हेमा पटवर्धन
फारकत या शब्दाला जोडून येणारी सामाजिक कुचेष्टेची भावना आपल्याकडे अजूनही कमी झालेली नाही. खरं तर दहा-वीस वर्षांपूर्वी होतं त्यापेक्षा आता फारकत घेण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि तरीही कुठलं जोडपं फारकत घ्यायचं म्हणलं की सगळा समाज त्यांनी तसं करू नये असंच म्हणत राहतो. कोणी फारकत घेतली आहे, असं समजलं की, पहिली स्वाभाविक प्रतिकिया काय असते? “एवढं काय झालं होतं फारकत घेण्याइतकं? आम्ही नाही का संसार केला?”
“नवरा बायकोमध्ये किरकोळ कुरबुरी चालणारच. त्यासाठी कोणी फारकत घेतं का?”
त्यातही एखादा नवरा ‘खूप’ मारहाण करत असेल, दारू पिऊन तमाशा करत असेल, त्याचे दुसऱ्या बाईबरोबर संबंध असतील तर समाजाला त्याच्या बायकोबद्दल थोडी तरी सहानुभूती वाटते. पण त्याच्यापेक्षा सौम्य वाटणारी कुठलीही कारणं लोकांच्या मते फारकत घेण्यासाठी पुरेशी नसतात. मात्र पटत नाही, सूर जुळत नाहीत, मानसिक छळ होतो, एकमेकांबरोबर राहावंसं वाटत नाही, अशी अनेक कारणं त्या जोडप्यालाच माहिती असतात. मात्र पटत नाही म्हणून वेगळं होणं हे आजही जवळच्या नातेवाईकांनाही पटावं असं कारण नसतं.
(Image : Google)
फारकतीच्या बाबतीत कायदा काय सांगतो? तर जोडीदारापैकी एकजण दुसऱ्याचा शारीरिक आणि / किंवा मानसिक छळ करत असेल, तर त्यातील पीडित व्यक्ती जोडीदाराकडून कायदेशीर फारकत मागू शकते. कायद्यात अत्यंत स्पष्टपणे शारीरिक आणि मानसिक छळ असं म्हंटलेलं आहे. याचा अर्थ कायद्याला मानसिक छळ होतो हे मान्य आहे आणि कायद्यातील याच तरतुदीचा आधार घेत केरळच्या उच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय असा आहे, की “नवऱ्याने बायकोला सतत टोमणे मारणे, तिची इतर महिलांशी तुलना करणे आणि ती बायको म्हणून तिच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करत नाही, असं तिला सतत ऐकवणे हा तिचा मानसिक छळ आहे. आणि त्या आधारावर बायकोला घटस्फोट मंजूर करण्यात आलेला आहे.”
हे ऐकल्यावर कोणाला असं वाटू शकतं, हे तर नवरा बायकोमधलं नॉर्मल वागणं आहे. तेवढ्यासाठी कशाला फारकत घ्यायची? तर दुर्दैवाने ही बाब खरोखर कॉमन वाटावी, अशी परिस्थिती आज आहे. आणि बहुतेक सगळ्या स्त्रिया या प्रकारचा मानसिक छळ निमूटपणे सहन करत राहतात. पण केवळ एखादी गोष्ट सगळीकडे सरसकट केली जाते याचा अर्थ ती योग्य आहे, असा होत नाही. किंवा केवळ अनेक जणींना अशा प्रकारच्या मानसिक त्रासाला तोंड द्यावं लागतं म्हणून ते त्यांनी सहन करत रहावं, असाही त्याचा अर्थ होत नाही.
आम्ही नाशिकमध्ये १९८२ सालापासून महिला हक्क संरक्षण समिती या संस्थेचं काम करतो. हे काम करताना लक्षात आलेली एक महत्त्वाची बाब अशी की, स्त्रियांचा छळ करण्याचे अक्षरशः असंख्य प्रकार अस्तित्वात आहेत. आणि बदलत्या काळानुसार आणि तंत्रज्ञानानुसार त्यात नवनवीन प्रकारांची भरच पडते आहे. त्यापैकी अनेक प्रकार असे आहेत, की त्या वागण्याने घरातील स्त्रीचा छळ होतो हे कोणाच्या लक्षातही येत नाही. इतकंच नाही, तर ते सहन करणाऱ्या स्त्रीला देखील त्यात काही चुकीचं वाटत नाही. आणि अगदी डोक्यावरून पाणी जाईपर्यंत सहसा कोणी त्याबद्दल तक्रारही करत नाही. पण असं असलं तरी त्या मानसिक छळाचा त्या स्त्रीवर परिणाम तर होतोच. त्याने तिच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतोच. तिचा आत्मविश्वासही कमी होतो. तिचं आयुष्य तिला जितकं छान जगायची संधी मिळाली पाहिजे ती तिच्याकडून हिरावून घेतली जातेच. आणि या परिस्थितीला केवळ त्या स्त्रीचा छळ करणारा नवरा किंवा सासर जबाबदार नसतं, तर ‘एवढं तर चालतंच असं म्हणणारे आपणही’ समाज म्हणून त्याला जबाबदार असतो.
या शारीरिक आणि त्याहीपेक्षा मानसिक छळाच्या चक्रातून स्त्रियांनी बाहेर पडण्यासाठी त्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. ‘हे नॉर्मल आहे’ असं म्हणणं आपण समाज म्हणून सोडून दिलं पाहिजे, पीडित स्त्रीला बळ दिलं पाहिजे आणि प्रसंगी न्यायालयात तिला तिचा कायदेशीर अधिकार मिळवून दिला पाहिजे. केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयानं मानसिक छळ, मानसिक क्रौर्य या स्पष्ट शब्दांत टोमणे मारणे, कमी लेखणे याचा उल्लेख झाला हे उत्तमच झाले. निदान हे सारं ‘छळ’ या प्रकारात मोडतं हे तरी आता समाजानं मान्य करावं..
(Image : Google)
मानसिक हिंसाचाराचे प्रकार कोणते?
मानसिक छळ यासंदर्भात महिला अनेक गोष्टी सांगतात. सहन करतात.
अपमान करणे, शिव्या देणे, वाईट नावाने बोलावणे, चारित्र्याबद्दल संशय, मुलगा न झाल्याने अपमान, माहेरी जाऊ न देणे, माहेरच्या लोकांशी संपर्क ठेवायला बंदी, लहान मूल महिलेपासून तोडणे, लहान मुलाचा वापर करून आईचा मानसिक छळ, कोणाशी संपर्क ठेवायला मनाई, घराबाहेर पडायला बंदी, आत्मविश्वासाचे खच्चीकरण, घराबाहेर काढण्याची धमकी, वेळीअवेळी घराबाहेर काढणे, बदनामी करणे, बदनामी करण्याची धमकी देणे, सतत दहशतीखाली ठेवणे, नवरा बायकोला एकत्र येऊ न देणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे, लैंगिक उपासमार, ती स्त्री जणू काही अस्तित्वात नाही, अशी वागणूक देणे, तिच्या कामाच्या ठिकाणी तिच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण होईल, असे प्रश्न विचारणे, तिच्या मोबाइल वापरावर बंदी किंवा निर्बंध, तिच्या समाजमाध्यमांवरील वावरावर बंदी किंवा निर्बंध, कुठल्याही क्षणी मारहाण होईल अशा दहशतीखाली ठेवणे, लहान मुलाचा छळ करण्याची धमकी देणे, तिच्या कपड्यांवर आणि वावरण्यावर पराकोटीची बंधने लादणे, आजारपणात तिच्यावर उपचार न करणे, तिच्याकडून अशक्य कोटीतल्या अपेक्षा ठेवणे व ती त्या पूर्ण करू शकत नाही म्हणून तिला टोमणे मारणे, पुरेशी झोप घेऊ न देणे हे सारे मानसिक हिंसाचाराचेच भाग आहेत.
अध्यक्ष, महिला हक्क संरक्षण समिती, नाशिक
mhss.nsk@gmail.com