पर्सनल स्पेस, इगो, इतर अनेक प्रलाेभनं या सगळ्यांमध्ये आपलं नातं सांभाळणं आजच्या जगात खरोखरच एक कौशल्याची बाब आहे. नात्यात काही नियम असतात का आणि नियम असले तर ते नातं कसलं, असा प्रश्न आपल्याला सहज पडू शकतो. पण होय... नातं सांभाळायचं असेल, जपायचं आणि खुलवायचं असेल तर नक्कीच काही नियम पाळावे लागतात. अनेकदा आपल्या हातून नकळत काही गोष्टी घडून जातात. पण त्याचे तीव्र पडसाद आपल्या नात्यावर उमटतात. म्हणूनच नातं जपायचं असेल तर काही पथ्ये जरूर पाळा.
१. जोडीदारावर तुमचे विचार लादू नका
जेव्हा प्रेमाचे सुरूवातीचे, नव्या नवलाईचे दिवस असतात, तेव्हा आपल्या जोडीदाराला खुश करण्यासाठी एकमेकांचे सगळे काही स्विकारले जाते. जोडीदाराची मर्जी सांभाळण्याचा प्रयत्न केला जातो. पण जेव्हा काळाच्या ओघात नातं अधिक परिपक्व होत जातं, तेव्हा तुम्ही पण थोडे मॅच्युअर व्हा. आपल्या जोडीदाराने आपले सगळे काही ऐकले पाहिजे, हा अट्टाहास सोडा. जोडीदारावर तुमचे विचार अजिबातच लादू नका.
२. जोडीदाराला गृहित धरू नका
तुम्हाला एखादी गोष्ट आवडली असेल किंवा तुम्ही एखादी गोष्ट ठरवली असेल तर तुमच्या जोडीदारालाही ती तेवढीच आवडेल, असं गृहित धरण्याची चूक करू नका. तुमचा जोडीदार हा एक स्वतंत्र व्यक्ती आहे आणि त्याला त्याच्या स्वत:च्या काही आवडीनिवडी आहेत, ही गोष्ट नात्यात कायम लक्षात ठेवली पाहिजे. जोडीदाराला गृहित धरणं म्हणजे त्याचं अस्तित्वच धोक्यात आणण्यासारखं आहे.
३. तुलना करू नका
आपली सतत कोणाशी तरी तुलना केली जात आहे, हे खूप त्रासदायक असते. त्यामुळे तुमच्या जोडीदाराची तुलना सतत एखाद्या तिसऱ्या व्यक्तीसोबत करून जोडीदाराला दुखावू नका. जेव्हा तुम्ही जोडीदाराची तुलना अन्य व्यक्तीसोबत कराल, तेव्हा फक्त एवढाच विचार करा की आपण आपल्या जोडीदाराच्या जागी आहोत आणि आपला जोडीदार आपली तुलना इतर कोणाशी तरी करत आहे. आपल्याला सतत कंम्पेअर करणं ही भावनाच खूप अपमानास्पद असते. त्यामुळे नातं टिकवायचं असेल, तर तुलना टाळा.
४. चारचौघात अपमान नको
तुमचे नाते टिकवायचे असेल तर चारचौघात जोडीदाराचा मान राखता आलाच पाहिजे. जर चारचौघात तुम्ही तुमच्या जोडीदाराचा कायम अपमान करत असाल किंवा चेष्टा करून सतत काहीतरी विनोदी बोलत असाल, तर अशा गोष्टी फार काळ सहन करणे कठीण असते. त्यामुळे चारचौघात जोडीदाराचा अपमान तर करू नकाच पण कायम जोडीदाराची थट्टामस्करी देखील करू नका.