मनाली बागुल
वैजापूरात पळून जाऊन प्रेम विवाह केल्याने बहिणीचं मुंडकं उडवल्याच्या घटना समोर आली आणि पुन्हा एकदा रक्ताच्या नात्यांवर विश्वास उडाला. औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील लाडगावात चार-पाच दिवसांपूर्वी हा प्रकार घडला आणि सोशल मीडियावर याचे पडसाद उमटायला सुरूवात झाली. (Aurangabad Kirti Thore Murder) भावानं बहिणीचं मुंडकं छाटल्यानंतर (Honor Killing) आई त्या कापलेल्या डोक्यालाही शिव्या घालत असल्याचं सांगितलं जातंय. सगळ्याच स्तरातून या क्रूर घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे.
महाराष्ट्रात आंतरजातीय विवाह केल्याची मोठी किंमत मुलींना मोजावी लागतेय. औरंगाबाद जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी हा धक्कादायक प्रकार समोर आला. दरम्यान या प्रकरणावर 'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत देवकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मीनाक्षी राठोड हिनं केलेली फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. या घटनेनं अस्वस्थ होऊन मीनाक्षीने लोकमतशी बोलताना आपला अनुभव सांगत मत मांडले.
मीनाक्षी सांगते की, ''कुटुंबाविषयी सांगायचं झालं तर माझे वडील खूप आधी गेले. आम्ही ५ बहिणी आणि २ भाऊ सगळ्यांची लग्न व्हायची होती. सुरूवातीला काळजीपोटी मुलींना एकटं बाहेर पाठवण्याला आईचा खूप विरोध असायचा अर्थात वडील शिक्षणाच्या बाबतीत खूप नेहमीच पाठींबा द्यायचे. शिक्षणासाठी तांड्यातून बाहेर पडून मोठ्या शहरात जाणं आमच्यासाठी खूपच मोठी गोष्ट होती. वडील गेल्यानंतर फक्त मुलींच्या सुखाखातर आईनं आंतरजातीय विवाह करून दिला. आम्ही तिला बाहेरच्या जगातील अनेक उदाहरण देत बदलवत गेलो. मोठ्या बहिणीचं आंतरजातीय लग्न झाल्यानंतर मला आणि कैलासला पुन्हा आमच्या लग्नासाठी आईला कंन्विस करणं खूप कठीण वाटत होतं. पण हळूहळू आम्ही निवडलेली मुलं चांगली आहेत. आपापल्या क्षेत्रात चांगली कामगिरी करत आहेत हे लक्षात आलं आणि आमच्यासाठी आईनं स्वत:ला बदललं.
एकीकडे घरात जवळपास ३ वेळा आंतरजातीय विवाहाबाबत मानसिकता बदललेली असताना दुसरीकडे समाजात स्वत:च्या पसंतीच्या मुलाशी लग्न केलं म्हणून आईकडूनच हत्या होतेय हे फार अस्वस्थ करणारं आहे. माझ्या आईनं लग्न करून देताना माणुसकी पाहिली जी या घटनेतील आईनं पाहिली नाही. माणूस म्हणून स्वत:च्या मुलीला जीवंतही ठेवावंस वाटलं नाही. माझ्या आईच्या त्या निर्णयांमुळे आता आम्ही चारही बहिणी सुखी आहोत. खरंतर तिनं आम्हाला दुसरा जन्म दिलाय. तिचे मानावे तितके आभार कमीच.....''
मीनाक्षीचा पती अभिनेता कैलास वाघमारे या घटनेबाबत म्हणाला की, ''ऑनर किलिंगच्या घटना घडणं काही नवीन नाही. पूर्वीसुद्धा आंतरजातीय विवाह व्हायचे. सगळ्यात महत्वाचं असतं अक्सेप्ट करणं. जेव्हा तुमचं कुटुंब तुम्हाला स्वीकारतं त्यावेळी कोणीच तुम्हाला अडवू शकत नाही किंवा नावही ठेवू शकत नाही. लोकांना घाबरून अनेक कुटुंबात लग्नाच्या निर्णयाबाबत मुलांना त्रास दिला जातो. जर आम्हा दोघांच्याही कुटुंबाप्रमाणे इतरांनीही आपल्या मुलांच्या नात्याला स्वीकारलं, त्यांच्या सुखात आपलं सुख पाहिलं तर त्यापेक्षा आनंददायी गोष्टी कोणतीच नसेल.''
या पोस्टमध्ये मीनाक्षी म्हणते की.....
मोठ्या ताईचं intercaste लग्न झालं तेव्हा लोकांनी खूप त्रास दिला तुला. मी पाहिलंय. किती राग आला असेल न तुला ताई चा. माझं कैलाश सोबत intercaste लग्न झालं तेव्हा लोकांनी जवळ जवळ तुला त्यांच्यात गृहीत धरणं सोडलं होतं. किती किती राग आला असेल तुला माझा! पण कायम उसाचे पाचड अंगाखांद्यावर बाळगणारा तांडा आणि पुढारल्या पणाचे सोंग मिरवणारी आपली शहरातली कॉलनीही तुझ्या एका स्वीकाराने तुझ्या सोबत ऊभी राहीली!
काल परवा आपल्या लहान मुलीचं ही intercaste लग्नं मोठ्या थाटात लावून दिलस आणि सगळ्यांनाच जणू हीच कशी नवीन जन रीत आहे हे सांगून दिलेस! हे स्विकाराचं बीज तुला कुठे गवसलं? आपल्याला 5 मुली असतांना सुद्धा एवढं कसं तू स्वतःला सांभाळलस.! राग कसा ग control केलास? ते ही पप्पा नसतांना ,तुला नाई का ग आम्हाला मारून टाकावस वाटलं?
हे असच "कीर्ती थोरे "च्या आईला का नाई वाटलं एवढं राग अनावर होत असतो का प्रतिष्ठे पाई? तिने तर जातितच लग्न केले होते. तुझ्या एवढं नाई फक्त एकाच मुलीला स्वीकारायचं होते तिला. पोटच्या मुलीचा इतक्या अमानुषपणे खून करावसं वाटणं या पेक्षा क्रूर काय असू शकतं या जगात. काश माझ्या सारखी आई कीर्ती ला लाभली असती तर? आणि हो! स्वप्निल शुभम सारखे भाऊ ही!
या बेगडी प्रतिष्ठेच्या बंजर जमिनीवर तुझ्या स्विकाराचं बियाणं सापडूदे आई! काल परवाच सकारात्म वाटणारी तुझ्या वाढदिवशी लिहिलेली ही पोस्ट, आज ही घटना एकूण अस्वस्थ करणारी आहे. सगळ्या चिंता, रुढी परंपरांना झुगारून हा जो swag तू स्वीकारला आहेस याने तुझ्या लेकरांची आयुष्य सुखी झाले आहेत. तुझ्यातल्या या सकारात्मक बदलाने आजूबाजूची परिस्थिती कुस बदलतेय! हा swag खऱ्या अर्थाने तुलाच शोभून दिसतो! जो प्रत्येक स्त्री मधे येवो!