Join us  

बायकोने नवऱ्याला ‘काळा’म्हणून हिणवणं क्रौर्य-कोर्टाचा निर्णय; तरुण मुलांवरही आता ‘गोरं’होण्याचं प्रेशर

By सायली जोशी-पटवर्धन | Published: August 09, 2023 5:23 PM

गोरीच बायको हवी या अट्टहासात आता गोराच नवरा हवा अशी अपेक्षा आहे का? काळ्या-सावळ्या तरुण मुलांचेही प्रश्न गंभीर

सायली जोशी-पटवर्धन 

‘गोरी मुलगी हवी!’ हे वाक्य लग्नाच्या जाहिरातीत अजूनही दिसतंच. मुलगी काळीसावळी आहे पण स्मार्ट आहे असंही कुणीतरी म्हणतंच. मुलगी गोरी असणं म्हणजेच सुंदर असं अजूनही अप्रूप आपल्या समाजात आहे. उघड आहे आणि आडूनआडूनही आहेच.  काळ्या-सावळ्या मुलीलाघरात वेगळी वागणूक मिळते. घरचे नातेवाईक शेजारी शिक्षकही काळ्या रंगाला टोमणे मारतात हे सारं बायका आजवर सहन करत आल्या आहेतच. अगदी काळ्या मुलीची गोष्ट सांगणारी सिरीअलही गोरी मुलगी मेकअप करवून काळी करतात हे तर आजचंच वास्तव आहे  मग नकळत काळया सावळ्या मुलींच्या मनात लहान वयातच न्यूनगंडाची भावना निर्माण होणं, आपण कुरुप आहोत त्यामुळे आपण सगळ्यांच्या नावडत्या आहोत असा सतत फिल असतो. घरात इतर बहिणी असतील तर त्यांच्यात तुलना होत राहणं हे त्या मुलीच्या वाट्याला येतं. अनेक घरांत तर उघडपणे अशा मुलींना ‘ए काळे’असे तोंडावर हिणवले जाते. तुझ्याशी कोण लग्न करणार तू तर इतकी सावळी आहेस असंही अनेकदा मुलींना सहज म्हटलं जातं. मुलींच्या कोवळ्या मनावर या सगळ्याचा विपरीत परिणाम होत असतो. पण हेच सारं मुलग्यांच्या आणि तरुण मुलांच्याही बाबतीत झालं तर (The Karnataka High Court has said that shaming a husband for being dark skinned amounted to cruelty, granted divorce; is being fair is new burden on men now?)?

पूर्वी होत नव्हतं पण आता मुलांसाठी वेगळ्या आणि खास मॅनली स्कीन व्हाइटनिंग क्रीम आल्याच्या जमान्यात मुलांनाही काळेपणाचा न्यूनगंड वाटावा, अपमान व्हावे असे अनुभव येऊ लागले आहेत. पूर्वी मुलं टॉल डार्क हॅण्डसम या सौंदर्य व्याख्येत कोंबले जात. पण तरीही  थोडे सावळे असतील तरी चालतं. बाहेर उन्हात खेळल्याने त्यांचा चेहरा रापला असेल असं म्हटलं जायचं. मुलगा सावळा असलेलाच चांगला असंही अनेकदा समजंल जातं. पण आता मुलांनाही आपण गोरं, उजळ असावं असं वाटतं. बाजारात मुलांना गोरं करणाऱ्या विविध क्रिम्स आणि ट्रिटमेंटस आल्या.  मुलांसाठीही मोठमोठी पार्लर उघडली जाऊन त्याठिकाणी चेहऱ्याचे सौंदर्य खुलवणारे नवनवीन पर्याय उपलब्ध झाले. मग मुलांनाही आपण हे सगळं का करु नये असं वाटून त्यांनीही अशाप्रकारच्या ट्रिटमेंटस घ्यायला सुरुवात केली.

(Image : Google)

हेअरस्टाईल, दाढीबाबतचे वेगवेगळे प्रयोग या सगळ्यात आता रंग उजळवण्याचीही भर पडली. घरच्या घरी काही उपाय केले जाऊ लागले, काही जणांनी बाजारात मिळणारी महागडी क्रिम्स, फेस मास्क वापरायला सुरुवात केली तर काहींनी चक्क डॉक्टरांकडे जाऊन स्कीन ट्रिटमेंटस घ्यायला सुरुवात केली. पण तरी लग्नाच्या टप्प्यावर गाडं अडतंच. दिसायला काळा म्हंटल्यावर मुलांचीही लग्न जमेना आणि जमलेली घटस्फोटाच्या उंबरठ्यावरही पोहचू लागली.

या सगळ्या विषयाला वाचा फुटण्याचं निमित्तही तसंच आहे. एका पत्नीने आपल्या पतीला रंगावरुन हिणवलं आणि तो पती थेट घटस्फोट घ्यायला निघाला. पतीला काळा आहे म्हणत रंगावरुन हिणवणं ही क्रूरता असल्याचं महत्त्वाचं निरीक्षण कर्नाटक उच्च न्यायालयाने नुकतंच नोंदवलं. पतीच्या काळ्या रंगावरुन त्याला टोमणे मारणे हा त्याचा अपमान आहे. या कारणास्तव या जोडप्याच्या घटस्फोटाला मंजुरी देण्यात आली.

त्वचारोगतज्ज्ञ डॉ. नरेंद्र पटवर्धन म्हणतात धोकेही समजून घ्या..

(Image : Google)

तरुण मुलांचेही गोरे होण्याचे प्रयत्न सर्रास दिसते का असं विचारलं असता,त्वचारोगतज्ज्ञ डॉ. नरेंद्र पटवर्धन सांगतात, ॲलर्जी आल्याने किंवा काही कारणांनी आपला रंग काळवंडला असेल तर त्यासाठी उपचार घेण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढले आहे.  पुरुषही आता उपचार घेतात. मूळ रंग उजळ करण्याचे प्रमाण अद्याप तितके नसले तरी काही कारणाने रंग काळवंडला असेल तर आवर्जून उपचार घेतले जातात. सामान्य रंगापेक्षा रंग जास्तच काळा झाला असेल तर आधीचा रंग परत आणण्यासाठी उपचार घेणे यात काहीच गैर नाही. मात्र अँटी एजिंग किंवा रंग आहे त्यापेक्षा उजळ करण्यासाठी येणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण नक्कीच जास्त आहे.

उपचार करताना यामध्ये व्यक्ती काय काम करतो हे पाहावे लागते. जास्त उन्हात किंवा दिव्यांमध्ये काम करणारे असतील तर त्या पद्धतीने ट्रिटमेंट द्यावी लागते. सनस्क्रीन ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असून त्यासोबत विविध केमिकल ट्रिटमेंटस, लेझर ट्रिटमेंट आणि काही वेळा इंजेक्शनच्या माध्यमातूनही उपचार करावे लागतात. हे उपचार व्यक्तीनुसार बदलतात, मात्र पुरेशी माहिती न घेता चुकीच्या ठिकाणी जाऊन अशा ट्रिटमेंट घेणे धोकादायक ठरु शकते. तसंच या सगळ्याचे साईड इफेक्टसही आहेतच. 

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिपलग्न