व्हॅलेंटाइन्स डे म्हणजे आपलं प्रेम असलेल्या व्यक्तीसाठीचा खास दिवस. आयुष्यभर प्रेम करत असलो तरी या दिवशी हे प्रेम आपण व्यक्त करतो. रोजच्या रुटीनमध्ये आपल्याला एकमेकांना वेळ द्यायला, एकमेकांसाठी काही खास करायला जमतंच असं नाही. म्हणूनच या दिवसाचे निमित्त साधून आपण आपल्या जोडीदाराशी प्रेमाच्या भावना व्यक्त करतो. पण काही वेळा जोडीदाराला काय द्यायचे हेच आपल्याला कळत नाही. आपल्याकडे सगळं आहे म्हटल्यावर वेगळं काय देणार असा प्रश्नही आपल्याला पडतो. लग्नानंतर तर अनेकदा या गोष्टी मागे पडतात. मात्र नात्यातलं प्रेम कायम आहे तसंच राहावं यासाठी काही ना काही तरी करायलाच हवं ना. अशावेळी काहीतरी मोठं खूप महागाचं गिफ्टच द्यायला हवं असं नाही. तर काही खास गोष्टी करत आपण प्रेमाची भावना नक्कीच व्यक्त करु शकतो. म्हणजे नेमकं काय करायचं याविषयी (Valentine Day 2023 Gift Ideas)...
१. आवडीचा पदार्थ बनवा
विकतचे चॉकलेट किंवा मिठाई आणणे सोपे असते. पण आपल्या जोडीदारासाठी त्याच्या आवडीचा एखादा खास पदार्थ तुम्ही या दिवशी नक्की बनवू शकता. यामध्ये अगदी नाश्त्यापासून ते गोड पदार्थ किंवा त्यांना आवडते असे काहीही करता येईल. टेबलवर हा पदार्थ छान सजवून त्यासोबत एखादं गुलाबाचं फूल ठेवलं तरी जोडीदार नक्कीच खूश होईल. किंवा त्याच्या/तिच्या आवडीचा पदार्थ डब्यात असेल आणि त्यासोबत एखादी प्रेम व्यक्त करणारी चिठ्ठी असेल तर हा दिवस नक्कीच खास होईल.
२. एकमेकांना वेळ द्या
अनेकदा आपण नोकरी, घरातील जबाबदाऱ्या या सगळ्यामध्ये इतके अडकून जातो की आपण एकमेकांना वेळ द्यायलाच विसरतो. पण या दिवसाच्या निमित्ताने किमान एखादी कॉफी किंवा चहा नक्की एकत्र घेऊ शकता. अगदीच नाही जमले तर रात्री जेवण झाल्यावर लॉँग ड्राईव्हला किंवा चालत चक्कर मारायला तरी नक्की जाऊ शकता.
३. चांगल्या गोष्टींचे कौतुक करा
नात्यात असलेली प्रत्येक व्यक्ती बरेचदा आपल्या जोडीदाराविषयी तक्रारी करत असतो. पण या दिवसाच्या निमित्ताने आपण एकमेकांच्या चांगल्या गोष्टींविषयी बोलायचे असे ठरवा. आणि जोडीदारामध्ये काय चांगले आहे हे त्यांना आवर्जून सांगा. यामुळे नात्यातील नकारात्मकता निघून जाईल आणि नातं बहरण्यास काही प्रमाणात तरी मदत होईल. बोलणं शक्य नसेल तर एकमेकांना छानसे पत्र लिहा आणि आपल्या भावना व्यक्त करा.