चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाच्या विक्रमी विजयात मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीचा मोलाचा वाटा आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये विल यंग आणि ग्लेन फिलिप या दोन प्रमुख फलंदाजांच्या विकेट घेतल्या. तसेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या उपांत्य लढतीत ट्रॅव्हिड हेडला माघारी धाडलं होतं. याच दरम्यान वरुणने आता आपल्या पत्नीचं कौतुक केलं आहे. तिच्यामुळेच हे सर्व शक्य झाल्याचं देखील म्हटलं आहे.
"मी माझ्या पत्नीला याआधी सांगितलं होतं की, माझ्यावर विश्वास ठेवू नकोस कारण माझ्याकडे नोकरी नव्हती. पण तिनेच मला आत्मविश्वास दिला. ती म्हणाली, क्रिकेट खेळ, ५-६ हजार कमव. मी १५ हजार कमावतेय. आपण मॅनेज करुया" असं वरुणने म्हटलं आहे. त्याच्या या विधानानंतर प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, जी त्याच्यावर विश्वास ठेवते, सर्व स्त्रिया सारख्याच नसतात असं म्हटलं जात आहे. क्रिकेटर, सेलिब्रिटीचा घटस्फोट होत असताना आता वरुणच्या पत्नीची जोरदार चर्चा रंगली आहे.
वरुण चक्रवर्तीने त्याची मैत्रीण नेहा खेडेकरसोबत लव्ह मॅरेज केलं. दोघांनीही कोरोना काळात लग्न केलं आणि लग्नाआधी बराच काळ एकमेकांना डेट केलं होतं. नेहा खेडेकरला लाइमलाइटपासून दूर राहणं जास्त आवडतं. दिसायला ती खूप सुंदर आहे. नेहा फिटनेस फ्रिक असून ती तिच्या फिटनेसची विशेष काळजी घेते. हे तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून स्पष्टपणे दिसून येतं. दररोज जिमला जाणं आणि पौष्टिक आहार हा तिच्या दैनंदिन दिनचर्येचा एक भाग आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, वरुण चक्रवर्तीची पत्नी नेहा खेडेकर ही हाऊसवाईफ आहे. तिला फोटोग्राफीची आवड आहे आणि ती प्राणीप्रेमी आहे. वरुण चक्रवर्तीच्या सामन्यांदरम्यान नेहा अनेकदा त्याला प्रोत्साहन देण्यासाठी स्टेडियममध्ये दिसते. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर तब्बल ३ वर्षांनी वरुण चक्रवर्तीला पुन्हा टीम इंडियात संधी मिळाली. यावेळी मात्र तो मागे पडला नाही. प्रत्येक सामन्यात गठ्ठ्यानं विकेट घेत या पठ्ठ्यानं आधी टी-२० संघातील स्थान पक्के केले. त्यानंतर अखेरच्या क्षणी त्याला दुबईचं तिकीट मिळालं. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळायला संधी मिळाली अन् तो टीम इंडियाचा हुकमी एक्काही ठरला.