराश्याची समस्याही अधिक दिसून येत असल्याचेही आढळून आले आहे.
वीकेंड मॅरेज? हा नेमका काय प्रकार आहे, जोडपी खरेच खुश असतात या नात्यात? तज्ज्ञ सांगतात...
"फबिंग" ची सवय सोडवण्यासाठी नेमके काय करावे ?
१. सर्वातआधी स्वतःची ही सवय सोडा :- जर आपल्याला एखाद्याच्या वाईट सवयीपासून मुक्ती मिळवायची असेल, तर त्यासाठी सर्वप्रथम स्वतः एक चांगले उदाहरण बना. असे होऊ नये की आपण इतरांना फोनवर बोलण्यापासून रोखत आहात पण तुम्ही स्वतः तेच करत आहात. यासाठी आपल्या पार्टनरची सवय सोडवण्याआधी स्वतःची सवय सोडवा.
२. पार्टनरला जाणीव करून द्या :- जर आपला पार्टनर या सवयीच्या आहारी गेला असेल तर त्याला या गोष्टीची जाणीव करुन द्यावी. कदाचित त्यांना त्यांच्या या वाईट सवयीची जाणीव नसावी आणि ते हे सवयीने करत असतील. आपण बोलत असताना पार्टनरचे लक्ष नसले की आपल्याला वाईट वाटते, याची जाणीव त्यांना वेळीच करुन द्या. कदाचित त्यांच्यात हे बदल येण्यासाठी वेळ लागेल यासाठी त्यांना थोडा वेळ द्या, पण तुमचा मुद्दा त्यांना स्पष्टपणे सांगा.
३. त्यांच्याशी सहानुभूती दाखवा :- फोनला सतत चिकटून राहणे ही सध्याच्या लाइफस्टाइलची एक मोठी समस्या आहे. तुमच्या सभोवतालचे प्रत्येकजण ते करत असताना सोडणे कठीण आहे. म्हणूनच आपल्या जोडीदाराबद्दल सहानुभूती बाळगा. ते ही वाईट सवय सोडण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणून त्यांना पाठिंबा द्या.
४. समोरच्याशी बोलताना फोन बाजूलाच ठेवावा :- शक्यतो आपण समोरच्या व्यक्तीशी किंवा पार्टनरशी संभाषण करत असाल तेव्हा फोन थोडा वेळा बाजूलाच ठेवावा. अगदीच गरज लागली तर समोरच्या व्यक्तीची तशी परवानगी घेऊन किंवा त्या व्यक्तीला फोन घेण्याचे तितकेच महत्वाचे कारण सांगून फोन हातात घ्यावा. यामुळे समोरच्याला दुर्लक्षित किंवा आपल्याला टाळल्याची भावना येत नाही.