Join us  

स्वत:च्या प्रेमात पडण्याची गोष्ट! तुम्ही पडला आहात कधी स्वत:च्याच प्रेमात नव्याने?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2023 5:48 PM

व्हॅलेंटाइन्स डे : स्वत:च्या आणि जगण्याच्याही प्रेमात पुन्हा पडावं, मनातला सारा कडवटपणा, करवादलेपणा टाळून, ते जमेल?

ठळक मुद्देमनापासून आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांमध्ये रमायचं. जे नाही मिळालं त्याची खंत करणं सोडून जे-जे मिळालं त्याबद्दल कृतज्ञ व्हायचं.

- स्मिता पाटील

शामे गम की कसम आज गमगी हैं हम।तलतचे मखमली सूर सुरू झाले आणि तिच्या अंगावर चहूबाजूंनी एकाकीपण धावून आलं. पापण्यांना न जुमानता डोळ्यातल्या पाण्यानं गालांवर धाव घेतलीच. आपण फक्त करत गेलो इतरांसाठी स्वतःचा कुठलाही विचार न करता. वयाच्या या टप्प्यावर काय उरलं हातात? आपल्याला गृहित धरलं सगळ्यांनी आणि आपण ते धरू दिलं. संपून गेलं सगळं आणि रखरखीत झालं मन. आताशा हळुवार काही उगवतच नाही आत.काय झालंय सध्या आपलं? इतकी कशी रडूबाई झालोय आपण? कुठे गेला तो हसरा, खळखळता उत्साहाचा झरा?तलत गातच होता तितक्याच आर्ततेनं. तिने डोळे घट्ट मिटून घेतले. हतबलता वाहायला लागली सरसर पुन्हा डोळ्यातून. इतक्यात पापण्यांवर अलगदशी गार झुळूक आली. डोळ्यांवर मायेचा अलवार हात फिरला. मन एकदम नवथर वयात जाऊन पोहोचलं. चेहऱ्यावर मोरपीस फिरवताना होणारी मखमली जादू आठवली. मोरपिसाचा स्पर्श होताना कानावर हळुवार शब्द आले. “वेडी कुठली? मी आहे ना तुझ्यासाठी. छोट्या छोट्या गोष्टींनी काय ग भरून येतं तुला आजकाल? चल ऊठ. मस्तपैकी आवर. तुला आवडणारे छानसे कपडे घाल. चल, बाहेर पडू. छान चालायला जाऊ. बाहेर काय काय चाललंय हे तर बघ. उठ पटकन.”तिला एकदम उत्साह वाटला. तिने डोळे उघडले आणि ती आत आवरायला गेली. मस्त तयार होऊन चालायला बाहेर पडली. आज रस्ता काहीतरी वेगळाच वाटत होता. आजूबाजूची हिरवीगार झाडं, मधून मधून दिसणारी देखणी फुलं, माणसांचे असंख्य वेगवेगळे चेहरे, धावणाऱ्या गाड्या बघायला छानच वाटत होतं. हळूहळू गडद होत चाललेला संधीप्रकाश आणि बदलत जाणाऱ्या सावल्या. तिच्या मनावरचं मळभ एकदम दूर झालं. काळोखानं शहराला घट्ट लपेटून घेतलं. “एक प्याली हो जाये चाय की?” असं म्हणत रस्त्याच्या कडेच्या टपरीवर तो तिला घेऊन गेलाच. हवेतला हवाहवासा गारवा आणि सोबत चहा. आतून आतून उबदारपणा पसरत गेला शरीरभर आणि मनभर सुद्धा. गाणं गुणगुणत तिनं घरात प्रवेश केला. एकटीच होती ती घरात. नुसता भात पण पुरणार होता रात्री जेवणासाठी. आयत्या वेळेला लावूयात म्हणून ती बाहेर आली. आज कितीतरी दिवसांनी तिला गाणं म्हणावसं वाटलं. मोबाइलवर तानपुरा लावून तिने आरती प्रभूंचं तिचं आवडतं गाणं म्हणायला सुरुवात केली.

(Image : google)

‘मी न आता राहिले रे पूर्वीची ती चंचळापोक्त मी झाले आता रे डाव मांडू वेगळाहार किंवा जीत होणे हे नको रे आजला !खेळ ऐसा खूप झाला रंगला अन् संपलाएक ऐसा डाव मांडू रंग झेलू आतला !’आज गाण्याचा एक नवा अर्थ मनात उलगडत होता. एक शांत शांत प्रवाह आत उतरत होता. तिच्या स्वतःच्याच मनानं निर्माण केलेले संभ्रम हळूहळू निवळत जाताहेत.‘तो’ आलाय तिच्या आयुष्यात पुन्हा नव्याने तिची स्वतःशी गाठ घालून द्यायला.तो कोण? तिचा ‘आतला आवाज.’ तिचं खरं मैत्र. हरवला होता तो किती काळापासून सगळ्या कोलाहलात. ती विसरूनच गेली होती त्याला इतक्या सगळ्या वर्षांत.तिचा आतला आवाज तिला सांगत होता, “इतकी हसरी - आनंदी तू. कुठल्याही परिस्थितीसमोर न हरणारी, कधीही नकारात्मक विचारांना थारा न देणारी तू हरवून गेलीस की गं. काही काही गोष्टी हातातून निसटून गेल्या तर गेल्या. गेलेला कुठलाच काळ परत येत नसतो. त्याचं आता वाईट नाही वाटून घ्यायचं. आपल्या आत दडलेल्या प्रेमाला परत बाहेर काढायचं. पण आता ते प्रेम स्वतःवर उधळून द्यायचं. स्वतःसाठी करायच्या राहून गेलेल्या गोष्टींसाठी पुरेसा वेळ द्यायचा. उगाच स्वतःला दमवून न घेता येणारे क्षण भरभरून जगायचे. आता कुणाला गृहित धरू द्यायचं नाही. आपल्या आनंदासाठी, छान वाटत असेल ते इतरांसाठी जरूर करायचं. पण परतीच्या आहेराची वाट नाही बघायची. स्वतःसाठीचा ओलावा स्वतःच निर्माण करायचा.

(Image : google)

आनंदाची छोटी छोटी बेटं स्वतःसाठी तयार करायची. कॅनव्हासवर मस्त रंगात बुडून जायचं, निसर्गात भरून जायचं, मनापासून गायचं, मनाला भावणाऱ्या सुरांवर मनसोक्त थिरकायचं. स्वतःला कधी बक्षीस द्यायचं. छान आवडीचा पदार्थ स्वतःला खिलवायचा. स्वतःच्या शरीरावर प्रेम करायचं. आवडेल ते, राहून गेलंय ते करायचं. दुःख देणाऱ्या माणसांना लांब अंतरावर ठेवायचं आणि मनापासून आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांमध्ये रमायचं. जे नाही मिळालं त्याची खंत करणं सोडून जे-जे मिळालं त्याबद्दल कृतज्ञ व्हायचं. करशील ना असं? तुझ्या आतल्या रंगांना झेल बयो...”ती स्वतःशीच खुदकन हसली आणि तिचा आतला प्रेमरंग तिच्या चेहऱ्यावर उमटत गेला.(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)smita.patilv@gmail.com

टॅग्स :रिलेशनशिप