Join us  

बायकोला सतत कमी लेखणं, टोमणे मारणं हा मानसिक छळच; बायकोनं ते का सहन करावं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2022 7:22 PM

केरळ उच्च न्यायालयाने घटस्फोट मंजूर करताना दिलेला निकालही म्हणतो की इतर महिलांशी सतत तुलना, कमी लेखणं हे मानसिक क्रौर्यच आहे.

ठळक मुद्देहे एक प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं पण घरोघर कुढत बसणाऱ्या बायका किती असतील?

तुझ्याआधी मी किमान पन्नास मुली पाहिल्या, आणि तुला हो म्हणालो.. असं काही नवरे आपल्या बायकोला सहज चेष्टेत म्हणतात. अनेकदा तर सासूही म्हणते की माझ्या मुलाला किती चांगल्या, देखण्या मुली सांगून आल्या होत्या, पण त्यानं तुझ्यात काय पाहिलं कुणास ठाऊक? एरव्ही ही वाक्यं गंमत, चेष्टा म्हणून किती सहज वाटतात. मात्र असे टोमणे सतत मारले, सतत कमी लेखलं, तू सुंदर नाहीस असं सांगितलं, तू माझ्या लायक नाही, माझ्या अपेक्षा पूर्णच करत नाही असं म्हणत नवऱ्यानं नावं ठेवली तर बाईच्या मनाला किती यातना होत असतील? हा मानसिक छळ आहे आणि त्यामुळे आपण तिचा आत्मविश्वास कमी करतो हे लक्षातही येत नसेल का? पण तसं होतं आणि असं  सतत होणं हे घटस्फोटासाठी सबळ कारण आहे असं आता न्यायालयानेही मान्य केलं आहे. 

(Image : Google)

केरळ उच्च न्यायालयाने अलिकडेच असा निर्णय दिला. न्या. अनील नरेंद्रन आणि न्या. सीएस सुधा यांच्या न्यायपीठानं एका घटस्फोटाच्या खटल्यात हे स्पष्ट केलं की सतत इतर बायकांशी तुलना, कमी लेखणे, टोमणे मारणे हे मानसिक क्राैर्यच आहे आणि त्यामुळे त्या महिलेला घटस्फोट मंजूर करत आहोत.या बातमीची तात्पुरती चर्चा समाजमाध्यमातही झाली. अनेकांनी चेष्टेत कमेण्टही केल्या की, बाबांनो आता आपल्या बायकोची इतरांशी तुलना करणं महागात पडू शकतं. पण या चेष्टेत या प्रश्नाचं मूळ आहे. मुळात आपल्या बायकोची इतर महिलांशी तुलना करण्याचं, बायकोला कमी लेखण्याचं, तिच्या सतत उणीवा दाखवत तू मला कशी शोधत नाही हे सतत टोचून बोलणं याची काय गरज आहे? कुणाही व्यक्तीशी असं वागणं हे चूक नव्हे का? अगदी बायकोनंही नवऱ्याला असे टोमणे मारले तर ते ही तितकेच चुकीचे ठरावे.मात्र ते घरोघर सर्रास होते. बायकोला नावं ठेवणं, तू कशी कमी आहे हे सतत दाखवणं हे सारं होतंच.आता मुद्दा असा आहे की हे एक प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं पण घरोघर कुढत बसणाऱ्या बायका किती असतील? त्यांचा असा मानसिक छळ कधी कमी व्हायचा?