फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा म्हणजे व्हॅलेंटाइन्स विक. तरुणाईसाठी हा आठवडा खास सेलिब्रेशनचा आठवडा म्हणून ओळखला जातो. रोज डे, प्रपोज डे झाल्यावर येतो तो म्हणजे चॉकलेट डे (Chocolate Day). आपल्या आवडीच्या व्यक्तीला त्याच्या किंवा तिच्या आवडीचे चॉकलेट देऊन हा खास दिवस साजरा केला जातो. आपण लहान असू किंवा मोठे कोणीही आपल्याला चॉकलेट दिलं की आपण हमखास खूश होतो. चॉकलेट खाल्ल्यावर नकळत आपल्याला एनर्जी आल्यासारखे वाटते आणि आपण ताजेतवाने होतो. अशा या चॉकलेटला आजच्या दिवशी विशेष महत्त्व असते. तर चॉकलेट खाऊन दात किडतात, ते गोड असल्याने योग्य त्या प्रमाणातच खायला हवे असे आपण लहान मुलांना कायम सांगतो. पण हे चॉकलेट आरोग्यासाठी फायदेशीर असते हे मात्र आपल्याला माहित असतेच असे नाही. पाहूयात चॉकलेट खाण्याचे आरोग्याला होणारे फायदे (Valentine week celebration Chocolate Day Special benefits of having chocolate)...
चॉकलेट खाण्याचे फायदे
१. चॉकलेटमध्ये असणारे एन्डोर्फीन आपल्या मनातील भावना जागृत करतात आणि त्यामुळे नकळत आनंदी भाव तयार होतात. त्यामुळे चॉकलेट खाल्ल्यानंतर काही काळासाठी का होईना आपण खूश राहतो.
२. आपण सगळेच वेगवेगळ्या गोष्टींच्या ताणातून जात असतो. पण चॉकलेट खाल्ल्याने हा ताण काही वेळासाठी का होईना कमी होतो. अनेकांना ताण आल्यावर एखादे व्यसन करण्याची किंवा चहा-कॉफी घेण्याची सवय असते. या पर्यायांपेक्षा कधीतरी चॉकलेट खाणे केव्हाही चांगले. त्यामुळे तुम्ही नक्की रिलॅक्स होऊ शकाल.
३. चॉकलेट ज्यापासून तयार होते त्या कोकोमध्ये अँटीऑक्सिडंटस असतात, आरोग्य चांगले ठेवण्यासाठी शरीराला अँटीऑक्सिडंटसची गरज असते. चॉकलेटमधून ते मिळत असल्याने कधीतरी चॉकलेट खायला हरकत नाही.
४. मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी तसेच उत्तम स्मरणशक्तीसाठीही चॉकलेट अतिशय उपयुक्त असते. ज्यांना सतत काही ना काही विसरण्याची सवय असते अशांनी आवर्जून चॉकलेट खायला हवे.
५. ज्यांना उच्च रक्तदाब, हृदयविकार आहे त्यांनी ठराविक कालावधीने चॉकलेटचे सेवन करायला हवे. त्यामुळे या दोन्ही तक्रारी दूर होण्यास मदत होते.
यामध्ये तुम्ही नेहमी चॉकलेटच खाल्ले पाहिजे असे नाही तर चॉकलेट केक, चॉकलेट आईस्क्रीम, चॉकलेट ब्राऊनी, चॉकलेट बिस्कीट असे एकाहून एक प्रकार ट्राय करु शकता.